भय इथले संपत नाही : पत्रकार हेमंत जोशी
या कोरोना महामारीत विशेषतः फेल्युअर ठरलेल्या आपल्या या राज्यात कोरोनाचा अंत होईपर्यंत काय घडेल कोण जाईल कोण कोण जाईल काहीही कोणालाही सांगणे अशक्य. शरद उपाध्ये यांच्यासारखे भले भले भविष्य सांगणारे कोरोना महामारीत पळपुटे निघाले घरात लपले. ज्या दिवशी कोरोना संपेल त्यादिवशी आपण सारेच रस्त्यावर उतरून आनंदोत्सव साजरा करूया नाचूया बागडूया गाऊया एकमेकांच्या हातात हात घालून झिम्मा फुगडी खेळूया. पण काहीही म्हणा या कोरोना महामारीने आमचे गर्वहरण केले, माजलेल्या सर्वांना बऱ्यापैकी जमिनीवर आणले. भ्र्रष्टाचार करून इतरांना सतत फसवून घरात आणलेल्या पैशांचे आणि पैसे आणणाऱ्या कुटुंब सदस्यांचे चेहरे कसे व किती विद्रुप विकृत आहेत हे कुटुंबातील इतर सदस्यांना या महामारीच्या काळात सतत घरात बसल्याने नेमके लक्षात आले. आपण यातून काही शिकलो आहोत का, शिकणार आहोत का, हा खरा प्रश्न आहे आणि त्याचे उत्तर देखील आपण स्वतःच शोधायला हवे, सकारात्मक विचार यापुढे मनात बाळगून वागायला जगायला हवे तरच आपण काही शिकलो, म्हणता येईल, अन्यथा संकट आल्यावर जसा देव आठवतो तसे हे क्षणिक जर आपले वागणे सुधारले असेल तर पुढे पुन्हा फार काही चांगले घडेल असे वाटत नाही…
बाळासाहेब तुम्ही निवडणुकीचे तेवढे बघा, साऱ्या खर्चाची जबाबदारी माझी, असे दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांना १९९५ मध्ये सांगणारे दिवंगत मुकेश पटेल, अकाली गेले, ते जाऊनही आता जवळपास वीस वर्षे उलटलेली असावीत, ते माझे अतिशय जवळचे मित्र होते आणि त्यांनी बाळासाहेबांना दिलेला त्यावेळी शब्द खरा करून दाखवला, युती विधानसभा लढली आणि सत्तेत आली पण निवडणुकीत सारा खर्चाचा भार अतिशय मोठ्या मनाच्या दिलदार वृत्तीच्या मुकेश पटेल यांनी उचलला. आज मुकेशभाई यांची आठवण झाली ती अगदी काही दिवसांपूर्वी अपघातात मृत्यू पावलेल्या त्यांच्या एकुलत्या एक तपन यांच्यामुळे, त्याआधी मार्च महिन्यात दिवंगत सुधाकरराव नाईक यांचा एकुलता एक नातू राज असाच तडकाफडकी गेला. सुधाकरराव यांना एकच मुलगा जय, त्याच्याविषयी पण नको नको ते कानावर येते. सुधाकरराव नाईक असतील किंवा मुकेश पटेल यांच्या तपनचा अपघात झाला ती महागडी मर्सिडीज होती, मागे काही वर्षांपूर्वी दिवंगत पतंगराव कदम यांच्या तरुण मुलाचा अपघाती मृत्यू झाला ती पण अशीच महागडी मर्सिडीज होती आणि हे असे कितीतरी अस्वस्थ मुकेशभाई, पतंगराव किंवा सुधाकरराव नाईक किंवा तुमच्या आमच्यासारखे अनेक कि ज्यांच्या घरात पापाचा प्रचंड पैसा नक्की आला पण तो पैसा स्वतःसंगे तुमच्या आमच्यासाठी अतिप्रचंड मनस्ताप पण घेऊन आलेला आहे हे विसरता येणे अशक्य, सारे काही येथेच भोगून वर जायचे आहे म्हणून सांगतो, स्वतःला पण तेच सांगत आलो आहे कि पापाचा घडा भरेल असे वागू नये, लुटून आणू नये…
कुटुंबात सतत ४५ वर्षे सत्ता त्यात १५ वर्षे थेट मुख्यमंत्री पद तरीही पुसदच्या नाईक घराण्याचा राजकीय व आर्थिक अस्त होतोय, किमान शंभर किस्से पुरावे माझ्या गाठी आहेत किंवा ज्या मुकेश भूपेश व अमरीश यांनी पुण्यवान जयराज ठक्कर यांची मुंबईतली नामवंत शैक्षणिक संस्था त्यांना फसवून लुबाडून आपल्या नावे करून स्वतःची श्रीमंती भलेही वाढविली वृद्धिंगत केली असेल पण याच पटेल घराण्याने जे जे आयुष्यात हे पाप केल्याने गमावले त्याचे त्याना दररोज हेच वाटत असेल कि आम्हाला एका चांगल्या कुटुंबाचे शाप नक्की भोवताहेत. अर्थात पटेल कदम नाईक पवार देशमुख ठाकरे असे कितीतरी आडनावे येथे सांगून मला अनेक पुरावे मांडता येतील पण वाचकांनो मी जेव्हा त्यांच्याकडे एक बोट दाखवतो आहे तेव्हा उरलेली तीन बोटे माझ्या स्वतःकडे किंवा वाचकांनो उरलेली तीन बोटे ती तुमच्या स्वतःकडे देखील आहेत हे तुम्हाला किंवा मला थोडक्यात आपल्या साऱ्यांना न विसरता येणारे. ससा हाती सापडला रे सापडला कि पारधी बनून त्याला कापायचे हे जे आपल्या वृत्तीत दडले भिनले आहे ते जर या कठीण महामारीतून आपल्या डोक्यातून काढता आले तरच आपली पुढली पिढी चांगली घडली, बघणे शक्य होणार आहे अन्यथा या हाताने केलेले पाप आपल्याला त्या हाताने फेडुनच वर जायचे आहे हेच सत्य आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी