जिंदगी देनेवाले तेरी दुनियांसे दिल भर गया !!
मला कोणीतरी सांगितले कि तुझी मिन रास आहे त्यामुळे तुला आता साडेसाती सुरु झाली आहे त्यावर मि त्याला एवढेच म्हणालो कि मला साधारणतः वयाच्या बाराव्या वर्षी जी साडेसाती सुरु झाली ती अद्याप संपलेली नसतांना आता नव्याने हि आणखी कोणती साडेसाती ? मला भविष्यातले फारसे समजत नाही पण मला स्वतःला असे वाटते कि काही मंडळींना जन्मतः साडेसाती लागलेली असते आणि ती त्यांना आयुष्याच्या अखेरपर्यंत असते. अशी आयुष्यभराची साडेसाती बरी असते कारण माणूस कायम जमिनीवर राहतो थोड्याशा यशाने उगाच हुरळून न जाता उंच उडत नाही. वयाच्या बाराव्या वर्षांपासून न चुकता दररोज एक आव्हान, दररोज राशीला नव्या कटकटी, डोके शांत ठेवून अशी कठीण आव्हाने परतवून लावायची असतात आणि मित्र भेटले किंवा ओळखीचे भेटले कि मनापासून हसून दाद देत जगायचे असते, अगदीच कधीतरी एकटेपणा वाट्याला आला कि आवडती गाणी एकतर ऐकायची किंवा गुणगुणायची म्हणजे डोक्यावरचा ताण आपोआप हलका होतो, हे दोन्ही प्रयोग तुम्ही देखील करून बघा, ताणतणाव आपोआप क्षणार्धात कुठल्या कुठे पळून जातो. विशेष म्हणजे मला अमुक व्यक्ती त्रास देते तमुक व्यक्तीमुळे ताण येतो असा उगाच विचार डोक्यात ठेवून ज्यांच्यापासून आपल्याला त्रास होतो त्यांच्याविषयी अनुद्गार काढू नका कारण ऐकणारे चेहरा पाडून तुमचे ऐकतात पण आपली पाठ वळली कि इतरांना हसून आपले सांगितलेले सांगून मोकळे होतात ज्यामुळे आपले समाधान तर होत नाही वरून होते ती बदनामी. एका गोष्टीचा मात्र हात जोडताना मी देवाकडे हट्ट करतो कि मला अंथरुणावर पडून कुढत मृत्यू देऊ नको, नेमका मृत्यू कोणता चांगला तर तो दोन प्रकारचा, हृदयक्रिया बंद पडून पटकन तडकाफडकी मृत्यू येणे एकदम मस्त किंवा आधी वेड लागणे कारण असे म्हणतात कि वेड्या माणसाला मृत्यूचे फारसे भय नसते, मरतांना वेडी माणसे हसत खेळत जातात अर्थात काही मित्र जे मला अगदी जवळून ओळखतात ते हेच म्हणतील कि तू तर फार पूर्वीपासून ठार वेडा आहेस त्यामुळे तुला तसेही मृत्यूचे अजिबात भय वाटत नसेल, आणि हेच सत्य आहे…
तुम्ही माझ्यासारखे स्वतःला तपासून बघा तुमच्या ते लक्षात येईल कि परमेश्वर तुम्हाला आनंद आणि दुःख समसमान देत असतो. म्हणून आनंदाने हुरळून जाऊ नका आणि जेव्हा दुःख वाट्याला येतात तेव्हा डगमगू नका, स्वतःला कायम व्यस्त ठेवा तेही सकारात्मक कार्यात म्हणजे दिवसभराचा वेळ भर्रकन निघून जातो आणि दिवसभराच्या व्यस्ततेमुळे आपण एवढे थकतो कि डोळा केव्हा लागतो आपले आपल्यालाच कळत नाही, मात्र रात्री डोळे मिटण्यापूर्वी दिवसभरात जी वाईट आणि चांगली कामें जी केलीत त्याची निदान पाच मिनिटे उजळणी करा आणि जेथे चुकला असाल त्या चुका पुन्हा करू नका. आपल्या आयुष्यातले यश आणि आनंद याची तुलना अपयशी आणि दुख्खी लोकांशी नक्की करा त्यामुळे ताण कमी होऊन जीवन जगण्याचा आनंद नक्की मिळेल. आपली रेषा मोठी काढा पण इतरांची रेषा पुसण्याचा कधीही प्रयत्न करू नका. आपण कधीही एकटे नसतो कारण देवाने आपल्या सोबतीला आनंद आणि दुःख दिलेले असल्याने त्यांची छान सोबत होते. माणसाच्या हातून ज्या चुका होतात झालेल्या असतात त्याची मोठी किंमत देव येथेच आपल्याकडून वसूल करून मग आपल्याला वर पाठवतो. त्यामुळे केलेल्या चुका वारंवार हातून घडणार नाहीत याची काळजी नक्की घ्या, समाधान मिळते. मनाला जखम झाली कि खोलवर यातना होतात पण यातना क्षणिक असतात पुढे आनंदाचे देखील क्षण नक्की येतात, हे लक्षात ठेवावे आणि पुढे जात राहावे. शेवटी अत्यंत महत्वाचे म्हणजे घरात वाघ बाहेर शेळी पद्धतीने जगू नका त्याउलट जगा म्हणजे घरात शेळी बाहेर वाघ…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी