शी ! तुम्हीही हेमंत जोशी : पत्रकार हेमंत जोशी
मी सात बंगला परिसरात राहायला होतो तेव्हाची हि गोष्ट. काहीच महिन्यांचे पिल्लू कुत्रीला म्हणजे त्याच्या आईला विचारतांना मी ऐकले कि आई आई त्या घोळक्यातले नेमके माझे बाबा कोणते ? त्यावर कुत्री म्हणाली, बेटा नेमके सांगणे अशक्य, कारण त्यातले बहुतेक सारेच मला मागच्या मागे येऊन भेटून खेटून गेलेले कारण एकतर मी दिसायला सुंदर वरून आंधळे प्रेम करणारी. हे उदाहरण मला उत्तम दर्जा असूनही हवे तसे यश पदरात पाडून घेण्याची किमया न साधलेल्या असंख्य कित्येक बहुसंख्य लेखक लेखिका कवी आणि कवयित्री वरून आठवले म्हणजे त्या कुत्रीसारखे त्यांना पण नेमके माहित असते कि आपले काव्य किंवा लिखाण अत्यंत दर्जेदार व वाचनीय आहे पण केलेले लिखाण किंवा काव्य पुढे कसे आणायचे त्यातून पैसे व नाव कसे कमवायचे हेच नेमके बहुतेकांना जमत नाही किंवा जमलेले नसते त्यामुळे त्यांच्यातले अत्योत्तम असूनही त्यांना रोहिणी निनावे व पु काळे आचार्य अत्रे ना धो महानोर होता आलेले नसते हे म्हणाल तर अशा अत्युत्तम लेखक किंवा कवींचे किंवा विविध विषयांवर प्रभुत्व ठेवून लिखाण करणाऱ्यांचे मोठे दुर्दैव म्हणावे. कित्येक प्राध्यापकांचे त्यांच्या विषयात प्रभुत्व असते पण त्यांना माझ्या धाकट्या भावासारखे म्हणजे नागपुरातल्या अनिरुद्ध जोशी सारखे प्रोफेशनली यशस्वी करिअर घडवता येत नाही किंवा आलेले नसते. तो नागपुरातलाच गायक अनिरुद्ध जोशी वेगळा बरे का, आमचा अनिरुद्ध साधे गाणे जरी गुणगुणला तरी त्याची बायको त्याला लाटणे दाखवते किंवा त्याच्या दोन्ही मुली घाबरून किंचाळायला लागतात पण भावाचे इंग्रजी शिकवणे इतके उत्तम कि विद्यार्थी शिकतांना मंत्रमुग्ध तर होतातच पण आमचा यदु नावाचा भाऊ सुद्धा त्याच्या हाताखाली शिकून उदय तानपाठक पद्धतीचे इंग्रजी पुढे बोलू लागला. अनिरुद्ध कबूल करतो कि हसत खेळत शिकवण्याची कला तो माझ्याकडूनच शिकला कारण मी एका जमान्यात दिवसभरात तेही वयाच्या १९-२० व्या वर्षी इंग्रजी शॉर्टहँड हा अत्यंत कठीण विषय अतिशय सोपा करून हजारो विद्यार्थ्यांना शिकवत असे. त्याने ते अगदी जवळून बघितलेले होते, आज इंग्रजी विषयात हातखंडा असलेला प्राध्यापक म्हणून माझ्या या भावाकडे नागपुरात बघितले जाते. अगदी अलीकडे माझी जर्मनी फ्रँकफर्टला असलेली मराठी मैत्रीण सांगत होती कि आपली ओळख होण्यापूर्वीही मी आपले लिखाण नियमित वाचत असे त्यावर कसे काय मी विचारले असता ती म्हणाली इकडे व्हॉट्सअपच्या माध्यमातून कायम तुमचे लिखाण येथल्या मराठी मंडळींमध्ये मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असते, असे कानावर पडले कि समाधान मिळते…
