कोण नवा गडी, मुख्यमंत्र्यांची उचलबांगडी !!
एकनाथजी, जे मी तुम्हाला अगदी सुरुवातीपासून सांगत आलोय त्याकडे तुम्ही नाही म्हणायला सुरुवातीला दुर्लक्ष केले, होणारी चूक जो वेळीच सुधारतो त्याला देवेंद्र फडणवीस म्हणतात, होणारी चूक तुम्ही देखील दुरुस्त केली पण वेळ निघून गेलेली आहे. अलीकडे स्वतः एकनाथ शिंदे यांनी वर्षा या त्यांच्या निवासस्थानी जो अनेक अनाहुतांचा बदमाशांचा दलालांचा उपटसूंभ मंडळींचा ठिय्या पडलेला असायचा, त्यातल्या बहुतेक मंडळींना शिंदे यांनी हुसकावून हाकलून लावले आहे आणि या अशा नालायकांना त्यांच्या निवासस्थानी यापुढे प्रवेशावर मोठे निर्बंध त्यांनी घालून ठेवलेले आहेत. दलाल हा विविध रूपात सत्ताधाऱ्यांच्या सभोवताली घुटमळत असतो त्यातले काही व्यापारी असतात काही मीडियातले काही शासकीय अधिकारी तर काही आमदार किंवा नेते असतात, थोडक्यात दलालांची अशी विशीष्ट कोणतीही जात नसते ते विविध रूपात सत्ताधाऱ्यांना आकर्षित करत असतात. आजकाल हे जे सरकारी दलाल कंत्राटदार यांनी एक नवा फंडा शोधून काढला आहे, हे हरामखोर सत्ताधाऱ्यांच्या बायका मुलांना आकर्षित करतात त्यांना मोठ्या रकमांच्या लालूच दाखवून आपलेसे करतात ज्याचा अत्यंत वाईट अनुभव तुम्हा सर्वांना माहीतच आहे कि स्वतः देवेंद्र फडणवीस यांना देखील आला होता नंतर ते कमालीचे सावध झाले आणि हा असाच अनुभव अलीकडे एकनाथ शिंदे यांना देखील आल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. राज्य बुडव्या दलालांनी थेट साध्या सरळ भोळ्या टिपिकल गृहिणी म्हणून वावरणाऱ्या सौ लता एकनाथ शिंदे यांना देखील जाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केलाय, म्हणून एकनाथ शिंदे सावध झाले आहेत आणि या अशा भानगडींपासून कोसो दूर राहा मोलाचा सल्ला त्यांनी त्यांच्या प्रिय पत्नीला दिलेला आहे….
www.vikrantjoshi.com
जे घडायला नको ते बहुधा घडण्याची मोठी शक्यता अलीकडे निर्माण झालेली आहे अर्थात विजय वडेट्टीवार किंवा पृथ्वीराज चव्हाण यांच्यासारख्या काही विरोधकांनी त्यावर याआधी जे वक्तव्य केले आहे ते प्रत्यक्षात उतरण्याची फार मोठी शक्यता निर्माण झालेली आहे म्हणजे एकनाथ शिंदे राज्याच्या मुख्यमंत्री पदावरून पुढल्या दोन महिन्यात पायउतार होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे, माझया आजवरच्या आवडत्या मुख्यमंत्र्यांपकी एक एकनाथ शिंदे, प्राण कंठाशी येईपर्यंत लोकांसाठी जनतेसाठी राब राब राबणारा हा लोकनेता कष्टाळू मुख्यमंत्री पण त्यांच्या मुख्यमंत्री पदाला कोणा दुष्टाची नजर लागलेली दिसते. एकनाथ पायउतार होण्याची माझी खात्री यासाठी पटली कारण दिल्लीत भाजपा कार्यालया शेजारी एका शासकीय बंगल्याचे अत्यंत वेगाने नूतनीकरण सुरु आहे आणि हा बंगला नव्याने केंद्रात मंत्री म्हणून शपथ घेणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्या साठी तयार केला जात असल्याची मला दिल्लीतून माहिती मिळाली आहे. मराठमोळ्या वातावरणात लहानाचा मोठा झालेला आणि आमच्यात सतत रमणारा हा नेता त्याचे दिल्लीत काय होईल देव जाणे. हे तर मित्रवर्य पत्रकार उदय तानपाठक यांना कोल्हापूरच्या आखाड्यात लंगोट कसून थेट उतरविण्यासारखे वाटते पण शाह आणि मोदी यांच्या मनातले सांगावे कोणी. मग राज्याचा पुढला मुख्यमंत्री कोण, अर्थात देवेंद्र फडणवीस नेव्हर अजित पवार, त्यावर पुढल्या भागात…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी


