नवे मंत्रिमंडळ : पत्रकार हेमंत जोशी
आता शाळेशी संबंध उरला नाही पण आम्ही शाळेत असतांना विशेषतः शिक्षक दिनी शाळेतले विद्यार्थी एक दिवस शिक्षक मुख्याध्यापक होऊन शाळा घ्यायचे, वर्गात येऊन शिकवायचे, कायम स्मरणात राहणारे असे ते क्षण असायचे. मुले आपल्या आवडत्या शिक्षकांसारखे ड्रेस अप होऊन आणि मुली त्यांना आवडणाऱ्या मॅडम च्या पोशाखात येऊन शिकवायच्या. एका आडदांड विद्यार्थिनीला पिटी शिकविणारे माझे वडील आवडायचे, ती त्यांच्यासारखाच पोशाख करून आली होती म्हणजे तलम धोतर, सदरा आणि डोक्यावर संघाची टोपी असा तो पोशाख होता, शाळेतली उनाड मुले तिच्या शिकवण्याकडे कमी धोतराकडे टक लावून बघत होती, पारदर्शक धोतर हे धोतर नेसणाऱ्यांमध्ये श्रीमंतीचे लक्षण समजल्या जाते. त्यादिवशी मजा यायची, शिक्षक झालेल्या आमच्या वर्गातल्या काही मुली साड्या नेसून यायच्या, सवय नसल्याने साडीचा पदर कितींदा तरी ढळायचा, आमची हसून हसून मुरकुंडी वळायची, असे वाटायचे आपण महाबळेश्वरचे पठार बघतो आहोत. दारिद्र्यातही खूप आनंदाचे ते क्षण होते…
अलीकडे महाराष्ट्रातल्या सर्व पक्षीय आमदारांची एक गुप्त बैठक झाली, त्यात असे ठरले कि असा एकही विषय या राज्यात उरलेला नाही ज्यात विविध वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्यांनी आणि विविध वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या संपादकांनी वार्ताहरांनी आणि पत्रकारांनी आपली मते मांडून राज्यकर्ते आणि विरोधक देखील हे राज्य चालविण्यास, राज्यातल्या विविध योजना आणतांना किंवा राबवितांना मूर्ख नालायक कसे हे सिद्ध केले नाही, म्हणून या गुप्त बैठकीत असे ठरले कि काही वर्षे यापुढे राज्यातल्या मीडियाच्या हाती सत्ता सोपवून मोकळे व्हावे…
असे घडले तर म्हणजे पुढल्या काही दिवसात या राज्यातल्या तमाम मीडिया मंडळींचे मंत्रिमंडळ अस्तित्वात आले तर नेमके कोणाला काय करावे, कोणत्या खात्याचे कोणाला मंत्री करावे, मुख्यमंत्री कोण असायला हवा त्यावर प्रस्ताव मागण्यात येत आहेत, तुम्हीही तुमचे प्रस्ताव पाठवावेत त्या प्रस्तावांचा अवश्य नक्की विचार करण्यात येणार आहे….आत्ता याक्षणी म्हणजे तुमचे प्रस्ताव येण्याआधी कोणाला काय करावे त्यावर मला काहीतरी सुचलेले आहे, हा प्रस्ताव मी देखील पुढे सरकविणार आहे. मला वाटते पत्रकारांचे मंत्रिमंडळ मग विरोधी पक्ष नेता असायला हवा, सामनाचे श्री संजय राऊत यांच्याशिवाय होऊन होऊन होणार कोण, कारण राऊत यांना आज पर्यंत हेच नेमके कळलेले नाही कि ते विरोधी पक्ष नेते आहेत कि पक्ष विरोधी संपादक आहेत म्हणून विधानसभेत ते विरोधी पक्ष नेते म्हणून चांगली कामगिरी पार पडतील असा मला विश्वास आहे. विधान परिषदेसाठी मात्र सध्या तसे काहीही काम नसलेले पत्रकार निखिल वागळे यांचे नाव सुचवावेसे वाटते कारण विधान परिषदेतल्या विरोधी पक्ष नेत्याला काहीही काम करायचे नसते करायची असते ती केवळ आरडाओरड, समाजवादी विचारांच्या मंडळींना फक्त आरडाओरड करणे तसेही छान जमते म्हणून डोळ्यासमोर केवळ निखिल आले. अर्थसंकल्पाच्या दिवशी मला तर वाटले होते लोकसत्ताचे मनोरंजनाच्या जाहिरातीचे पान देखील गायब होऊन ती जागा अर्थविषयक लिखाणाने व्यापली जाईल, म्हणून या राज्याचे अतिहुशार आणि लोकसत्ताचे संपादक श्रीयुत गिरीश कुबेर यांनाच अर्थमंत्री करावे.
आरोग्य खाते नेमके कोणाकडे सोपवावे म्हणजे अतुल कुलकर्णी कि संदीप आचार्य यांच्याकडे, याबाबतीत मात्र श्रेष्ठींनीच निर्णय घेऊन मोकळे व्हावे, विनोद तावडे यांचे सांस्कृतिक कार्य हे खाते सकाळ दैनिकाच्या तुषार खरात यांच्याकडे सोपविले तर काय हरकत आहे, आणखीही काही नावे असतील तर कृपया मजकडे द्या, पुढे सरकावतो. राज्याचे शिक्षण मंत्री जर पत्रकार कपिल पाटील यांना केले तर खात्याचे काम राहिले बाजूला ते उठतील आणि कोकणात मुक्कामाला जाऊन आणखी दहा वीस शाळा काढून मोकळे होतील. मुख्यमंत्री कोण असावे याबाबतीत मला वाटते ज्यांचे नाव गेल्या तीन वर्षांपासून प्रतिमुख्यमंत्री म्हणून घेतले जाते ते रविकिरण देशमुख असावेत कि यदु जोशी, पण महिलाच मुख्यमंत्रीपदी असावी असे जर ठरले तर मात्र मृणालिनी नानिवडेकर हे एकमेव नाव पुढे येईल किंवा विधानपरिषदेवर जाण्याची ज्यांची तीव्र सुप्त इच्छा होती त्या राही भिडे यांचे नाव देखील पुढे आणण्यात हरकत नसावी. पत्रकार उदय तानपाठक यांना मात्र मंत्रिमंडळात अजिबात स्थान देऊ नये, अख्खे मंत्री त्यांच्या समावेशाने बसता उठता हसत सुटतील, कामे होणार नाहीत आणि मीडिया आधीच फक्त बोलते काहीही करीत नाही, त्यावर शिक्का मोर्तब होईल. मी म्हणतो, उदय यांना उल्हास पवार यांच्या भूमिकेत वावरण्याचे सांगावे म्हणजे प्रत्येकाकडे उठबैस, छान छान गप्पा आणि त्यांच्या खिशात लिमलेटच्या गोळ्या, प्रत्येकाचे तोन्ड तेवढे गॉड करून बाहेर पडायचे…
बघूया कोणाच्या काय नशिबात आहे ते….तुम्हीही तुमची नावे सुचवावेत,
पुढल्या लेखात ती मांडता येतील….
अपूर्ण :
पत्रकार हेमंत जोशी