पंडितांची भयावह रजनी : पत्रकार हेमंत जोशी
पत्रकारांचे काम गुप्तहेरांसारखे असते आणि गुप्तहेर हे देखील पत्रकारांसारखेच काम करतात थोडक्यात या दोन्ही व्यवसायांचे तसे एकमेकांशी खूप साम्य आहे. काही माणसे स्वतःच स्वतःच्या नावाआधी दादासाहेब, बाबासाहेब, नानासाहेब, काकासाहेब, आप्पासाहेब इत्यादी उपाध्या लावून घेतात, विशेषतः शासकीय अधिकारी आणि पुढारी या अशा उपाध्या लावून घेण्यात अतिशय आघाडीवर असतात. याला अपवाद मुंबई महापालिकेचं अतिरिक्त आयुक्त श्रीयुत जऱ्हाड कारण त्यांचे नावच ‘आबासाहेब ‘ आहे, केवढे त्यांच्या बायकोवर ओढवलेले हे संकट कि जऱ्हाड वहिनींना लग्नानंतरच्या पहिल्या रात्रीही त्यांना ‘ आबा ‘ किंवा ‘ आबासाहेब ‘ म्हणावे लागले असेल, ज्या माणसाला आबा मला जवळ घ्या किंवा आबासाहेब मला जवळ घ्या, म्हणावे लागते अशा पुरुषाच्या एखाद्या तरुणीने का म्हणून प्रेमात पडावे, म्हणून कि काय जर्हाडांना आयुष्यातले ते तसले पहिले चावट प्रेम हे त्यांना बायकोवरच म्हणे करावे लागले कारण तेव्हाही सर्वांचे ते आबा किंवा आबासाहेब होते. जे कोणी आबासाहेब जऱ्हाड नावाच्या सभ्य सुसंस्कृत शालीन शुद्ध प्रशासकीय अधिकाऱ्याला जवळून ओळखतात ते हेच सांगतील, कि खर्या अर्थाने जर्हाडच्या आईवडीलांना मुलाचे पाय पाळण्यात दिसले असावेत म्हणून त्यांनी आबासाहेब हे पोक्त आदरणीय नाव जर्हाडांचे ठेवले. पत्रकार आबा माळकर आणि आबासाहेब जऱ्हाड हे दोघेही अनुक्रमे म्हणजे माळकर हे पत्रकार असून आणि जऱ्हाड हे प्रमोटी प्रशासकीय अधिकारी असूनही अतिशय चांगल्या वृत्तीचे, या राज्यावर प्रेम करणारे, सामाजिक भान असलेले, समाजसेवी वृत्तीचे, निर्व्यसनी, बुद्धिमान असे ते दोघे आहेत, म्हणून त्या दोघांचेही आबा, आबासाहेब हे नाव परफेक्ट आहे, नाव सुलोचना आणि तिरळे बघते किंवा नाव संभाजी आणि दिसायला भाऊ कदम, असे त्या दोघांचेही नाही फक्त त्यांच्या बायकांची तेवढी पंचाईत झाली आहे त्यांना नाईलाजाने म्हणावे लागते आबा आय लव्ह यु….
नावाच्या उपाध्या लावून घेणे जसे अनेकांचे पॅशन असते ते तसे मला वाटते, रजनी पंडितांचे देखील झाले असावे म्हणजे तिने तिच्या नावाच्या आधी, ‘ भारतातली पहिली महिला गुप्तहेर ‘ हि उपाधी लावून घेतली शिवाय स्वतःची विविध माध्यमातून प्रसिद्धी कशी करवून घ्यायची तिला चांगले कळले होते आणि बघता बघता माझी हि काही वर्षांपूर्वीची शेजारी महिला गुप्तहेर झपाट्याने प्रसिद्धीच्या झोतात आली. माझे मुंबईतील पहिले वृत्तपत्र कार्यालय शिवाजी पार्क परिसरातील राजा बढे चौकातल्या पहिल्या माळ्यावरील ज्या पारेख महल या इमारतीत होते त्याच इमारतीच्या तिसऱ्या माळ्यावर गुप्तहेर रजनी पंडित तिच्या आईवडील आणि भावंडांसगे तिसऱ्या माळ्यावर राहायला होती, अत्यंत बोलकी आणि देखणी वरून अतिशय चारित्र्य सांभाळणारी, माझी आणि तिची, तिच्या कुटुंबाशी लवकरच ओळख झाली आणि वरचेवर आम्ही भेटायला लागलो जोपर्यंत माझे त्या इमारतीमध्ये कार्यालय होते, नंतर मात्र मी तेथून कार्यालय हलविले आणि एकमेकांशी त्यानंतर खास अशी कधी भेट झालीच नाही. असे कितीतरी गुप्तहेर असतात किंवा आहेत कि त्यांच्याकडे ज्यांचे काम असते पुढे त्या दोघात बिनसले कि हे असे चालू गुप्तहेर आपल्याच अशिलाला ब्लॅकमेल करतात, पैसे उकळून किंवा शारीरिक उपभोग घेऊन मोकळे होतात, पोलिसांनी राज्यातल्या साऱ्याच गुप्तहेरांचे चारित्र्य आणि विश्वासहर्ता तपासणे अत्यंत गरजेचे आहे. रजनी पंडित आणि तिला या व्यवसायात मदत करणारे तिचे सख्खे भाऊ, त्यांच्याविषयी मात्र कधी भलते सलते ऐकू आले नाही, अत्यंत महत्वाचे म्हणजे कित्येक चांगली स्थळे सांगून आल्यानंतर देखील केवळ उत्तम गुप्तहेर बनण्याच्या जिद्दीतून रजनी पंडिताने आजपर्यंत लग्न केले नाही आणि या उतारवयात ते करणे आता शक्यही नाही. आपल्या प्रोफशन साठी व्यक्तिगत आयुष्याला तिलांजली देणारी रजनी म्हणून मला अगदी मनापासून आवडत आलेली आहे पण हीच रजनी अलीकडे सायबर गुन्ह्यात अडकली, तिला अटक झाली वाचून मनाला अतिशय वाईट वाटले. जर रजनी इतर लफंग्या बहुतांश गुप्तहेरांसारखी फसवणूक करणारी नसेल तर या संकटातून ती नक्कीच
सहीसलामत बाहेर पडेल, बाहेर पडावी पण, स्त्रियांचे चारित्र्य आणि पुरुषाचे भाग्य काय असेल हे जेथे देव परमेश्वर देखील नेमके सांगू शकत नाही तेथे आपण सारे तर अगदीच सामान्य. त्यामुळे रजनी पंडित गुप्तहेर म्हणून नेमकी कशी आहे कशी होती हे आता पोलिसांकडूनच कळेल, आपण त्यावर बोलणे निदान आज तरी मूर्खपणाचे ठरेल. अत्यंत अत्यंत महत्वाचे म्हणजे, अनेकांना अनेक कामांसाठी गुप्तहेर हवे असतात,गुप्तहेर लागतात पण गुप्तहेर निवडतांना अतिशय काळजी घ्यावी, बहुतेकांचे अनुभव फारसे चांगले नाहीत, मोठी फसवणूक आणि अडवणूक झाल्याचेच कानावर येते…
पत्रकार हेमंत जोशी