भाजपाची भूमिका मनाला धक्का…
-हेमंत जोशी
अगदी अलीकडे सोशल मीडियावर अमित विलासराव देशमुख आणि डॉ सुनील बळीराम गायकवाड या दोघांचा एकत्र एकमेकांना घट्ट चिटकून उभे असा फोटो बघितला आणि मनात अनेक असंख्य विचारांचे काहूर माजले कारण अमित हे सेम त्यांच्या दिवंगत बाप विलासराव देशमुख यांच्याच सारखे म्हणजे ज्यांच्याकडे नजर टाकतील पुढल्या क्षणी ती व्यक्ती कोणीही असो ते समोरच्या व्यक्तीला आपलेसे करून घेतील ज्याची अमित यांच्या बायकोला देखील अगदी त्यांचे लग्न झाल्या दिवसापासून भीती किंवा काळजी वाटते. येथे लातूरातले हे दोन दिग्गज नेते म्हणजे काँग्रेसचे अमित देशमुख हे भाजपच्या तेही समस्त नवबौद्ध समाजाच्या, समाजातल्या अत्यंत प्रभावी अशा गायकवाड घराण्यातून आलेल्या असलेल्या भाजपाचे माजी खासदार डॉ. सुनील यांना बिलगून चिपकून घट्ट पकडून उभे, असा तो फोटो, म्हणून मी अस्वस्थ झालो. भाजपासोबत मोठ्या प्रमाणावर नसलेल्या राज्यातल्या समस्त मराठ्यांना जसे भाजपाने आपलेसे करणे त्यांच्यावर भाजपा संस्कार घडवून त्यांना कायम आपलेसे करणे जसे अत्यंत आवश्यक आहे तीच भूमिका भाजपाने राज्यातल्या बौद्ध धर्मीय ज्ञातीबाबत स्वीकारणे खूप गरजेचे वाटते जे अगदी सहज शक्य आहे कारण बाबासाहेबांच्या प्रेमाखातर जरी राज्यातल्या बहुसंख्य दलित बांधवांनी त्यावेळी बौद्ध धर्म स्वीकारलेला असला तरी आजही मोठा कालावधी उलटल्यानंतर देखील समस्त नवबौद्ध बौद्ध समाजाच्या मनात हिंदूंविषयी आणि हिंदू देवदेवतांविषयीचे प्रेम अजिबात ओसरलेले नाही, आम्हा दलितांना दिलेल्या वागणुकीचा तो परिपाक होता, आम्ही बौद्ध धर्म स्वीकारला पण आमच्या मनातला हृदयातला हिंदू समाज देखील अजिबात दूर गेलेला नाही हे जेव्हा केव्हा किंवा अनेकदा मी बौद्ध मंडळींच्या सान्निध्यात येतो मला ते प्रकर्षाने जाणवते किंबहुना रामदास आठवले यांनी अगदी उघड भाजपाशी केलेली मैत्री आणि युती हे त्यावर ज्वलंत उदाहरण आहे…
जर रामदास आठवले अशी अगदी उघड मैत्री भाजपाशी करू शकतात तर त्यातले असे डॉ सुनील किंवा गायकवाड कुटुंब यांच्यासारखे या राज्यातले कितीतरी बौद्ध धर्मीय ज्यांना अगदी मनापासून भाजपामध्ये थेट येऊन भाजपमय नक्की व्हायचे आहे आणि मला असे वाटते कि त्यात भाजपा आणि संघ कमी पडते आहे त्यांना राज्यातल्या या दोन मोठ्या समाजाला म्हणजे मराठ्यांना व बौद्धांना आपलेसे करवून घेता आलेले नाही जे मराठे किंवा बौद्ध भाजपामध्ये सध्या आहेत ते प्रमाण अगदीच तुटपुंजे आहे विशेष म्हणजे प्रसंगी समाजाचा विरोध किंवा नाराजी पत्करून लातूर भागातले आणि बौद्ध धर्मियांमधले गायकवाड कुटुंबीय हे असे कायम भाजपामय झालेले असतांना राज्यातले भाजपा नेते का कोण जाणे या अशा प्रभावी मंडळींकडे कदाचित जाणून बुजून दुर्लक्ष करीत असल्याने जर उद्या अमित यांनी त्यांच्या पक्षाचे दरवाजे या अशा प्रभावी नवबौद्ध नेत्यांना उघडे करून दिले तर त्यात भाजपाला मोठे नुकसान नक्की होऊ शकते. भाजपाचे उच्च शिक्षित माजी खासदार डॉ सुनील, त्यांचे मोठे बंधू रस्ते विकास महामंडळाचे बॉस अनिल गायकवाड आणि अनिल यांचे अश्वजीत नावाचे चिरंजीव आणि युवा भाजपा नेते थोडक्यात या अशा प्रभावी नेत्यांकडे भाजपा वरिष्ठ का दुर्लक्ष करताहेत न उलगडणारे हे कोडे आहे. रामदास आठवले यांच्याशी युती हे जसे महत्वाचे तसे भाजपा अंतर्गत बौद्ध धर्मियांची देखील मोठी फळी उभारणे अशांना सतत प्रोत्साहित करून पुढे नेणे, श्रीमान फडणवीस साहेब इतिहास सांगतो कि बौद्ध धर्मीय शब्दाला जागणारे आणि कोणत्याही लढाईत खांद्याला खांदा देऊन लढणारे शूरवीर आहेत जरी त्यातले बहुसंख्य बांधव हे गरिबी व अज्ञानाने पिचलेले असले तरी, थोडक्यात युतीच्या भरवशावर कायम कशाला, इतर बहुसंख्य राजकीय पक्ष जे करतात तेच तुमच्याही हातून घडावे, राज्यातल्या भाजपने नवबौद्धांना अगदी मनापासून आपलेसे करून घ्यावे त्यांना देखील भाजपामय करावे आणि मला असे वाटते कि हि जबादारी विशेषतः संघ स्वयंसेवकांवर टाकावी, याच स्वयंसेवकांनी जसे पूर्वेकडील राज्यातल्या बहुसंख्य हिंदूंना ख्रिश्चन किंवा मुस्लिम होण्यापासून परावृत्त केले, येथे तर त्याच बहुसंख्य स्वयंसेवकांना समस्त बौद्ध धर्मीय मंडळींना केवळ हेच पटवून सांगायचे आहे कि जरी आपले धर्म वेगळे असले तरी विचार एकच आहेत. दुर्लक्ष केले तर मात्र आहे ते सुनील गायकवाड यांच्यासारखे प्रभावी बौद्ध नेते देखील भाजपातून दूर निघून जातील…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी