ठाकरेंची चाल संभाजी राजे घायाळ…
वाचक मित्र मैत्रिणींनो नमस्कार, कोरोना अडीच तीन वर्षांचा भयानक भीतीदायक भीषण आणि भयावह कालखंड त्यामुळे नेहमीच आवडता छंद मला जपता आला नाही म्हणजे आवडीच्या विदेश पर्यटनात व्यत्यय आला, अलीकडे मात्र काही गुजराथी मारवाडी व्यावसायिक मित्रांसोबत बाहेर पडलो, दुबईला जाऊन आलो त्यानंतर पुढे टर्कीला जायचे होते पण 26 मेला यासाठी परत आलो कारण 27 तारखेला पुण्यात चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मुलाच्या संकेत याच्या विवाहाचा स्वागत समारंभ होता, अख्खे बावनकुळे कुटुंब माझे आवडते त्यामुळे मध्येच परदेश भटकंती सोडली आणि विवाह सोहळ्यात हजेरी लावली, बावनकुळे विषयी खूप काही लिहिता सांगता येईल पण हा नेता मित्र जोडणारा आहे त्यामुळे नागपूरपासून खूप दूरवर म्हणजे पुण्यात विवाह सोहळा असूनही स्वागत सोहळ्यातली गर्दी थांबता थांबत नव्हती, माणसे जोडणारी आणि माणसे टिकवणारी नेते मंडळी मला कायम मनापासून आवडतात. स्टेजवर खूप अतिप्रचंड गर्दी त्या गर्दीत त्या घाईत त्या गडबडीत सारे काही बाजूला ठेवून अख्खे बावनकुळे कुटुंबीय म्हणजे संकेत, ज्योती वाहिनी मुलगी जावई सारेच जेव्हा माझ्या लिखाणाचे मनापासून कौतुक करते झाले, खाली उतरल्यानंतर डोळ्यात माझ्या आनंदाश्रू आले, माझ्यासारख्या भन्नाट बिनधास्त वात्रट वाह्यात आगाऊ पत्रकाराला आणखी काय हवे ? चंद्रशेखर बावनकुळे आता संपले असे जेव्हा त्यांना स्वतःला आणि नागपुरातल्या त्यांच्या मूठभर विरोधकांना वाटत होते तेव्हाही मी त्यांना एवढेच म्हणालो, रा स्व संघ भाजपापोटी आणि तुमच्या नेत्यांविषयी श्रद्धा कायम ठेवून पुन्हा कामाला लागा तुमचा एकनाथ खडसे अजिबात होऊ देऊ नका, कल तुम्हारा है, नेमके तेच घडले आजच्या तारखेला बावनकुळे यांनी छगन भुजबळांना खूप मागे टाकले आणि राज्यातल्या ओबीसीचे मोठे मान्यवर महान नेते म्हणून पुढे आले वरून फडणवीस गडकरी यांनी त्यांना विधान परिषदेवर पण पाठवले. आता या क्षणी लिहून ठेवा कि फडणवीस जेव्हा आणखी मोठे होण्यासाठी दिल्लीत जातील, त्यानंतरच्या मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत बावनकुळे टॉपवर असतील…
नीता जेव्हा फार पूर्वी म्हणजे लग्नाआधी आमच्या सांताक्रूझ परिसरात राहायला होती, शेजार पाजारचे आसपासचे तिच्या शाळेतले तिच्या कॉलेज मधले तिला ओळखणारे जवळून बघणारे काहीशी बावळट काहीशी वेंधळी एकदम साधी सरळ खूपशी लाजाळू एकदम सिद्धी साधी मुलगी समजायचे थोडक्यात तिच्याकडे फारसे कोणाचे लक्षही नसायचे आणि याच नीताशी जेव्हा मुकेश अंबानी यांनीच लग्न केले नंतर क्षणार्धात पाणी शिंपडल्यानंतर शुद्धीवर यावे तसे तिला ओळखणार्या प्रत्येकाचे झाले जे कायम आणि अलीकडे देखील उद्धव ठाकरे बाबत घडत आलेले आहे म्हणजे अनेक नेते उद्धव यांना काहीसे बावळट खूपसे आजारी किंवा अशक्त राजकारणी समजतात आणि उद्धव यांच्या एखाद्या निर्णयावर जेव्हा ते विरोधक गारद होतात, भल्याभल्याची बोबडी वळताना मी बघितले आहे. मी उद्धव यांना वेगवेगळ्या अँगल मधून अगदी जवळून ओळखतो एकदम डेंजर माणूस आणि राजकारणी जो पवारांसारखा त्याच्या बायकोला म्हणजे रश्मी वाहिनी यांना देखील नेमका कळलेला नाही, इतरांचा तर दूरदूरपर्यंत प्रश्नच येत नाही त्यामुळे राज्य सभेच्या निवडणुकात थेट संभाजी राजे यांचा काही काळ होईना जो राजकीय मानसिक खात्मा उद्धव यांनी एका क्षणात केला अजित पवारांसहित सारे एकाचवेळी पाचही बोटे तोंडात घालून बघतच राहिले. फक्त आश्चर्य देवेंद्र फडणवीस यांना अजिबात वाटले नाही कारण त्यांनाही आता उद्धव यांच्या भूमिकेचा माझ्यासारखा तंतोतंत अभ्यास झाला आहे, आम्ही उद्धव यांची राजकीय चाल आणि खेळी क्षणार्धात ओळखतो. महत्वाचे सांगतो लिहून घ्या या राज्यात यापुढे उद्धवजी त्या फडणवीसांना राजकीय दृष्ट्या अडचणीत आणणे अशक्य कारण मोदी फडणवीस शाह यांनी त्यांना नेमके ओळखले आहे…
मात्र चाणाक्ष धूर्त हुशार चतुर बेरकी लबाड डेंजर असूनही उद्धव यांचा पाय अलीकडे त्यांच्या काही घातकी निर्णयांमुळे खोलात चालला आहे ते यापुढे खूप अडचणीत सापडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे किंवा त्यांच्या घातकी वागण्याने त्यांचा त्यांच्या काही सवंगड्यांचा किंवा काही कुटुंब सदस्यांचा लालू प्रसाद यादव होण्याची मोठी शक्यता निर्माण झालेली आहे थोडक्यात उद्धव आणि त्यांचे श्रीधर पाटणकर परब जाधव इत्यादी निकटवर्तीय फार मोठ्या संकटात अडचणीत सापडणार असल्याची माझी पक्की माहिती आहे आणि सुरुवात अनिल परब यांच्यापासून झाली आहे. संभाजी राजे यांना वाटले कि आधी मी जसे सुसंस्कृत भाजपाला वापरून घेतले तसे इतरही राजकीय पक्ष आपल्या अगदी सहज जाळ्यात अडकतील असे त्यांना वाटले पण जेथे आजही शरद पवार आणि उद्धव ठाकरे हे राज्यातले दोन महान बेरकी आणि धूर्त राजकारणी एकमेकांच्या हातात घट्ट हात धरून उभे आहेत तेथे भले भले थकले मला वाटते या दोघांसमोर नवखे संभाजी राजे म्हणजे मेहमूद समोर समीर चौगुले मोहम्मद रफी समोर पत्रकार युवराज मोहिते किंवा प्रेम प्रकरणात गणेश नाईकांसमोर राष्ट्रवादीचे जयंत पाटील. उद्धव ठाकरे यांनी स्वतःचा भाजपा अजिबात होऊ दिला नाही म्हणजे संभाजी राजे थेट उद्धव यांना वापरून घ्यायला निघाले आणि स्वतःचा मामा करून कोल्हापुरात परतले. उद्धव यांनी राज्याच्या राजाला आणि मराठ्यांच्या या अत्यंत आवडत्या नेत्याला चारी मुंड्या चिट व चीत केले पण त्यात उद्धव यांनी देखील स्वतःचे आणि शिवसेनेचे मोठे नुकसान करवून घेतले आहे म्हणजे या निवडणूक युद्धात एकाचवेळी संभाजी राजे आणि उद्धव ठाकरे दोघेही घायाळ झाले आहेत तिकडे शरद पवार मात्र एकांतात ढोल ताशे वाजवून मोकळे झाले आहेत. उद्धव यांचे मोठे नुकसान असे कि संभाजी राजे या राज्यातल्या विविध विचारांच्या प्रत्येक मराठा कुटुंबात लाडके आणि लोकप्रिय ते जसे इतरत्र लोकमान्य लोकप्रिय आहेत तसेच ते सेनेतल्या देखील प्रत्येक मराठ्याचे खूप खूप आवडते आहेत आणि येथेच उद्धव पक्षातल्या किंवा बाहेरच्या मराठ्यांचे प्रेम आणि सिम्पथी शंभर टक्के घालवून बसले आहेत. पवारांनी जसा वसंत दादा यांच्या पाठीत खंजीर खुपसल्याने अगदी आजवर देखील दादा प्रेमी पवार यांचे होऊ शकले नाहीत तीच वेळ नेमकी आता आणि या कठीण दिवसात उद्धव ठाकरे यांच्यावर नक्की आली आहेत त्यांच्या या थेट संभाजी राजे यांना धोका देण्याने राज्यातले प्रभावी मराठे यापुढे ठाकरे यांच्यापासून मोठ्या प्रमाणावर दुरावलेले असतील….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी