मित्रवर्य तरे अनंतात विलीन : पत्रकार हेमंत जोशी 

 ज्यांच्या जाण्याची सारे वाट पाहतात ते जात नाहीत खूप खूप जगतात नंतर केव्हातरी अख्खे वाटोळे झाल्यानंतर केल्यानंतर ते जातात, वाईट माणसे दीर्घायुषी असतात आणि चांगल्या माणसांना देव आपल्यातून लवकर घेऊन जातो. काही मृत्यू मनाला कायमचा चटका लावून जातात जसे हसऱ्या अल्लड भोळ्या पूजा चव्हाणचे आपल्यातून लवकर निघून जाणे, ज्यांनी कोणी संजय राठोडला वाचविण्यात महत्वाची भूमिका बजावली असेल त्या सर्वांना आणि मंत्री राठोड यांनाही शेवटच्या श्वासापर्यंत यापुढे क्षणोक्षणी नक्की अकाली गेलेली पूजा नजरेसमोर येईल आणि त्यांचे जगणे त्यांनाच नकोसे वाटेल, पूजाला मारणाऱ्याचा आणि पूजाच्या मारेकऱ्यांना वाचविणाऱ्यांचा आज वक्त चांगला आहे म्हणून त्यांनी जागून घ्यावे पण त्या साऱ्यांचा अंत नक्की ज्या देवाच्या हाती आहे तो देव त्यांच्या पापाची किंमत नक्की वसूल करेल आणि आपण त्या प्रसंगांचे साक्षीदार असाल. असाच आणखी एका जवळच्या मित्राचा, दिलदार मनाच्या नेत्याचा, कडव्या शिवसेना नेतृत्वाचा, उत्साही आणि उत्सवी लोकप्रतिनिधीचा मृत्यू मम मनाला चटका लावून गेला, ठाण्याचे अनंत तरे हे ते नाव, २२ फेब्रुवारीला अनंत तरे असेच कायमस्वरूपी हृदयाला झटका देऊन आपल्यातून निघून गेले आणि हो देवभोळे आणि ज्याला त्याला मनापासून सहकार्य करणारे तरे नक्की स्वर्गातच पोहोचले नेहमीप्रमाणे त्यांच्या दिल कि प्राण बाळासाहेबांच्या चरणांची पूजा करायला…
स्वर्गवासी अनंत तरे व माझ्यात जवळपास तीस वर्षांचा याराना व दोस्ताना होता त्यात भलेही काळाच्या ओघात भेटीगाठी कमी जास्त झाल्या असतील पण खंड पडला नाही आमच्यातले मित्रप्रेम अधिक होते अतूट होते त्यामुळे त्यांच्या राजकीय प्रवासातले अनेक बरे वाईट प्रसंग मला अगदी जवळून माहित होते, मातोश्री ने त्यांच्या नेतृत्वाला न्याय दिला पण इतर अनेक बदमाश नेत्यांना त्यांनी ज्या पद्धतीने ठाणे जिल्ह्यात मोठे केले त्यामानाने या लॉयल नेत्याला मात्र त्यांनी अनेकदा निराश केले हि वस्तुस्थिती आहे त्यामुळे अनंत तरे मनातून सतत अस्वस्थ होते आणि अस्वस्थ मनानेच ते आमच्यातून निघून गेले. बाळासाहेबांसाठी वाट्टेल ते त्यातून त्यांना हे माहित असतांना देखील ते रायगडातून निवडणूक लढायचे आणि पैशांनी व मतांनी पराभूत होऊन ठाण्यात परतायचे पण निराश न होता, होईल काहीतरी नक्की चांगले एक दिवस या आशेवर पुन्हा पूर्वीच्याच उत्साहात कामाला लागायचे. ठाण्यातील त्यांची राजकीय अडवणूक फसवणूक किंवा एकविरा आईच्या निष्ठेपायी तेथल्या स्थानिक बदमाशांशी त्यांनी कधी प्रत्यक्ष तर कधी न्यायालयात घेतलेला पंगा आणि नेतृत्व करीत करीत व्यवसायातल्या कोर्टकचेऱ्या पण मित्र अनंत यांनी या अनंत काटकटीत ना कधी घराकडे कुटुंबाकडे दुर्लक्ष केले ना कधी त्यांच्या कार्यकर्त्यांकडे, हसतखेळत