आजतागायत माझे जवळपास एकोणवीस हजार फेसबुक फ्रेंड्स आहेत ते आणखी झपाट्याने वाढतील मला खात्री आहे, हे फेसबुक फ्रेंड्स त्यातले बहुसंख्य उत्तम कवी कवियित्री लेखक व लेखिका आहेत पण त्यांनाच ते माहित नाही कि त्यांचा दर्जा केवढा वरचा आहे त्यामुळे अशांना स्वतःच्या लिखाणाचा नेमका प्रोफेशनली कसा फायदा करवून घ्यायचा माहित नाही मात्र या मंडळींच्या काव्याची लिखाणाची मी नक्की दखल घेणार आहे त्यांचे लिखाण अत्युत्तम कसे मुद्दाम त्यांच्या नावानिशी लिहिणार आहे. मला वाटते लिखाणातून ज्यांना उत्तम व्यक्तिचित्रण जमले त्या श्रद्धा बेलसरे किंवा अनिता पाध्ये होतात अर्थात श्रद्धाताई यांनी आपली अख्खी हयात एक नामवंत अधिकारी म्हणून महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क विभागात घालविली असल्याने आपले लिखाण नेमके कसे असावे त्यांना ते उत्तम साधले आहे. अगदी अलीकडे त्यांनी धुळ्यातल्या त्यांच्या माझ्यासाठी अनोळखी असलेल्या मैत्रिणीचे जे वर्णन केले, वाचून त्यांची ती मैत्रीण हुबेहूब डोळ्यासमोर उभी राहिली. लिखाण हे असे यशस्वी असावे. अन्यथा बहुतेकांचे लिखाण घरातल्या कुटुंब सदस्यांपुरते मर्यादित ठरते ज्यामुळे घरातल्यांची पण डोकेदुखी वाढते. लिखाण करणारे लिखाण करत सुटतात पण त्यांना त्यांचेच माहित नसते कि आपले लिखाण इतरांसमोर कसे हास्यास्पद ठरत असते. बहुतेकवेळा भीक नको पण कुत्रे आवर पद्धतीने इतर त्यांना सहन करीत असतात मी सांगतो त्या किस्स्यासारखे. धर्मेन्द्रनाथ नावाचे आमच्या विदर्भात एक बाबा होते, गोखले आडनावाचे एक गृहस्थ घरातल्या कटकटींना अडचणींना कंटाळून त्यांच्याकडे गेले. धर्मेन्द्रनाथ बाबा गोखलेंना म्हणाले, उद्या पुन्हा याचवेळी येथे या आणि येतांना घरातल्या अंगणातली मूठभर माती घेऊन या, गोखले दुसरे दिवशी मुठीत माती घेऊन आले, बाबांनी ती माती आपल्या हाती घेत ते म्हणाले, हिम्मत असेल तर ऐक त्यावर गोखल्यांनी होकारार्थी मान डोलावली. धर्मेन्द्रनाथ सांगू लागले कि दोन्ही मुले तुझी नाहीत शेजारच्या दत्ताभाऊंची आहेत शिवाय तुझ्या मुलीचे सध्या एकाचवेळी अजय पाटील आणि गजानन लिम्बदेव या दोघांसोबत अफेअर सुरु आहे आणि तू बाहेर पडला रे पडला कि घरी कोणीही नसतांना शेजारचे डॉ दांडे येऊन तुझ्या उफाड्या बायकोशी गप्पा मारत बसतात जिला सध्या त्यांच्यापासून दिवस गेलेले आहेत. बाबांच्या या सांगण्यावर (गोखले असूनही ) गोखले मोठ्यांदा हसायला लागले त्यावर हसायला काय झाले धर्मेन्द्रनाथ यांनी त्यांना विचारताच गोखले म्हणाले अहो मी निपुत्रिक आहे आणि त्यावर उपाय काय, तुम्हाला विचारायला आलो होतो पण येतांना माझ्या अंगणातली माती आणायला विसरलो म्हणून आयडिया केली, तुमच्याच अंगणातली माती मुठीत घेतली. आपण लिखाणात नेमके कोठे हेच बहुतेकांना त्या बाबासारखे माहित नसते म्हणून आधी आत्मचिंतन करा आणि आपल्यातल्या उत्तम गुणांना लिखाणाला प्रोफेशनल स्वरूप द्या, खिसे भरतील आणि इज्जत व समाधान पण मिळेल…