घोडे बाजार : पत्रकार हेमंत जोशी
मी अजिबात मोठा माणूस नाही पण माझे मित्र मोठे आहेत, मनाने आणि पैशांनी श्रीमंत आहेत त्यामुळे कुठेही गेलो, अगदी अख्या जगात कुठेही फिरायला गेलो तरी ते माझ्या निवासाचीराहण्याची व्यवस्था तेथल्या त्या ठिकाणी असलेल्या महागड्या हॉटेल्स मध्ये हमखास करतात. त्यांची माझ्याकडून कोणतीही अपेक्षा नसते आणि माझी त्यांच्याकडून, पण केवळ प्रेमापोटी हे सारे घडते. माझे मित्र मोठे आहेत पण मी मोठा नसल्याने काही सवयी पूर्वीच्याच आहेत म्हणजे माझीही शांताबाई होते. शांताबाई माझ्या जळगावातल्या मित्राची बायको. शहरातल्या मुलींविषयी त्याचे काही अकारण गैरसमज होते म्हणून त्याने मुद्दाम खेड्यातली करून आणली, मग तो हनिमूनला गेला. हॉटेलातल्या पलंगावर ते दोघे झेपावणार तेवढ्यात कोणीतरी बेल वाजवली ह्याने दार उघडले. पोऱ्या पाण्याचा जग घेऊन आला होता. याने दार बंद केले आणि पलंगाकडे परतला तर बायको गायब, याने तिला इकडे तिकडे शोधले, शेवटी ती पलंगाच्या खाली दडून बसलेली दिसली, मित्राने विचारले, का गं असे केले, लपून बसलीस, त्यावर ती म्हणाली, मला वाटले नेहमीसारखे पोलीस आले…
मित्रांनो, काही जुन्या सवयी या अशा जाता जात नाहीत. म्हणजे मी कोणत्याही हॉटेल मध्ये मुक्कामाला गेलो कि रूम खाली करतांना तेथले जे जे शक्य आहे ते सारे जमा करून आणतो आणि येथे ज्यांना आवश्यक आहे त्या सर्वांना म्हणजे आसपासच्या गरिबांना वाटून मोकळा होतो. उद्देश एकमेव, त्यांनी तरी महागड्या वस्तूंचा उपयोग कधी घ्यायचा…तुम्हीही हे करून बघा. माझे मित्र म्हणतातही कि शक्य असते तर तू हॉटेलातली पलंग आणि गादी देखील आणली असतीस. मी त्यांचे कुचके बोलणे मनावर घेत नाही…
अलीकडे पार पडलेल्या विधान परिषद निवडणुकी निमित्ताने हे आठवले. या राज्यातल्या केवळ भ्रष्टाचार करून धनदांडग्या झालेल्या नेत्यांनी, त्यांच्या पुढल्या पिढ्यांनी, दलालांनी, कंत्राटदारांनी, व्यापाऱ्यांनी, त्यांना कायम सहकार्य करणाऱ्या शासकीय अधिकाऱ्यांनी एकेकाळी पवित्र आणि देशभक्त सदस्यांनी जी विधान परिषद काठोकाठ भरलेली असायची, त्या परिषदेची अक्षरशः वेश्या करून ठेवली आहे. जी आकडेवारी मी काढली त्यावरून राज्याच्या विधानपरिषदेत केवळ १३ टक्के सदस्य त्या रामदास आंबटकर यांच्यासारखे पवित्र देशभक्त तळागाळातले स्वच्छ आणि सुसंस्कृत आहेत, बहुतेक सारे म्हणजे उरलेले ८७ टक्के विविध भानगडी युक्त आहेत, जणू आम्हासामान्य मराठीच्या उरावर बसून आमचे सारे ते लुटताहेत, आम्ही केवळ आक्रोश करतो आहोत म्हणून मनातले सांगतो जर विपलभ बाजोरिया सारखे सदस्य विधान परिषदत काठोकाठ भरले जाणार असतील तर सामान्य मराठींनी रस्त्यावर उतरावे आणि हि विधान परिषद कायमची बरखास्त करावी, आमच्यातल्या हरामखोर नेत्यांना ओरडून सांगावे…
ज्या विपलभ बाजोरिया यांचा कालपर्यंत राज्यातल्या राजकारणाशी दूरदूरपर्यंत संबंध नव्हता केवळ त्याचे हिशेबी व्यापारी वडील पाठीशी उभे म्हणून हे महाशय थेट मराठवाड्यातून विधान परिषदेवर निवडून जातात आणि जे सुरेश नागरे त्या भागातले तरुण लोकप्रिय नेते त्यांना केवळ चार मते पडतात, हे सारे त्या बाजोरिया आणि नागरे यांचे नेमके हिशेब मनाला झिणझिण्या आणणारे ठरलेले आहेत. माजी आमदार कुंडलिक नागरे यांच्या मोस्ट ऍक्टिव्ह मुलाने म्हणजे सुरेश नागरे यांनी हे असे हिशेबी राहून पराभव पत्करणे नक्की अयोग्य ठरले आहे, याची मोठी किंमत त्यांना त्यांच्या मतदारांसमोर भविष्यात मोजावी लागणार आहे. आणि असेच सतत घडते आहे, त्या विधान परिषद निवडणुकी निमित्ताने. घोडे बाजार बघून मन बधिर होते आणि केवळ हिशोबाचे गणित यशस्वी करण्यासाठी सामान्य मराठी माणसाला दूर ठेवून किंवा जे खरोखरी विधान परिषद सदस्य होण्याच्या लायकीचे आहेत अशा मान्यवरांना बाजूला ढकलून हे राज्य त्या विधान परिषदेच्या माध्यमातून बेवकूफ बनविल्या जात आहे, चांगल्या लोकांची म्हणजे उल्हास पवारांसारख्या असामान्य सदस्यांची हि विधान परिषद दुर्दैवाने राहिलेली नाही….
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी