घोडे बाजार २ : पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे अमेरिकेत लॉस अँजेलिसला होतो. एके संध्याकाळी भारतीय जेवण करावेसे वाटले म्हणून हॉलिवूड मुख्य रस्त्यावरच्या अनार या भारतीय पण अगदीच छोटेखानी रेस्टोरंट मध्ये जेवायला गेलो. जेवण येईपर्यंत वेळ होता, मुंबईत फोनवरून कोणाशी तरी बोलत बसलो. माझे बोलणे समोर उभा असलेला वृद्ध व्यवस्थापक ऐकत होता. माझे जेवण संपल्यावर तो मुद्दाम माझ्याशी बोलायला आला. तुम्ही मुंबईचे वाटते, मी हो म्हणालो. तो त्यावर म्हणाला, मी तसा पश्चिम बंगाल मधला, पण मुंबईत काही वर्षे होतो, सिनेमात नशीब अजमावण्यासाठी आलो होतो. नाही म्हणायला मला काही चित्रपटातून काम देखील मिळाले त्यापैकी १९७५-७६ साली आलेल्या आय एस जोहरच्या नसबंदी सिनेमात तर मी प्रमुख भूमिकेत होतो, जोहर यांनीच माझे त्या सिनेमा पासून अनिताभ असे अमिताभ नावाशी मिळते जुळते नामकरण केले होते. पुढे फारशी कामे मिळाली नाहीत, वयही निघून गेले मग इकडे भाऊ बहिणी होत्या म्हणून आलो आणि येथेच स्थायिक झालो. लग्न झाले नाही, एकटाच राहतो, या अशा छोट्या मोठ्या नोकऱ्या करतो…त्याचे अपयशी आयुष्य ऐकून मला फार वाईट वाटले. असो, त्याच्याकडे पैसे नसतील पण मन मोठे होते, त्याने माझे २० डॉलर रकमेचे बिल घेतले नाही. प्रत्येकाच्या बाबतीत सांगायचे झाल्यास वय वर्षे २० ते ४० यादरम्यान ज्याने स्वतःला सांभाळले त्याचे भले होते, इतरांचे असे वाटोळे होते, या वयातली दादागिरी तुमचे आणि तुमच्या कुटुंबाचे भवितव्य ठरवीत असते अन्यथा, जिंदगी के सफर मे गुजर जाते है, वो मकाम, वो फीर नही आते..वो फीर नहीं आते…यश अनेकांना मिळते, काहींना पटकन मिळते पण जे जमिनीवर टिकून राहतात, न माजता हवेत जे तरंगत नाहीत, गर्वाने जे फुलून उठसुठ अद्वातद्वा वागत नाहीत, तेच टिकून राहतात अन्यथा या वयातले माजलेले तरुण तरुणी एखाद्या काळ पुरुषासारखे ठरतात, त्यांचे कुटुंब आणि ते स्वतः उध्वस्त होतात, पश्चातापाने तडफडून मरतात, त्यांचे सारे संपते…
वाममार्गाने सत्ता आल्यानंतर जवळपास साऱ्याच नेत्यांना ज्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांच्या जीवावर ते मोठे झाले त्याच कार्यकर्त्यांना ते विसरून मोकळे होतात आणि स्वतःचे व आपल्या कुटुंबाचे तेवढे भले करणे आणि येनकेनप्रकारेण सत्तेत टिकून राहणे एवढेच त्यांचे पुढले ध्येय ठरते भलेही त्यांचा वक्त चांगला असतो पण अंत केवढा वाईट, हे आपण अलीकडे अनेक नेत्यांच्या बाबतीत प्रत्यक्ष बघितलेले आहे, विशेष म्हणजे हे हपापलेले वातावरण कोणत्याही विचार सरणीच्या राजकीय पक्षांमध्ये सारखे आहे. कालपर्यंत रोह्याचे सुनील तटकरे आणि त्यांचे बंधू, आणि अलिबागचे पाटील एकमेकांना पाण्यात पाहत होते, त्यांच्यात विस्तव देखील जात नव्हता. अर्थात त्याआधी असे नव्हते म्हणजे तटकरे राज्यमंत्री मंत्री होण्यापूर्वी जयंतराव किंवा मीनाक्षी पाटलांचे सुनील तटकरे यांच्याशी घनिष्ट संबंध होते कारण या दोन्ही तिन्ही नेत्यांना त्यावेळेचे त्याभागातले लोकमान्य नेते ए. आर. अंतुले यांना संपवायचे होते आणि त्यांनी ते मिळून केले, अंतुले यांना बऱ्यापैकी रायगड जिल्ह्यातून या मंडळींनी बाहेर केले आणि मुंबईत कायम मुक्कामी आणून बसविले होते…
मोहीम फत्ते झाली, त्याचा फायदा सुनील तटकरे यांनी मोठ्या खुबीने करून घेतला, मग त्यांनी पाटलांना देखील टांग दिली आणि ते राज्यमंत्री झाले, पुढे खूप मोठे झाले. तटकरे यांनी मोठ्या खुबीने आपल्या राजकीय ताकदीचा वापर करून घेतला म्हणून अलिबागचे पाटील त्यांच्यापासून पुढे दूर झाले. अलिकडल्या काही निवडणूकातून रायगड जिल्ह्यातले सुनील तटकरे आणि जयंत पाटील पुन्हा एकत्र आल्याचे यासाठी बघायला मिळते आहे कि अनिल तटकरे यांची फारशी मदत न घेता त्यांना पोटच्या अनिकेत ला विधान परिषदेवर पाठवायचे होते आणि तेच शेकापच्या जयंत पाटलांना देखील करायचे आहे, राष्ट्रवादीचे हेमंत टकले यांची पुतणी चित्रलेखा, जयंतरावांची स्नुषा आहे आणि तिला देखील विधान परिषदेवर पदवीधर मतदारसंघातून निवडून यायचे असल्याने या दोघांनी एकमेकांना सहकार्य करण्याचे ठरविले आहे, ठरविले होते त्यातून आपले तिकीट कापले जाणार आहे किंवा आपल्याला एकट्याला वाऱ्यावर सोडले जाऊ शकते या भीतीपोटी निरंजन डावखरे यांनी ठरविले, पक्षांतर करायचे, आणि त्यांनी ते केले, ज्या शरद पवारांनी डावखरे कुटुंबाला सतत भरभरून दिले त्यांनी सत्तेत स्थान डळमळीत झाल्याचे दिसताच पक्षांतर केले, श्री निरंजन वसंत डावखरे लगेच भाजपामय झाले… अर्थात त्यांच्या भाजपा मध्ये येण्याचे कोकणातल्या किंवा ठाणे जिल्ह्यातल्या भाजपा मधल्या कोणत्याही मोठ्या नेत्याने यासाठी स्वागत केले नाही कि त्यांच्यातल्या अनेकांनी पदवीधर मतदार संघाची निवडणूक लढविण्याची गेल्या कित्येक वर्षांपासून तयारी केलेली आहे पण निरंजन यांच्या प्रवेशाने पुन्हा एकदा एका आगंतुकाने भाजपा मधल्या खऱ्या कार्यकर्त्याचा अपमान केला आहे…इच्छुकांचे राजकीय नुकसान केलेले आहे त्यामुळे चित्रलेखा पाटील यांचे पदवीधर मतदार संघातून विधान परिषदेवर निवडून जाणे आता
जवळपास नक्की दिसते आहे कारण भाजपातले इच्छुक आणि इतरही काही नेते निरंजन डावखरे यांना मनापासून सहकार्य करणार नाहीत, हि निवडणूक डावखरेंना खूप कठीण आहे…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी