उदास मन आणि कर्णिकांचा फोन : पत्रकार हेमंत जोशी
उदास उध्वस्त निराश नाराज भकास होण्याचे कितीतरी प्रसंग आजवर ओढवले असतील किंवा सारे काही मिळवूनही काही केल्या उदास निराश होण्याचे प्रसंग माझ्यावर वारंवार का ओढवतात कळत नाही कदाचित एकीकडे चांगले यश आणि दुसरीकडे ज्यापद्धतीने यश मिळविले त्याची परतफेड एकाचवेळी त्या परमेश्वराची माझ्याशी कायम सतत देवाणघेवाण सुरु असते त्यामुळे सतत काही महिने तर सोडा पण काही दिवस देखील मी अनेकांसारखा गर्वाने माजून रस्त्याने ताठ मानेने फिरतोय असा आनंद कधी आजवरच्या आयुष्यात मला दुर्दैवाने लुटता आलेला नाही, हरकत नाही, एक बरे आहे कि देव मी केलेल्या पापांची येथेच माझ्याकडून परतफेड करवून घेतो आहे. एकीकडे मोठे यश आणि दुसरीकडे ज्यासाठी मी हे यश मिळविले नेमके तेच सुख वाट्याला येत नाही, नियतीचा खेळ हा असा असतो. दिवसभर फोन सतत खणखणत असतो, राज्यातल्या विविध ठिकाणाहून मुंबईतून नेमकी माहिती आणि पुरावे देणारे सतत बोलत असतात कारण त्यांना माहित असते एकतर हेमंत जोशी लिहिणार नाहीत पण दिलेल्या मिळालेल्या माहितीवर एखाद्या कडून तडजोड नक्की करणार नाहीत त्यामुळे मोठ्या विश्वासाने एवढी माहिती जमा होते कि गेली कित्येक महिने बाहेर न पडता देखील सतत माहिती मिळत असते न थांबता लिखाण अव्याहत सुरु असते. वाचन लिखाण गाणी ऐकणे इत्यादी मुळे मन रमते किंवा ज्यामुळे मन उदास होते किंवा असते ते कारण ते दुःख कुठल्या कुठे पळून जाते…
आज ६ जूनची रविवार अशीच कुठल्याशा नेहमीच्या अपेक्षित कारणामुळे उदास झाली होती. एखाद्या कायमच्या जखमेची आपल्याला नक्की सवय होत असते पण जखमच ती, नेहमीप्रमाणे भळाभळा वाहायला लागली कि आपोआप त्या जखमेकडे लक्ष जाते आणि मन व तन क्षणार्धात उदास होते अशावेळी शून्यात नजर लावून बसायचे आणि एकतर काहीतरी छानसे मनोरथ रचायचे किंवा अगदी लहानपणापासूनच आपल्या नशिबी हे असे का बरे दुःख चिकटलेले त्यावर खिन्नपणे विचार करीत शेवटी देवाला शिव्या देत किंवा जाब विचारत शांतपणे पडून राहायचे. आजही माझ्याबाबतीत नेहमीचे नेहमीप्रमाणे काहीतरी कारण घडले आणि दुखेपर्यंत डोके विचारात गुरफटले पण तेवढ्यात दुपारी अनुप कर्णिकचा फोन आला आणि त्याच्या या फोन येण्याने उदास मन क्षणार्धात उमलले फुलले आनंदित झाले. अनुप उत्तम व्यावसायिक आणि कोणालाही न घाबरणारा व्यवसायातला दादा माणूस. समोरचा मग कोणीही असो त्याला थेट अंगावर घेऊन आपले काम यशस्वी पार पाडणारा माझा म्हणाल तर एकदम टग्या मित्र. अनुप म्हणाला बाबांना तुझ्याशी बोलायाचे आहे त्यानंतर त्याचे बाबा माझ्याशी खूप वेळ बोलत होते विशेष म्हणजे ते माझे लिखाण कसे बारकाईने वाचतात त्यातले संदर्भ देऊन माझ्या लिखाणाचे तोंड भरून कौतुक करीत होते. अनुपचे बाबा साधेसुधे नाहीत ते मराठी प्रांतात जगभर आवडते लाडके आणि मोस्ट पॉप्युलर आहेत. अनुपचे बाबा आत्ता ९० वर्षांचे असूनही त्यांचा उत्साह थेट विशीतल्या तरुणाला लाजवणारा आहे आणि त्यांचे नाव आहे, लेखक मधू मंगेश कर्णिक !! ९० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवी लिखाणातला तपस्व्याने तुमच्या लिखाणाचे न थांबता कौतुक करणे, या अशा आठवणींनी तर मन पुन्हा लढायला लिहायला झेप घेते आणि मनातली उदासी नाराजी कुठल्या कुठे पळते…
आजचा रविवार शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहणारा कारण हेमंत तुमचे लिखाण अनेकवेळा आचार्य अत्रे यांची आठवण करून देते असे थेट तेही मधू मंगेश कर्णिक मला म्हणाले आणि डोळ्यात आपोआप आनंदाश्रू तरळले. कितीतरी वेळ अगदी खड्या आवाजात दमदार शब्दात नव्वद वर्षांचे कर्णिक जेव्हा माझ्याशी बोलत होते, त्यांच्या शंभरीला उपस्थित राहण्याचे भाग्य मला मिळो मी देवाला मनातल्या मनात म्हटले. कर्णिक साहेब या वयातही वाचतात सारे संदर्भ जसेच्या तसे सांगतात, ते त्यांच्या वडिलांसारखे मंगेश कर्णिक त्यांच्यासारखेच मनाने कणखर कसे याची जाणीव मनाला आपोआप होते. कर्णिक साहेब आपल्याला मी दीर्घायुष्य चिंतितो, मी आपला मनापासून मनातून खूप खूप खूपच आभारी आहे. माझ्या लिखाणातील तुम्ही केलेल्या कौतुकाने मी भारावून गेलो आहे, तुम्हाला पुन्हा एकवार वाकून नमस्कार…