पापांची परतफेड : पत्रकार हेमंत जोशी
करोना महामारीने त्यातून उद्भवलेल्या संकटांनी माणसाला नको नको ते करायला लावले आहे लावते आहे, कितीही शांत राहण्याचा प्रयत्न केला तरी सतत प्रत्येकाच्या मनात नको नको ते विचार येतात अशावेळी घरातल्या बुजुर्ग मंडळींचे प्रत्येकाने ऐकावे आणि त्यांच्या सल्ल्यानुसार वागल्यास तुमची संकटे आणि दुःख नक्की कमी होतील पण नवी पिढी जुन्यांचे अजिबात ऐकायला तयार नाही, मी अगदी अबोला धरला चिंतेत आहे हेही सांगितले तरी मोठा मुलगा त्याच्या कुटुंबासहित काश्मीरला गेला वरून तुम्हाला काय समजते सांगतांना वाकुल्या पण दाखवून गेला, धाकटा मुलगा पण ऐकायला तयार नव्हता काढली गाडी कि निघाले सहकुटुंब बाहेर राउंड मारायला शेवटी तेच घडले, दोन वर्षांच्या नातवापासून तर मोठ्या मुलापर्यंत सर्वांना कोरोनाने गाठले, देवाची कृपा त्यातून ते बाहेर आले पण कोरोना संदर्भात बारीक सारीक माहिती ठेवणारा पत्रकार आणि बाप मी, मला कोणत्या आणि केवढ्या चिंतेने ग्रासले आहे ग्रासले असेल हे माझे मलाच माहित, आजवर आयुष्यात एवढी संकटे व दुख्खे पचवलीत कि त्याची पुनरावृत्ती अंगाचा थरकाप उडवते पण मला वाटते कि प्रत्येक घरातल्याच नव्या पिढीला त्यासी घेणे देणे नसते. हात जोडून सांगतो कि आई वडिलांचा सन्मान करू नका भलेही पण त्यांचा अपमान तरी करू नका अन्यथा ते तुमच्यातून फार लवकर वर निघून जातात. मी पोटच्या मुलांना हेच सांगतो कि संयम पाळणे आवश्यक आहे कारण यश मिळविणे खूप सोपे आहे पण त्याचा मद चढणे अत्यंत डोक्याचे आहे असते. आपण काहीतरी वेगळे आहोत फार मोठे आहोत असे स्वतःला वाटायला लागले कि उर्वरित आयुष्याचा आणि कुटुंबाचा खेळखंडोबा व्हायला उशीर लागत नाही. माझी मुले व कुटुंब सदस्य हाताबाहेर गेले आहेत असे अजिबात नाही पण अननुभवी ते, नको ते करायला जातात आणि नंतर पश्चाताप करतात म्हणून प्रत्येकच घरातल्या नव्या पिढीने जुन्यांचे ऐकावे…
या कोरोनाने प्रत्येकालाच नको नको ते करायला लावले आहे म्हणजे मराठी किंवा हिंदी भंगार सिरियल्स म्हटल्या कि माझ्या कपाळावर आठ्या यायच्या पण घरात बसून करणार काय तर मी पण सिरीयल बघायला लागलो, अहो माझ्या ओळखीच्या देवधर्म सतत करणाऱ्या एक बाई तर वेळ जावा म्हणून चक्क विडी ओढायला लागल्या आहेत तर एक मित्र जेव्हा बघावे तेव्हा खाली ढुंगण आणि वर पाय करून विविध स्तोत्रे म्हणत असतो. माझा एक उद्योगपती मित्र कायम त्याला आचार्यांच्या हातचे खावे लागे त्यातून तो जेमतेम एक पोळी आणि थोडीशी भाजी खात असे सध्या आचारी नसल्याने कित्येक वर्षानंतर घरातल्या स्त्रिया स्वयंपाक करायला लागल्याने आता हा मित्र गुटगुटीत ग्राईप वॉटर बाळ दिसायला लागला आहे. अख्खा एक आठवडा जेव्हा माझा होशील ना मध्ये केसरी टूर्सची खुबीने जाहिरात करण्यात येत होती त्यादरम्यान अनेकांना हेच वाटत होते कि माझा होशील ना मालिके ऐवजी जर ते नाटक असते तर त्या नाटकातल्या प्रत्येक पात्राला प्रेक्षकांनी जोडे चपला सडके टमाटे नक्की फेकून मारले असते, ग्राहकांकडून कित्येक पटीने पैसे उकळणाऱ्या केसरीची अशी कलावंतांकडून चिप जाहिरात, मी त्यातला कलाकार असतो तर क्षणार्धात मालिकाच सोडली असती. मराठी माणूस जणू काही बघतच नाही किंवा त्याला टुरिझम मधले काहीच कळत नाही इतक्या दळभद्री पद्धतीने मालिकेत केसरी टूर्सची जाहिरात करण्यात आली बघून एक दिवस तर मला केसरीचे कौतुक बघता बघता वांती झाली. सध्या दर्शकांना घरी बसून राहावे लागते म्हणून तेच त्या हवा येऊ द्या मालिकेचे, तेच ते रटाळ विनोद आणि डॉ साबळे यांचे थर्डग्रेड तेच ते कंटाळवाणे संचलन पण केवळ वेळ जाण्यासाठी प्रेक्षक काहीही उपाय नसल्याने हे असे भंगार कार्यक्रम बघत असल्याने यांना उगाचच वाटते कि आपल्या मालिका किंवा मनोरंजनाचे कार्यक्रम प्रेक्षकांना आवडतात पण तो त्यांचा गॉड गैरसमज आहे….
शेवटी अत्यंत महत्वाचा मुद्दा त्या नृत्य स्पर्धांचा. लहान मुलांकडून रिस्की कवायती नकोत म्हणून एकेकाळी सरकारने कायदा हाती घेऊन सर्कस मध्ये काम न करण्यासाठी लहान मुलांवर बंदी आणली होती पण सध्याच्या विविध लहान मुलांच्या वेगवेगळ्या वाहिन्यांवर चालणाऱ्या जीवघेण्या थरारक नृत्य स्पर्धा आणि एकेकाळी सर्कस मध्ये काम करणारी लहान मुले यात माझ्या मते अजिबात फरक नाही म्हणून मला असे वाटते कि या अशा जीवघेण्या स्पर्धेशी संबंधित प्रत्येक व्यक्तीवर सरकारने फौजदारी गुन्हा खटला दाखल करायला हवा ज्यात सरकारने सर्वप्रथम त्या मुलांच्या आई वडिलांवर देखील गुन्हा दाखल करणे अत्यावश्यक आहे. एखाद्याची सटकली आणि त्याने जर न्यायालयात दाद मागितली तर शंभर टक्के अशा जीवघेण्या नीच स्पर्धा न्यायालय नक्की बंद करून मोकळे होईल, फक्त एखाद्या लहान मुलाचा किंवा मुलीचा जीव जाण्याआधी हे घडायला हवे. काय त्यांचे थरारक नृत्याविष्कार, बघणार्या प्रत्येकाला नक्की हेच वाटते कि अमुक या स्टेपला स्पर्धकांचा जीव कसा वाचला, केवळ पैसे कमावण्यासाठी हे असे लहान मुलामुलींच्या आयुष्याशी या अशा नृत्य स्पर्धेतून खेळणे जीवघेणे आणि किळसवाणे वाटते…