भेटणाऱ्या समोर येणाऱ्या प्रत्येकाला मनापासून सहकार्य मदत करणे त्यांच्या स्वभावातच ते भिनलेले होते, देवभक्त अनंत तरे यांची दैनंदिन परमेश्वर पूजा आणि आई वडिलांना देव मानून त्यांना त्यांनी घातलेले दंडवत, हे सारे बघण्यासारखे असायचे आणि या संस्कारापायी ते वाईट व्यसनांपासून कायम दूर होते दूर राहायचे ते एक आदर्श आणि सुसंस्कृत असे नेते होते जे नेत्यांमध्ये अभावाने बघायला मिळते…
ठाणे जिल्ह्याचे राजकारण जेव्हा गणेश नाईक आनंद दिघे वसंत डावखरे या तिघांच्याच सभोवताली पूर्णतः गुरफटलेले होते त्यातले तेव्हाचे आणखी एक जे महत्वाचे नेते होते ते अर्थातच अनंत तरे हे एकमेव होते त्यातून ते नाही म्हणायला केवळ स्वतःच्या हिंमतीवर स्वतःच्याच ताकदीवर तीन वेळ ठाण्याचे महापौर झाले आणि एकदा त्यांना बाळासाहेबांनी विधान परिषदेवर पण पाठविले तरीही अनंत यांचे शिवसेनेसाठी दिलेले योगदान बघता हे त्यांच्या पदरी आलेले पडलेले फारच कमी होते असे मी यासाठी म्हणतो कारण त्यांनी आपल्याच नेत्याशी म्हणजे आनंद दिघे यांच्याशी घेतलेला उघड उघड पंगा ज्याची फार मोठी राजकीय आर्थिक सामाजिक मानसिक किंमत अनंत यांना अखेरपर्यंत मोजावी लागली. गणेश नाईक जेव्हा शिवसेनेतून बाहेर पडले, तू माझ्या संगतीने चल मी तुला मोठा करेल असे नाईक त्यांना म्हणाले आणि कारण देखील तसेच होते त्या दोघातली जिवलग मैत्री त्यातून हे घडेल मला आम्हाला जवळपास साऱ्यांना ते तसे वाटले होते पण अनंत तरे यांनी कित्येकदा वसंत डावखरे किंवा गणेश नाईक यांच्या आग्रहावरून देखील शिवसेना सोडली नाही कारण त्यांना त्यांच्या देवाशी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांच्याशी आपली निष्ठा अखेरच्या श्वासापर्यंत जपायची होती म्हणून अनंत तरे यांचा बंगला असेल किंवा कार्यालय आणि ते राहत असलेला परिसर तेथून भगवा कधी खाली उतरलाच नाही. नाही म्हणायला माझ्या या दोन्ही जिवलग मित्रात म्हणजे आनंद दिघे आणि अनंत तरे तसेच गणेश नाईक या तिघांनाही अनेकदा जवळ आणण्याचा खूप खूप प्रयत्न केले पण तरे व नाईक धर्मवीरांच्या मनातून काहीसे उतरलेले त्यामुळे या दोघांना अनेक प्रयत्न करूनही मला दिघे यांच्याशी कधी सांधता आले नाही. हे सारे येथे आजच विस्ताराने मांडणे शक्य नाही पण अनंत तरे यांच्या अकाली जाण्याने मी अगदी जवळचा व माझ्यावर मनापासून प्रेम करणारा दिलदार दानशूर मित्र व शिवसेना नेता गमावलेला आहे, मित्र तुला मनापासून श्रद्धांजली वाहतांना मन कमालीचे भरून आलेले आहे अस्वस्थ झालेले आहे, तू तेथेही असाच उत्साही व आनंदी राहा. हेमंतराव, माझे कोर्टाचे काम आटोपले कि येतो कॉफी घ्यायला तुमच्याकडे, हा भ्रमणध्वनी यापुढे कधी येणार नाही, म्हणून यावेळी रडायला येते आहे, स्वर्गात सुखी राहा अनंतराव…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *