वृत्तपत्रांचा मृत्युलेख १ : पत्रकार हेमंत जोशी
अप्रतिम, अद्वितीय, अविस्मरणीय, वाचनीय, संग्राह्य, आणि हो, सुसह्यय देखील, आणि लिखाण कोणाचे तर संजय राऊत यांचे…तरीही…वाचलात का, वाचला नसेल तर मिळवा आणि संजय राऊत यांचा रविवार दिनांक २५ फेब्रुवारी २०१८ चा सामना दैनिकातील उत्सव पुरवणीत, ‘ ३२४ मराठी वृत्तपत्रांचा मृत्युलेख ‘ हे रोखठोक लिखाण अवश्य वाचा. कुठे कुठे गडबड आहे, पण त्यातही प्रामाणिकपणा असल्याने लिखाणाची, लेखाची भट्टी मस्त जमून आली आहे. एकदा मी सहजच गप्पांच्या ओघात भाऊ तोरसेकरांना विचारले होते, लिखाण उत्तम कोणत्या पत्रकाराचे त्यावर त्यांनी निखिल वागले आणि संजय राऊत यांचे नाव घेतले होते पण ध्यानात हृदयात मनात ठेवावे असे कधी संजय राऊत यांचे लिखाण माझ्या फारसे कधी वाचण्यात नव्हते. ते नेमके चांगले कसे, त्यांच्या या रोखठोक लेखातून कळले…
आता भाऊ तोरसेकर कोण, निदान हे तरी विचारण्याचा करंटेपणा एखाद्या वाचकाने करू नये, पुण्यातले करतात असे म्हणजे माणूस कितीही मोठा असला आणि तो पुण्याचा नसेल तर ते त्याच्या तोंडावरच विचारतात, तुम्ही नितीन गडकरी म्हणजे कोण, तुम्ही काय करता, इत्यादी इत्यादी, उद्या एखाद्याचा बाप पुण्याबाहेरचा असला तरी पुण्यात स्थयिक झालेला प्रसंगी बापालाही तोंडावर विचारून मोकळा होईल, तुम्ही कोण….
संजय यांनी लिहिले आहे, वृत्तपत्रस्वातंत्र्य ही कुणाचीही वैयक्तिक मालमत्ता नाही, पण राज्यकर्त्यांना या स्वातंत्र्याची मालकी स्वतःकडे हवी आहे. ३२४ मराठी वृत्त पत्रांना सरकारी जाहिरातींच्या यादीवरून सरकारने काढून टाकले आहे आणि इतर ७०० जिल्हा वृत्तपत्रांवर ही कुर्हाड चालविण्याची तयारी सुरु आहे. पाचदहा भांडवलदार वृत्तपत्रांना बळ देण्यासाठीच हे चालले आहे. ३२४ जिल्हा वृत्तपत्रांचा हा मृत्यूलेखच आहे…
राऊतांनी हे असे लेखन चांगले केले आहे पण लिखाणात फारसा दम नाही, त्यांनी केलेले लिखाण अतिशय एकतर्फी वाटले. जाहिराती बंद करण्याची वेळ वृत्तपत्र मालकांनी स्वतःवर ओढवून घेतलेली आहे त्यापुढे जाऊन मी असे म्हणेन कि काहीही न लिहिता येणारे अनेक वृत्तपत्र मालक आणि माहिती व जनसंपर्क खात्यातील जाहिरात विभागातले अधिकारी, कर्मचारी संगनमताने सरकारच्या तिजोरीवर दरोडा घालत होते, या सरकारने म्हणजे फडणवीसांनी हिम्मत दाखविली आणि त्यांनी गेल्या कित्येक वर्षांपासून चाललेले हे रॅकेट, हे दरोडा सत्र थांबविले, शासनाची अप्रत्यक्ष जनतेची गेल्या कित्येक वर्षांपासून होणारी आर्थिक लूट या सरकारने थांबविलेली आहे त्यात त्यांचे चुकले अजिबात वाटत नाही. अधिक चूक आमच्यातल्या काहीही न करता जाहिरातींच्या माध्यमातून सरकारला लुटणाऱ्या वृत्तपत्रांच्या मालकांची आहे, एकही क्षण अमुक एखादे भरमसाठ शासकीय जाहिराती घेणारे वृत्तपत्र हाती घेऊन वाचावे असे होत नाही पण अशी अनेक वृत्तपत्रे शासनाला लुटून मोकळी झाली आहेत, मोकळी होताहेत. चांगले वृत्तपत्रे काढणाऱ्यांच्या पोटावर हे शासन पाय देईल, मला नाही वाटत असे होईल, इकडली तिकडली कात्रणे जमा करायची, अशी शिळी कात्रणे जमा करून तेच म्हणजे इतरत्र आलेले लिखाण छापून मोकळे व्हायचे आणि असली भिकारडी वृत्तपत्रे सरकारला दाखवून पैशांनी तेही माहिती आणि जनसंपर्क खात्यातील काही भ्रष्ट मंडळींना हाताशी धरून संगनमत करून लुटायचे, चुकीचे होते, त्यावर सविस्तर पुढल्या भागात…
पत्रकार हेमंत जोशी