युतीचे मस्त जमले, आघाडीचे फिस्कटले
एखाद्या रहस्यमय चित्रपटाचा शेवट सिनेमागृहात शेजारी बसलेल्या व्यक्तीने तुम्हाला आधीच सांगून तुमचा मूड पार बिघडवून मोकळे व्हावे पद्धतीचे माझे हे लिखाण आहे म्हणजे राज्याच्या राजकारणात पुढे नेमके नक्की निश्चित काय घडणार आहे तुम्हाला मी येथे सांगणार आहे त्यातून तुमची उत्कंठा संपणार नाही तर आणखी आणखी वाढणार आहे, तुमचे डोळे मी सांगितलेले ऐकून व्हिस्फारणार आहेत. आज या तारखेला जरी भाजपा महायुतीमध्ये वरकरणी तुम्हाला रामदास आठवले यांचा पक्ष एकनाथ शिंदे यांची शिवसेना आणि अजित पवार यांची राष्ट्रवादी दिसत असली तरी केवळ या शुल्लक महायुतीवर भाजपचे आणि नरेंद्र मोदी यांचे अजिबात समाधान झालेले नाही किंबहुना स्वतः मोदी यांनी देशातल्या आणि आपल्या या राज्यातल्या प्रमुख नेत्यांना अगदी निक्षून आणि मोठ्याने ओरडून शब्दांवर जोर देत सांगितले आहे कि देशातल्या लोकसभा निवडणुका लागण्यापूर्वी विशेषतः हिंदुत्वापासून आणि भारतीय जनता पक्षापासून देशातले मुस्लिम, शीख आणि जैन समाज का कोसो दूर आहे त्यावर आधी निरीक्षण करा नेमकी माहिती घ्या अभ्यास करा त्यांच्यातल्या मान्यवरांशी बोलणी करा चर्चा करा आणि या तिन्ही समाजाला विश्वासात घेऊन त्यांना आपलेसे करा त्यांचे भाजपा आणि माझ्याविषयीचे गैरसमज दूर करून त्यांना भाजपासंगे मुख्य प्रवाहात काहींही कसेही करून आणा म्हणाल तर हि माझी तुम्हाला आज्ञा आहे म्हणाल तर विनंती आहे म्हणाल तर आवाहन आहे अर्थात मोदी यांनी हे आव्हान केव्हाच केलेले असल्याने देशातले आणि राज्यातले भाजपा नेते आणि संघ पदाधिकारी व प्रचारक त्यावर कामाला लागले आहेत, त्यांच्या दृष्टीने हे मोठे मिशन त्यांना कसेही करून यशस्वी कडून दाखवायचे आहे…
www.vikrantjoshi.com
अत्यंत महत्वाचे म्हणजे तिकडे राज्यातली महायुती प्रबळ व प्रभावी ठरत असतांना आपण एकटे व एकाकी पडतोय हे एव्हाना उद्धव सेनेच्या आणि काँग्रेसच्या लक्षात आले असल्याने केवळ त्या दोघांची येणाऱ्या प्रत्येक निवडणुकीत मग त्या निवडणुका लोकसभेच्या असोत विधानसभेच्या किंवा स्थानिक स्वरूपाच्या, उद्धव सेना आणि काँग्रेस आघाडी हे आगामी गणित त्या दोघात ठरलेले आहे थोडक्यात आता आणि यापुढे शरद पवारांना त्यांनी मायनस केलेले असून जरी शरद पवार यांनी या आघाडीसमोर मैत्रीचा हात पुढे केला तरी शरद पवार आणि त्यांच्या राष्ट्रवादीवर फारसा विश्वास न टाकता येणाऱ्या चांगल्या वाईट परिस्थितीला तोंड देत मार्ग काढायचा असे उद्धव आणि काँग्रेस चे नक्की ठरलेले आहे याचा सरळ अर्थ असा कि यापुढे या दोघांनी शरद पवार यांना बाजूला सारून त्यांचे महत्व कमी केलेले असल्याने उद्धव ठाकरे यांच्याच सांगण्यावरून संजय राऊत यांनी थेट शरद पवार यांच्यावर तोंडसुख घ्यायला सुरुवात केलेली आहे आणि शरद पवार यांच्या देखील हे दुर्लक्षित करणे अपमानित करणे लक्षात आल्याने त्यांनी वेगळा मार्ग चोखंदळण्याचे नक्की ठरविलेले दिसते. माझी आणखी माहिती अशी कि नाना पटोले यांच्याऐवजी आमदार सुनील केदार यांची काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदी निवड जवळपास निश्चित आहे, नाव आणि तारीख तेवढे जाहीर करण्याचे बाकी असल्याने काँग्रेस अंतर्गत नेमकी तारीख कोणती त्यावर चर्चा रंगलेली पाहायला मिळते. आमदार सुनील केदार यांचे आगाऊ अभिनंदन !!
तूर्त एवढेच : हेमंत जोशी