हा अमित शाह सुटलाय, कित्येकांना घाम फुटलाय
लहानपणी आमच्या गावात बहुतेकांची लोखंडी पत्र्याने वरून झाकलेली घरे होती, असायची. दरवर्षी हमखास विशेषतः उन्हाळ्याच्या सुट्टीत प्रचंड वेगाने तुफान यायचे वादळ सुटायचे त्यात अनेकांच्या बहुतेकांच्या घरावरचे लोखंडी पत्रे त्याला आम्ही टीन म्हणत असू एखाद्या ताकदवान पक्ष्यासारखे गावभर उडून पडायचे कित्येकांच्या त्यात माना कापल्या जायच्या कित्येक गंभीर जखमी व्हायचे, वादळ शमले कि उडालेले टीन जमा करणे गोळा करणे आमचा एकमेव उद्योग असायचा त्यात यदु आघाडीवर असायचा, अशावेळी इतरांचे देखील टीन्स हाताला लागायचे, पुढे चार दिवस आम्हा भावंडांची दिवाळी असायची. दिल्लीतल्या त्या अगडबंब बेधडक बेमिसाल अमित शाह यांच्यामुळे मला ते लहानपणातले घोंघावणारे अनेकांना क्षणार्धात उध्वस्त करणारे कित्येक गावकऱ्यांना धडकी भरविणारे वादळ वावटळ आठवले त्या वावटळीत त्या वादळात त्या सुसाट वाऱ्यात आणि आजच्या अमित शाह यांच्या किंचित देखील अजिबात फरक नाही, समसमान आहे, दोन्ही धडकी भरविणारे हृदयाचा दिलाचा ठोका चुकविणारे आहेत. च्यायला ! कधी कधी आजकाल तर मलाही भीती वाटते कि या भाजपाचे मनसुबे त्यांच्या राजकीय व्यूहरचना त्यांच्या खतरनाक चाली उघड करतांना, त्यो अमितबाबा आणि हे देवेंद्र काका माझ्यावर चुकून रुसले फुगले तर. तरीही आज त्यांच्या संबंधीचा एक मोठा गौप्य्स्फोट येथे करून मोकळा होतो फक्त मला त्यांनी रस्त्यावर आणले तर दोन वेळेचे खायला तुमच्या घरी नक्की बोलवा प्लिज…
www.vikrantjoshi.com
गौप्य्स्फोट उघड करण्यापूर्वी विशेषतः या दिवसात मनापासून मनातून मला माहीत आहे सर्व सामान्य रा. स्व. संघाचे स्वयंसेवक किंवा टॉपर्स आणि राज्यातल्या भाजपाचे नेते पदाधिकारी आणि कार्यकर्ते जे अतिशय अस्वस्थ अशांत चिंताक्रांत आहेत कारण आपली सेवा पाण्यात गेली का आणि भलतेच बाहेरचे येऊन मजा लुटताहेत या ज्या काळजीने तुम्हाला ग्रासले आहे, कृपया त्यातून बाहेर या, तो तिकडे मुंबईत जो खतरनाक देवेंद्र बसलाय ना, तो तुम्हाला सर्वांना पाण्यात ढकलून स्वतः नक्की जिवंत राहणार नाही, काही दिवस हि कळ तुम्हाला नक्की सहन कारवी लागणार आहे सोसावी लागणार आहे, तुमची अवस्था गुप्तरोग्यासारखी नेमकी होणार आहे म्हणजे सहनही होत नाही आणि सांगताही येत नाही. अमित शाह आणि देवेंद्र फडणवीस यांनी समस्त शिवसेनेतल्या नेत्यांना भाजपामध्ये घेतले नाही तर त्यांनी प्रति शिवसेना उभी केली. देवेंद्र फडणवीस आणि अमित शाह यांनी राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपामध्ये घेतले नाही तर त्यांनी प्रति राष्ट्रवादी उभी केली अमित शाह व देवेंद्र फडणवीस यांनी वंचित व बीआरएस या दोन्हींचा धसका घेतला नाही तर दोघांनाही एकत्र आणून भाजपाला न मिळणारे मतदान त्या दोघांकडे वळविले आणि आता पुढल्या काही महिन्यात हेच दोघे राज्यातल्या अतिशय प्रभावी असणाऱ्या ताकदवान राष्ट्रीय काँग्रेस च्या नेत्यांना नक्की भाजपामध्ये प्रवेश देऊन ते मोकळे होणार नाहीत तर पर्यायी राष्ट्रवादी पर्यायी शिवसेना पद्धतीने येथे या राज्यात महाराष्ट्रात पर्यायी काँग्रेस जन्माला घालून ते मोकळे होतील आणि हाच तो मोठा गौप्य्स्फोट आहे नेमके हे असेच घडणार आहे. विशेषतः विदर्भ आणि मराठवाडा दोन्हीकडे मोठ्या प्रमाणावर काँग्रेस मतदार आहेत काँग्रेसप्रेमी आहेत ज्यांना आपल्याकडे आकर्षित करणे भाजपाला अदयाप आजपर्यंत शक्य झालेले नाही नव्हते होणार नव्हते म्हणून पर्यायी काँग्रेस हे आता आणखी एक बाळ जन्माला येणार आहे. या नव्याने जन्माला येणाऱ्या काँग्रेस नेतृत्वाचे नाव मात्र मला ठाऊक असूनही येथे उघड करता येणार नाही, तुम्हाला तो मोठा धक्का असेल धक्का बसेल…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी