मराठा आंदोलन : आजची स्थिती आणि नेमकी वस्तुस्थिती :
माझा नासिकला बंगला असतांना, बंगल्यासमोर एक दिवस काही उनाड मुले मस्ती करत होते, त्यांना माहित होते मी अलीकडे मर्सिडीज घेतल्याचे, एका नव्याकोऱ्या मर्सिडीजकडे बोट दाखवत मुलांनी विचारले कि आम्ही त्यावर चढून मस्ती करू का, मला क्षणार्धात माझे बालपण आठवले, त्या आठवणींनी मी काहीसा भावुक होत त्यांना हो म्हणालो आणि पुढल्या क्षणी त्या आठ दहा आडदांड मुलांपैकी काही गाडीच्या टपावर चढले काही बॉनेटवर तर काही डिक्कीवर चढले, त्यांनी काहीशा असुरी आनंदाने मर्सिडीजची आई बहीण एक केली, त्यानंतर जणू काही घडलेच नाही त्यांनी काही केलेच नाही या अविर्भावात ते आनंदाने हात हलवत झटक्यात ते निघून गेले, शेजारच्या पवार काकांची ती मर्सिडीज होती, माझी एक सोडून उभी होती. मराठा आंदोलन भडकावून देणारे माझ्यासारखे दुरून गम्मत बघत होते ज्यांची नावे ठाऊक असूनही येथे उघड करणे शक्य नाही मात्र मराठेतरांच्या नजरेतून रस्त्यावर उतरून नासधूस करणारे आंदोलने करणारे त्या मुलांसारखे उतरले पण ज्यांनी प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून अभूतपूर्व गोंधळ घातला त्यांच्या मानसिकतेचा पडद्याआड उभे राहून मराठा आंदोलन पेटवून देणार्या काही लबाडांनी तंतोतंत अभ्यास केला होता आणि या माथी भडकविणार्या नेत्यांच्या नेमके लक्षात राज्यातल्या राजकीय बेरोजगारीचे वातावरण आलेले होते…
मराठा आंदोलनाचा जोर वाढला बहुतेकांची माथी भडकली कारण जे रस्त्यावर उतरले त्यातले फारसे कोणीही नोकर्या उद्योगधंदे विविध व्यवसाय करणारे नव्हते तर आंदोलनकर्ते मोठ्या प्रमाणात बेरोजगार, शेती करणारे किंवा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष राजकारणाशी संबंधित होते ज्या साऱ्यांचा सतत राजकारण हा आवडीचा किंवा कित्येकांचा पोटापाण्याचा विषय होता ज्यात मोठी चूक सत्तेतल्या महायुतीकडून घडलेली आहे. महाराष्ट्रात आंदोलन पेटले तेव्हा किंवा आजही महापालिका पालिका नगर पंचायत जिल्हा परिषदा पंचायत समित्या आणि ग्राम पंचायतींच्या निवडणुका न घेतल्या गेल्याने या साऱ्याच ठिकाणी प्रशासकीय राजवट लावण्यात आलेली असल्याने सत्तेशी सतत संपर्क ठेवणारे किंवा राजकारणात कायम रमणारे बहुतांश कार्यकर्ते स्थानिक नेते हे गेल्या काही वर्षांपासून राजकीय बेरोजगार आहेत विशेष म्हणजे ग्राम पंचायती निवडणुका देखील मराठा आंदोलन आटोक्यात आल्यानंतर घेण्यात आल्या आहेत, साऱ्याच प्रकारच्या राज्यातल्या स्थानीक स्वराज्य संस्थांच्या निवडुकांबाबत विशेषतः महायुती म्हटल्यापेक्षा भाजपा का चालढकल करते आहे, त्यांना पराजयाची अनामिक भीती मनात बसलेली आहे कि काय ज्यामुळे भाजपा महायुती सत्तेत असून देखील त्यांनी या अतिशय महत्वाच्या आणि सेन्सेशनल लोकांशी निवडणुका संबंधित असून देखील अद्याप न घेतल्याने राज्याच्या कानाकोपऱ्यात थेट मुंबईपासून तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात मोठ्या प्रमाणावर राजकीय बेरोजगारी उफाळून वर आलेली आहे उफाळून वर आलेली होती आणि राज्याचे राजकारण मराठा समाजाचे मूलभूत अंग असल्याने बहुतेक मराठा राजकीय व्यस्तता नसल्याने तसेही खवळलेले किंवा रिकामे बसून होते आणि महायुतीला मराठा आंदोलन असे महागात पडले…
www.vikrantjoshi.com
पार पडलेल्या ग्राम पंचायती निवडणुकांचे जवळपास सारेच निकाल आता हाती आलेले असल्याने महायुती आणि आघाडी परस्पर स्वतःच्या विजयाची जरी खात्री देत असले तरी या निवडणुकात ग्रामीण लबाड आणि चतुर मतदारांनी अगदी शंभर टक्के राज्याच्या शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्या आघाडीला पराभवाची धूळ चारलेली आहे, भाजपा प्रणित महायुतीला फार मोठे यश मिळालेले आहे पण भाजपाच्या चिन्हावर किंवा भाजपा नेत्यांनी कोठेही प्रचारात प्रत्यक्ष भाग घेतला नसल्याने तसेही हे महायुतीचे यश असे म्हणणे म्हणजे आमच्या उदय तानपाठकमुळे इंग्लंड च्या राणीला दिवस गेलेत म्हणण्यासारखे, जर महायुती ऐवजी पवार उद्धव आघाडी सत्तेत असती तर हेच उलट झाले असते घवघवीत यश शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांना मिळाले असते कारण शासनाकडून जो सततचा विविध मार्गांनी फार मोठा निधी ग्रामीण नेत्यांना कंत्राटदारांना आणि ग्रामस्थांना मिळतो त्याचे नेमके वाटप यावेळी शिंदे अजितदादा आणि फडणवीसांच्या भाजपा महायुतीच्या हातात असल्याने जेथे अपयश तेथे सत्तेत बसलेले नक्कीच भविष्यात निधी मान्यता देत नाहीत ज्यातून या निधीच्या फायद्ययाशी ज्यांचा प्रत्यक्ष संबंध येतो त्या साऱ्याच मंडळींनी जरी महायुतीला या निवडणुकात डोक्यावर घेतलेले असले तरी पुढे येणाऱ्या कोणत्याही महत्वाच्या निवडणुकात हे असेच भरघोस यश मिळेल या दिवास्वप्नात महायुतीच्या कोणत्याही घटक पक्षांनी अजिबात राहता कामा नये अर्थात ग्राम पंचायत निवडणुकांमध्ये वाट्याला आलेले मोठे अपयश, शरद पवार आणि उद्धव ठाकरे दोघांची देखील ग्रामस्थांवर असलेली पकड ढिली झाल्याचे हे नेमके चित्र आज दिसते आहे जी त्यांच्यासाठी नक्कीच आत्मचिंतनाचा विषय आहे. अत्यंत महत्वाचे म्हणजे ग्रामस्थ दिसतो भोळा पण त्याच्या मनातले नेमके कोणाला मतदान, हे कोणीही सांगणे तसे महाकठीण असे काम तरीही मोदी आणि हिंदुत्व हा विषय नक्कीच अलीकडच्या काही वर्षात ग्रामीण मतदारांचा आवडीचा आणि जिव्हाळ्याचा विषय ठरलेला आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी