कॉफी बिझिनेस : पत्रकार हेमंत जोशी
बघा, माणसे कशी असतात ती, माझा एक अत्यंत जवळचा मित्र आहे, मी कॉफी लव्हर आहे व तो देखील, त्याचे एका तरुणीवर अतिशय प्रेम आहे, ती आणि तो दोघेही कित्येक तास त्यांना वेळ असला कि एखाद्या कॉफी शॉप मध्ये घालवून ते मोकळे होतात. मला अनेकदा मुंबईतल्या माझ्या नेहमीच्या कॉफी शॉप्स मध्ये क्रॉस होतात, अर्थात मुंबईतले कॉफी बाय डी बेला, माझ्या आवडीचे किंवा दररोज एकदा तरी बसण्याचे ठिकाण, अलीकडे चक्क चित्रपट अभिनेता अजय देवगणने त्यांना आपल्या लोखंडवाला परिसरातील मालकीच्या प्रॉपर्टीमध्ये हे कॉफी शॉप उघडण्यास जागा दिली. तर ते दोघे मला हमखास अनेकदा डी बेला च्या कुठल्यातरी शॉप मध्ये भेटतात, अधून मधून मात्र ते अचानक गायब होतात, त्याला हे मी विचारलेलंही, हे असे का होते, तो म्हणाला ती आणि मी अधून मधून अबोला धरतो, कधी कधी मग सहा महिने अगदी वर्षभर देखील भेटत नाही, पण आमचे एकमेकांवर अतिशय प्रेम, पुन्हा जुळवून घेतो मात्र जोपर्यंत एकमेकांपासून दूर असतो, येथे येणे टाळतो, कितीही मोह झाला तरी, तिच्याशिवाय या कॉफी शॉप मध्ये वेळ घालविणे, म्हणजे टॉयलेट नसलेली सदनिका विकत घेण्यासारखे, हो तो या अशा काहीही उपमा उदाहरणे देऊन बोलतो. ते शक्य नाही, तिच्याशिवाय आणि कॉफी शिवाय राहणे मला शक्य नाही पण ती नसते तेव्हा माझे कॉफी घेणे देखील बंद असते….
ज्यांना कॉफी मनापासून आवडते ती माणसे का कोण जाणे मला मनापासून आपोआप आवडायला लागतात. अलीकडे अगदी सहज माझ्या पत्रकारितेशी संबंधित असलेल्या मंत्रालयातील माहिती आणि जनसंपर्क खात्यात, वेळ होता, गेलो होतो, तसे अनेकदा तेथे जातो, हे खाते पैसे खाण्यासाठी तसे कमजोर पण अत्यंत महत्वाचे, तेथल्या अधिकाऱ्यांचे, कर्मचाऱ्यांचे अनुभव, त्यांचे काम डोक्याला झिणझिण्या आणणारे, या खात्यातल्या प्रत्येकाची जणू द्रौपदी झालेली असते कारण शासनातील प्रत्येक महत्वाच्या माणसाचे त्यांना काम बघायचे असते आणि राज्यातल्या मान्यवर पत्रकारांचे ते बसण्या उठण्याचे ठिकाण, थोडक्यात आम्ही सारे उनाड एखाद्या मस्तीखोर नवऱ्यासारखे जेथे भेटतो, ते हे शासकीय अत्यंत महत्वाचे खाते, म्हणून त्यांची दरदिवशी पार
द्रौपदी झालेली असते, असे म्हणालो, जो तो त्यांच्यावर दादागिरी गाजवून मोकळा होतो, अनेकदा अजिबात लायकी नसतांनाही….
हे खाते आत बाहेर कसे हे समजावून सांगणारे ते दोघे आज हयात नाहीत, मी, प्रभाकर शांडिल्य आणि वसंत चौधरी १९८८ मध्ये एकाचवेळी शासकीय प्रवर्गातून मिळालेल्या सदनिकांमध्ये म्हणजे वर्सोव्याच्या कल्याण कॉम्प्लेक्स मध्ये राहायला आलो होतो, अनेक वर्षे त्यामुळे ते दोघे आणि मी माझ्या कार मधून आठवड्यातून निदान चार दिवस तरी गप्पा मारण्यासाठी म्हणून एकत्र येत जात असू. शांडिल्य तर अगदीच अलीकडे गेले, दोघांचेही माझ्यावर नितांत प्रेम होते, शांडिल्य लागोपाठ तीन वेगवेगळ्या मुख्यमंत्र्यांचे जनसंपर्क अधिकारी होते पण त्यांनी अधिकाराचा कधीही दुरुपयोग करून घेतला नाही. माणसे जातपात का पाळतात कळत नाही, चौधरी नाभिक समाजाचे होते पण ते जेव्हा बोलायला सुरुवात करायचे, खोटे सांगत नाही, मी आणि शांडिल्य, आम्ही दोघेही ब्राम्हण देहभान विसरून त्यांचे बोलणे हृदयात साठवून मोकळे होत असू. माणसे उगाचच ब्राम्हणांवर बोलून लिहून मोकळे होतात, असे वसंत चौधरी यांच्यासारखे कितीतरी, म्हणजे ज्ञानाच्या बाबतीत त्या श्रीकांत जिचकार यांच्यासारखे कितीतरी, ज्ञान बुद्धी, डोके, हे केवळ ब्राम्हणांची अजिबात मोनोपली नाही किंवा राहिलेली नाही, त्यांना त्रास देणे सोडून द्यावे…
येथे माहिती आणि जनसंपर्क खाते किंवा कॉफी शॉप, कॉफी घेणारे हा विषय त्या ब्रिजेश सिंग यांच्या संदर्भातून निघालेला आहे. नेमकी चांगली माणसे कशी जवळ करावीत, जवळ घ्यावीत हे देवेंद्र फडणवीस आणि शरद पवार यांच्याकडून शिकून घेण्यासारखे. फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि लगेचच त्यांनी माहिती आणि जनसंपर्क खात्याचे महासंचालक म्हणून आयपीएस अधिकारी असलेले श्री ब्रिजेश सिंग यांना जेव्हा गादीवर बसविले अनेकांच्या भुवया उंचावल्या, एखाद्या पोलीस अधिकाऱ्याने पत्रकारितेच्या क्षेत्रात तेही बॉस म्हणून प्रवेश करणे म्हणजे अजय आंबेकर यांनी त्यांच्या प्रिय पत्नीला सोडून अभिनेत्री विशाखा सुभेदारच्या प्रेमात पडण्यासारखे किंवा भय्यू महाराजांची तुलना एकपत्नीव्रत प्रभू श्रीरामाशी करण्यासारखे अनेकांना वाटले किंवा आशिष शेलारांनी राजकीय सन्यास घेऊन त्यांना आमटेंनी कुष्ठ रोग्यांची सेवा करण्यासाठी बोलावून घेण्यासारखे वाटले किंवा रामदास कदम हे एक अतिशय शांत संयमी मृदू लाघवी दानशूर ऋषितुल्य व्यक्तिमत्व आहे असाएखाद्याने भाषणातून जाहीर उल्लेख करण्यासारखे हे असे ब्रिजेश सिंग यांचे माहिती आणि जनसंपर्क खात्यात येणे किंवा त्यांना आणणे, अनेकांना वाटले, आणि ते चुकीचे ठरले कारण ब्रिजेश सिंग पोलीस अधिकारी आहेतच पण त्यापलीकडे त्यांना त्यांच्या घराण्याला लिखाणाची पत्रकारितेची एक महान परंपरा आहे त्यांचे वडील शासकीय नोकरीत येण्यापूर्वी पत्रकार होते, ते उत्तम लिहितात आणि बोलतात देखील, ब्रिजेश सिंग वडिलांच्या एक पाऊल पुढे, त्यांच्याशी बोलणे झाले कि लक्षात येते आपण एका बुद्धिमान अभ्यासू अधिकाऱ्याशी बोलतोय, ते लक्षात येते किंवा ब्रिजेश सिंग यांच्याशी गप्पा मारणे, आयुष्यातील ती एक सुवर्णसंधी असते. त्यांनी महासंचालक म्हणून येणे, हे खाते नक्कीच मोठ्या उंचीवर जाते आहे, श्रेय शंभर टक्के तसे ते सुरेश साळवी, चंद्रशेखर ओक, प्रमोद माने, मनीषा म्हैसकर, आनंद लिमये यांच्यासारख्या दूरदर्शी अधिकाऱ्यांना तसेच ते ब्रिजेश सिंग यांना देखील…
आता नेमक्या मुद्द्याकडे वळतो. ब्रिजेश सिंग हेही कॉफी लव्हर आहेत, त्यांना कॉफी मधले खूप कळते. ते बडे अधिकारी असूनही आपल्या ऑफिस मध्ये स्वतः कॉफी तयार करून, घेतात आणि आवडीची माणसे भेटायला आलीत कि त्यांना देखील कॉफी पाजून मोकळे होतात. अर्थात त्यांना वेळेचे मोठे बंधन आहे, ते अतिशय व्यस्त असतात, वर्कोहोलिक आहेत. माणसाची वृत्ती कशी असते हे त्याच्या बोलण्यातून कळते, मी त्यांना म्हणालो, तुमच्याकडे कॉफी कारट्रिज चे ते मशीन नाही का, ते म्हणाले एकतर मशीन महाग आहे आणि समजा मी ते घेतले तर एक कारट्रिज ५०० रुपयांना पडते, आयपीएस पोलीस अधिकार्याने,महाग पडते, म्हणावे, नेमके लक्षात आले, हे महाशय इतर खादाड आयपीएस अधिकाऱ्यांच्या नव्हे तर दीक्षित, फणसाळकर इत्यादींच्या पंक्तीला बसणारे आहेत. माझ्याकडे, माझ्या नरिमन पॉईंट कार्यलयात ते मशीन आहे, प्रसिद्ध महिला उद्योगपती रेखा चौधरी आणि तिचे एकेकाळचे भागीदार जे. सी. कपूर त्या दोघांनी ते मला ऍमस्टरडॅम वरून आणलेलं आहे, गिफ्ट केले आहे. जी माणसे कॉफी घेणारे असतात ते रोमँटिक, दर्जेदार असतात, असे म्हटले जाते, चला, एक छान व्यक्तिमत्व या कॉफी प्रेमातून अनुभवायला मिळाले…
पत्रकार हेमंत जोशी