राजकीय लबाडी लाथाडी भानगडी आणि कुरघोडी : भाग २: पत्रकार हेमंत जोशी
सर्वाधिक खडूस कोण असा प्रश्न जर मला कोणी विचारलाच तर उत्तर तयार आहे, क्रमांक एक वर समस्त कोकणस्थ ब्राम्हण सरकारी अधिकारी जसे सीताराम कुंटे इत्यादी आणि क्रमांक दोनवर एकमेव समृद्धीचे राधेश्याम मोपलवार,वळले तर सूत नाहीतर भुतासारखे एखाद्याच्या मागे लागून मोपलवार आपली ताकद दाखवून मोकळे होतात. निवृत्त पण एका अशाच खडूस कोकणस्थ अधिकाऱ्याचा मला आलेला मेसेज, हेमंत तुमचे लिखाण मी मुद्दाम वाचतो. तुमच्या लिखाणाची शैली मला खूप आवडते. ज्या व्यक्तिमत्त्वाबद्दल तुम्ही लिहिता ते सर्वसामान्य माणसाला भावेल असे असते. लिखाणाच्या आधी तुम्ही जे दाखले देता ते वैचारिक असतात म्हणून मनाला पटकन पटतात. स्व. श्रीकांत ठाकरे, प्रमोद नवलकर, पु. ल. देशपांडे तसेच हल्लीच्या काळातले सर्वश्री शिरीष कणेकर, द्वारकानाथ संझगिरी व आपले लिखाण मी आवर्जून वाचतो. मला वाचनानंद देत असल्याबद्दल मी आपले मनापासून कौतुक करतो व आभार मानतो., हे असे कायम कितीतरी छान छान अभिप्राय मला पाठविले जातात तेव्हा उर भरून येते आणि देवाला म्हणतो, जेव्हा केव्हा शंभर दोनशे वर्षांनी मला पुन्हा माणूस करशील तेव्हाही मला पत्रकार कर दुसरे काहीही करू नको आणि हो मला माहित आहे कि सुरुवातीला काही वर्षे तू मला वेगवेगळ्या योनीत पाठवशील म्हणजे मुंगळा करशील, डुक्कर मांजर किडे माकोडे गेंडा कोंबडा फुलपाखरू हत्ती माशी चावणारा कुत्रा म्हैस बैल इत्यादी काहीही करशील पण जेव्हा केव्हा मला माकड करशील माझ्या सोबतीने दोघांना अवश्य माकड बनवून पाठवशील त्यातला एक मित्रवर्य उदय तानपाठक आणि दुसरा माझा धाकटा भाऊ पत्रकार यदु जोशी, का कोण जाणे मला या दोघांच्या संगतीने माकड व्हायला आवडेल कदाचित आजचे त्यांचे माकडचाळे मला मनापासून भावत असावेत. श्रीमान नारायण राणे ७ जुलैला केंद्रात मंत्री झाले त्यानंतर त्यांनी जसे मोदी शाह नड्डा यांचे जाहीर अगदी मीडिया समोर येऊन आभार मानले त्यात आणखी एका नावाची भर होती ते होते देवेंद्र फडणवीस. होय, फडणवीस होते म्हणून राणे यांचे राजकीय पुनर्वसन तेही भाजपामध्ये दिमाखात झाले. पण देवेंद्र आणि राणे यांची अगदी जवळून घडलेली लव्ह स्टोरी मी बघितली असल्याने ती चित्रपटाला शोभावी अशीच होती म्हणजे आधी गैरसमज नंतर जसे नायक व नायिका एकमेकांना घट्ट बिलगतात, मस्त मिठीत घेतात, एकमेकांच्या अंगावर गडाबडा लोळतात वरून प्रेमाच्या आणाभाका खातात ते तसे या दोघात घडले. नारायण राणे आणि त्यांच्या मुलांना भाजपामध्ये प्रवेश देण्याबाबत सुरुवाती सुरुवातीला फडणवीसांच्या ते फारसे मनात नव्हते पण राणे यांना समजावून सांगितले आणि नेमके समजावून घेतले तर त्यांच्यासारखा जीवापाड प्रेम करून जबाबदारी निभावणारा दुसरा नेता या राज्यात नाही हे फडणवीसांचे ब्रेन वॉशिंग नेमके कोणी केले त्यांना तुम्ही अवश्य खाजगीत विचारावे आणि राणेंच्या बाबतीत देखील नेमके तेच घडत होते म्हणजे सुरुवातीला त्यांचे फडणवीस यांच्या बाबतीतले संबंध चित्रपटात शोभणाऱ्या लव्ह स्टोरी सारखेच होते पण राणे यांना देखील विचारा कि फडणवीस यांनी एकदा का एखाद्याला जवळ घेतले कि ते कसे जीवाला जीव देणारे, त्यांना नेमके कोणी विश्वासात घेऊन सांगितले, काम होण्याशी मतलब आणि त्या दोघात हळूहळू दृढ प्रेम संबंध जुळत गेले विशेष म्हणजे ज्या वाईट पद्धतीने राणे यांच्या दोन्ही मुलांना बदनाम केले जात होते त्या दोघांनी देखील आम्ही वेगळे कसे हे वेळोवेळी फडणवीस यांना सिद्ध करून दाखविले आणि आज काय घडले तर फडणवीसांनी प्रेस्टिज इश्यू करून नारायण राणे राज्यासाठी व राष्ट्रासाठी महत्वाचे कसे त्यांच्या श्रेष्ठींना पटवून दिले आणि मला खात्री आहे त्यावेळेचे राणे बाप व दोन्ही बेटे फार फार वेगळे असतील आणि पुन्हा एकवार राजकारणात खूप पुढे निघून जातील. खास करून त्यांच्या समोर विशेषतः कोकणात शिवसेना व राष्ट्रवादी दोन्हीचे तगडे आव्हान आहे. एकीकडे उदय सामंत भास्कर जाधव खासदार राऊत अनिल परब इत्यादी तगडे शिवसेना नेते तर दुसरीकडे बलाढ्य सुनील तटकरे कोकणातल्या काहीशा लुळ्या पांगळ्या भाजपासमोर आव्हान देऊन उभे आहेत, भाजपाच्या भाषेत सांगायचे झाल्यास हि कौरव पांडवांची राजकीय लढाई आहे आणि राणे यांना आपण पांडव कसे सिद्ध करून दाखवायचे आहे. एवढ्यावरच हि लढाई थांबत नाही तर मुंबई आणि राज्यात इतरत्र या मर्द मराठा नेत्याला आपली ताकद कशी मोठी हेही सिद्ध करून दाखवायचे आहे. नारायण राणे यांचे मानसिक संतुलन न बिघडता त्यांचे प्रकृती स्वास्थ्य कसे नजीकच्या काळात टिकून राहील याची मोठी काळ्जी त्यांच्या कुटुंबाला नक्की घ्यायची आहे अन्यथा राणे यांना बाहेरच्या विरोधकांना तोंड देणे अवघड ठरू शकते. अर्थात वाईट काळ एखाद्या कुटुंबाला नक्की शहाणे करून सोडत असतो त्यामुळे यापुढे श्री नारायण राणे आणि त्यांची दोन्ही मुले वेगळ्या चांगल्या पद्धतीने समोर दिसणारे अवघड जड कठीण आव्हान खुबीने व युक्तीने पेलून मोकळे होतील हे मी त्या साऱ्यांना अगदी जवळून ओळखतो म्हणून येथे मोठ्या विश्वासाने तुम्हाला सांगतो आहे…
क्रमश: हेमंत जोशी