पुन्हा एकदा : उद्धव जातील कि राहतील ?
-पत्रकार हेमंत जोशी
या पंचवार्षिक योजनेत उद्धव ठाकरे यांनी पदावरून खुर्चीवरून पायउतार होण्याची इच्छा व्यक्त करणे म्हणजे समीर चौगुले यांनी विशाखा सुभेदारांना कडेवर उचलून घेण्यासारखे किंवा मुंबई पोलिसांनी हिंदुत्वाला जागून मुंबईतल्या लिंकिंग रोड वरचे कुर्ल्यातल्या मुस्लिम भंगारवाल्यांचे माहीमच्या दर्गा गल्लीतले अतिक्रमणे हटवून मुंबईकरांना मोकळा श्वास घेऊ देणे. भलेही अलीकडे काही दिवसात राष्ट्रवादीचे नेते अगदी उघड उघड म्हणत असले कि आमचेही सुरुवातीला अडीच अडीच वर्षे ठरले असल्याने आता पुढल्या मुख्यमंत्री सुप्रियाताई,तरीही राष्ट्रवादी नेत्यांच्या या म्हणण्याला सांगण्याला अजिबात अर्थ नाही, उद्धव ठाकरे त्या मुख्यमंत्री पदावरून पायउतार होणार नाहीत आणि त्यांच्या जागेवर ते सुप्रिया सुळे यांना बसवून मोकळे होणार नाहीत. उद्धव यांचे प्रकृती स्वास्थ्य आधीही तितकेसे चांगले नव्हते त्यात करोनाची भर पडल्याने त्यांनी आपली अवस्था जवळपास झाकून ठेवलेल्या बेगमसारखी करून ठेवली होती म्हणजे अगदी कमी लोकांना ते घुंगट वर करून आपला चेहरा दाखवायचे आणि क्षणार्धात झाकून पण घ्यायचे. प्रत्यक्षात मंत्रालयातली त्यांची उपस्थिती गावच्या सरपंचाच्या लाडक्या पोरासारखी होती म्हणजे जमले किंवा मूड आला तरच मंत्रालयात जायचे अन्यथा बंगल्यावर बसूनच राज्यकारभार हाकायचा. त्यामुळे महाआघाडीतल्या उपमुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांनी राज्यमंत्र्यांनी आणि विविध शासकीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मस्त मजा मारून घेतली, म्हणजे एवढी मजा कि मंत्र्यांचे साधे स्वीय सहाय्यक देखील स्वतःच्या महागड्या कार्स मधून मंत्रालयात येतात आणि बॅग्स भरून घरी जातात….
ज्यांच्या हाती सत्ता आहे त्यांना उद्धव ठाकरे तहहयात मुख्यमंत्री राहावे असे अगदी मनापासून वाटते, वीस तीस टक्के तेवढे पैसे विकास कामांवर खर्च केल्या जातात बाकी पैसे केवळ या मूठभर लोकांच्या घरी नेल्या जातात हीच वस्तुस्थिती आहे. नाही म्हणायला जे शरद पवारांच्या मनात आहे तेच यादिवसात राष्ट्रवादीचे नेते सांगत सुटले आहे कि ठरल्याप्रमाणे उद्धव यांचा अडीच वर्षांचा कार्यकाळ संपला आहे आणि लवकरच सुप्रिया सुळे राज्याच्या मुख्यमंत्री होणार आहेत पण हे असे उद्धव करून मोकळे होतील अजिबात शक्यता नाही किंबहुना असा प्रस्ताव शरद पवारांकडून त्यांना आलाच तर उद्धव सरकारमधून बाहेर पडतील राजीनामा देऊन मोकळे होतील. अर्थात उद्धव आजही मुख्यमंत्री म्हणून नावापुरते कारण सारा कारभार तेही अगदी उघड शरद पवारांच्या सूचनांवरून आणि उरला सुरला कारभार अजितदादांच्या गढीवरूनच प्रामुख्याने हाकला जातो आणि हीच वस्तुस्थिती आहे त्यामुळे पवारांनी वास्तविक सुप्रिया यांना मुख्यमंत्री करण्याच्या भानगडीत पडू नये उलट मुसलमानांचे लाड आणि त्यांना आवडणारे निर्णय राष्ट्रवादीचे शरद पवार शिवसेनेच्या उद्धव ठाकरे यांच्या खांदयावर बंदूक ठेवून मान्य करवून घेत असल्याने हिंदूंची नाराजी मराठी माणसाची अस्वस्थता उद्धव यांना शिव्याशाप देते आहे आणि पवार नेहमीप्रमाणे गालातल्या गालात हसून मोकळे होताहेत. उद्धव यांची प्रकृती यादिवसात तोळामासा त्यामुळे ते राजीनामा देण्याची मोठी शक्यता असली तरी त्यांच्या नंतर ते नक्कीच एखाद्या चतुर स्त्रीला मुख्यमंत्री करून मोकळे होतील पण त्या सुप्रिया सुळे नक्की नसतील कदाचित त्या रश्मी ठाकरे असतील. होय ! उद्धव यांच्या अगदी मनात आहे कि त्यांच्या चतुर असलेल्या पत्नीला मुख्यमंत्री करून मोकळे व्हायचे….
अगदीच तसे करणे जमले नाही तर त्यानंतर प्रामुख्याने प्रत्येक कार्यात विजयश्री खेचून आणणार्या ठाण्यातल्या एकनाथ शिंदे यांचा विचार केल्या जाईल. एक ओरॅटरी सोडल्यास म्हणजे भाषण करतानाचा कमकुवतपणा सोडल्यास यश म्हणजे एकनाथ शिंदे अशी त्यांची राज्याला ओळख आहे म्हणजे जेथे कमी तेथे आम्ही असे एकनाथ शिंदे यांच्याबाबतीत साऱ्यांचेच मत असल्याने आणि त्यांना खुद्द सेनेतून देखील आणि काँग्रेस व राष्ट्रवादीतुनही फारसा विरोध नसल्याने एकनाथ यांच्याकडे अजातशत्रू म्हणून बघितल्या जाते शिवाय शिवसेनेचे चिन्ह वाघ आणि शिंदे कामालाही वाघ असल्याने या अत्यंत धूर्त पण एकनिष्ठ नेत्याकडे उद्धव उद्याचा मुख्यमंत्री म्हणून बघतात, लोकांनी शिंदे बाबतीत उद्धव यांचे काही गैरसमज करून दिले होते पण शिंदे यांनी मी तसा नाही हे उद्धव यांना आपल्या कृतीतून सिद्ध करवून दाखविले असल्याने अलिकडल्या काही दिवसात एकनाथ शिंदे हे उद्धवजींचे एक निकटवर्तीय म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. जशी तुम्हाला कधी माधुरीच्या बाहुपाशात तर कधी कतरिनाच्या मिठीत तर कधी करीनाच्या कुशीत अशी जी स्वप्ने पडतात तेच म्हणे उद्धवजींचे म्हणजे त्यांना जशी रष्मीवहिनी किंवा एकनाथ शिंदे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतांनाची स्वप्ने पडतात तशी त्यांना कधी सुभाष देसाई अनिल परब आदित्य ठाकरे इत्यादींवरून देखील स्वप्ने पडतात पण प्रत्यक्षात रश्मी ठाकरे किंवा एकनाथ शिंदे या दोनपैकी एक नावावर ते शिक्कामोर्तब करून मोकळे होतील….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी