दादा आणि काका : भाग १ : पत्रकार हेमंत जोशी
अमिताभ चार ठिकाणी कामाला जातो त्यामुळे त्याला कोरोना होणे अपेक्षित होते पण अभिषेकला देखील कोरोना होतो म्हणजे काय? अलीकडे बायकोने विचारले, तुम्हाला सुंदर बायका आवडतात कि हुशार? त्यावर मी भान राखत पटकन म्हणालो, मला फक्त तू आवडते. गेले आठ दिवस झाले असतील मी मित्रांना सांगत सुटलोय कि मी माझ्या घरात माझ्या आवडीचे पदार्थ नेहमीच खातो. पॉझेटिव्ह हा एकमेव छानसा इंग्रजी शब्द होता पण कोरोनाने त्यालाही खराब करून ठेवले. शेजारची शेवंता मोलकरीण आमच्या मोलकरणीला सांगत होती कि मी साहेबांना राखी बांधली तर कंजूष साहेबांनी फक्त पन्नास रुपये दिले पण बाईसाहेबांनी मात्र खुश होऊन पाचशे रुपये दिले, बघूया पाडव्याला काय घडणार आहे ते. दिवस सिरीयस आहेत आणि मला नको त्या वेळी चुटके आठवताहेत. पवारांच्या घराण्यात सारे आलबेल झाले असे वरकरणी फक्त दिसते आहे लक्षात घ्या कारण जेथे नाते किंवा नातेवाईक तेथे एकदा का संशयाचा धूर निर्माण झाला कि त्या नात्याचे मुळव्याधीसारखे होते म्हणजे संशय कधीही संपत नाही उलट तो वारंवार उफाळून वर येतो. सत्ता हाती आहे एकमेकात भांडत बसण्याची नव्हे तर हाती मिळेल ते सावटण्याची हीच खरी वेळ आहे असा सल्ला फार तर पवारांच्या घरातल्यांनी पार्थला दिला असेल ज्यातून वातावरण निवळले आहे दुसरे काहीही नाही….
आणि हे तर खरेच आहे जे महाआघाडी मंत्रिमंडळात आहेत किंवा मंत्रिमंडळाशी जवळीक असणारे ते या कोरोना महामारीत प्रेतावरच्या टाळूवरचे लोणी खाण्यापलीकडे फारसे काही करतांना दिसत नाहीत. मी सुट्टीवर निघून जाईल पण बदल्यांच्या फाईल्स हातावेगळ्या करणार नाही हि अशी जी उद्विग्नता जयस्वाल यांच्यासारख्या प्रामाणिक पोलीस अधिकाऱ्यांना येते आहे कारण क्लिअर आहे जो तो फक्त लुटतो आहे लुबाडतो आहे आणि ओरबाडतो आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांनी अलीकडे महाआघाडीच्या बदल्यांच्या व्यवहारांवरून जी त्यांची लाज काढली उद्या नक्की लफडी पण बाहेर काढतील त्यात शंभर टक्के तथ्य व सत्य आहे. राहिला अजित पवार आणि पार्थ पवारांचा प्रश्न तो तर शरद पवार यांनी केव्हाच निकाली काढून अजितदादांची राजकीय हवा मोठ्या खुबीने काढून घेतलेली आहे. या महाआघाडीत सामील होण्यापूर्वी अजितदादा जेव्हापासून राज्यमंत्री किंवा मंत्री किंवा उपमुख्यमंत्री होते त्या त्या वेळी मंत्रिमंडळाची साप्ताहिक बैठक सुरु होण्यापूर्वी अजितदादा आपल्या केबिनमध्ये मिनी कॅबिनेट मीटिंग घेऊन मोकळे व्हायचे ज्यात त्यांच्या राष्ट्रवादीचे मंत्री राज्यमंत्री आमदार आणि बडे अधिकारी कंपलसरी सामील असायचे. नाही म्हणायला यावेळीही सुरुवातीला अजितदादांनी हा आपला नेहमीचा स्वतःचे अति महत्व वाढवणारा फंडा सुरु केला होता पण काकांनी यावेळी तर ठरविलेलेच आहे कि दादांचे राजकीय आर्थिक महत्व ताळ्यावर आणायचे त्यामुळे हि पद्धत जेव्हा काकांनी तातडीने बंद केली तेव्हाच म्हणजे अगदी सुरुवातीलाच अजितदादांच्या पायाखालची वाळू सरकली. दादांचे महत्व काकांनी कमी केले हि बातमी राष्ट्रवादीमध्ये वाऱ्यासारखी पसरली वरून हाही मेसेज गेला कि ज्याची दादांशी जवळीक त्याला भविष्यात शरद काकांकडे अजिबात मोकळीक राहणार नाही तेव्हापासून महाआघाडीत अजितदादांचे भाजपामधल्या नितीन गडकरी यांच्यासारखे होऊन बसले आहे म्हणजे जो नितीनजी बरोबर फिरतांना दिसतो त्याचा पुढे बावनकुळे करण्यात येतो. मोठा नेता देखील प्रसंगी क्षणार्धात नॉव्हेअर करण्यात येतो. नाते दुभंगले आहे नजीकच्या काळात पवारांच्या वर्तुळात नक्की काहीतरी मोठे घडणार आहे…
क्रमश: हेमंत जोशी