जय विदर्भ : पत्रकार हेमंत जोशी
माईंचा बाबासाहेबांसंगे संसार जेमतेम काही वर्षांचा, त्यांच्या विवाहानंतर बाबासाहेब लवकर गेले म्हणजे माई तर त्यामानाने अगदीच तरुण वयात विधवा झाल्या. १५ एप्रिल १९४८ रोजी माई बाबासाहेबांशी विवाहबद्ध झाल्या, लगेच ६ डिसेंबर १९५६ रोजी बाबासाहेबांचे महानिर्वाण झाले देखील, त्यांचा संसार थोडक्यात जेमतेम थोड्याच वर्षांचा पण त्या ओळखल्या गेल्या या तपस्वीच्या पत्नी अर्धांगिनी म्हणूनच…थोडक्यात काही नाती हि अशी असतात, जेमतेम काही वर्षांची पण अशी नाती अशी माती एकदा का चिकटली कि ती काही केल्या निघता निघत
नाहीत. माझेही तेच झाले आहे म्हणजे माझा मूळ जिल्हा बुलढाणा पण त्या जिल्ह्यात जेवढे माझे राहणे झाले त्यदुप्पट वर्षे मी येथे मुंबईत काढतो आहे. जेमतेम दहावी पास होईपर्यंत कसेबसे आयुष्यतले ते सुरुवातीचे १६ वर्षे मी बुलढाणा जिल्ह्यातल्या जळगाव जामोद या सातपुडा पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्क्याच्या गावी काढली आणि संधी मिळताच बुलढाणा जिल्हा आणि माझे गावही सोडले ते आजतागायत. आज नाही म्हणायला भली मोठी शेती याच जिल्ह्यातल्या खामगावला आहे पण तेथेही जाणे होत नाही….
बहुतेक स्त्री पुरुषांच्या आयुष्यात विविध प्रियकर प्रेयसी येतात आणि जातात पण पहिले प्रेम विसरणे कधीही कोणालाही शक्य झालेले नाही. खरेतर जर नवराबायकोचे एकमेकांवर नक्की प्रेम असेल तर त्यांनी एकमेकांना सांगून टाकायला हवे कि तू माझ्या आयुष्यातली किंवा तू माझ्या आयुष्यातल्या पहिला पुरुष नाहीस किंवा तू माझ्या आयुष्यातली पहिली स्त्री नाहीस पण शेवटचा पुरुष किंवा शेवटची स्त्री नक्की आहेस, आपल्याकडे हे नक्की घडत नाही, कारण आपल्या विवाहाच्या किंवा स्त्री पुरुष संबंधांच्या कल्पना फार वेगळ्या आहेत म्हणाल तर अति खुजा आणि बुरसटलेल्या आहेत..पहिल्या प्रेमासारखे माझे आजही अगदी दररोज होते म्हणजे आयुष्याच्या सुरुवातीला ज्या जिल्ह्यात किंवा ज्या गावात मी काढलीत त्या जिल्ह्याची आणि त्या गावाची अगदी मी जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात असतांना आठवण होत नाही किंवा झाली नाही असे आजतागायत कधीही घडलेले नाही. आणि तेच खरे आहे कि जे पहिल्यांदा वाट्याला येते ते कधीही विसरणे शक्य नसते. मी पहिली कार विकत घेतली तेव्हा माझे वय वर्षे २२ होते कि आमच्याकाळी वयाच्या २२ व्य वर्षी ब्राम्हण तरुणांकडे स्वतःच्या पायावर उभे राहून त्याला सायकल घेणे देखील शक्य नसते, नसायचे. ती सेकंड हॅन्ड फियाट म्हणजे हॉर्न सोडून सारे वाजणारी गाडी आजही दररोज आठवण करायला भाग पाडते आश्चर्य म्हणजे त्यानंतर मी उत्तमोत्तम आजतागायत ६९ कार्स विकत घेतल्या पण तिला विसरता आलेले नाही, इतर गाड्यांची आता तर नावे देखील
आठवत नाहीत. अगदी खरे सांगतो, मी एवढा उनाड होतो किंवा आजही असेल, म्हणजे ज्या दिवशी मी दहावी पास झालो, माझे खडूस पुराणिक सर अगदी जवळ येऊन मला म्हणाले, हेमंत तू पास झाला ना म्हणून आम्ही शिक्षकांनी एकमेकांचे एकमेकांना कडकडून मिठ्या मारून अभिनंदन केले. नशीब, मला दहावीला असतांना एखाद्या तरण्या शिक्षिका नव्हत्या अन्यथा त्या देखील नक्की आनंदोत्सवात सामील झाल्या असत्या..
माझ्या विदर्भात माझ्या बुलढाणा जिल्ह्यात किंवा माझ्या जळगाव जामोद या गावात काहीही आजही चांगले घडले कि मला थेट हृदयातून मनापासून मनातून आनंद होतो. अलीकडे अनेक दरदिवशी टीका करता कि सध्या हा देश किंवा हे राज्य भागवत, फडणवीस आणि गडकरी विदर्भातल्या या तीन बामणांच्या हाती आहे. अहो, बरे झाले त्यांच्या हातात आले म्हणून आमच्या विदर्भाचे नाव तरी इतरांना आठवायला लागले अन्यथा आजतागायत एखाद्या ठेवलेल्या बाईसारखे आम्हा विदर्भवासीयांचे जगणे होते…
येथे मुंबई किंवा पुण्यात किंवा राज्यात, देशात थेट अमेरिकेपर्यंत गाजलेली अथवा नावाजलेली कितीतरी माणसे आमच्या जिल्ह्यातली, माझ्या गावातली आहेत पण त्यांना माझ्या जिल्ह्याचे आणि आमच्या गावाचे नाव देखील सांगायला लाज वाटते, माझे गाव ‘ जळगाव ‘ असे सांगून किंवा फेसबुक वर लिहून ते बहुतेकवेळा मोकळे होतात, भलेही माझा जिल्हा किंवा गाव मागासलेले असेल पण आपल्या गावाचे किंवा जिल्ह्याचे नाव सांगतांना लाज ती का वाटावी, त्याने तुमचे काय लग्न होणार नाही कि इतर सारे तुम्हाला वाळीत टाकणार आहेत, असे अजिबात नसते. आता वय वाढले म्हणून आणि तिचे देखील लग्न झालेले आहे म्हणून अन्यथा, होय, मी अजिबात न लपविता जळगाव जामोदचा आहे, असे सांगून थेट माधुरी दीक्षित ला देखील माझ्या प्रेमात पडायला भाग पडले असते…
हे सारे येथे आठवले ते त्या बुलढाणा अर्बन बँकेमुळे म्हणजे जी बँक थेट ‘ बुलढाणा अर्बन सहकारी पत संस्था ‘ हे असे सामान्य नाव लिहूनही अगदी मुंबईपर्यंत ज्या पत संस्थेच्या भारतातल्या राज्यातल्या विविध ठिकाणी ४००-४२५ शाखा आहेत, होय, ती पत संस्था माझ्या बुलढाणा जिल्ह्यातली तर आहेच पण ज्यांनी बुलढाणा अर्बन सुरु केली ते राधेश्याम चांडक आमच्या बुलढाण्याचे आहेत, त्यांना साथ देणारे शिरीष देशपांडे देखील बुलढाण्याचे आहेत, देशपांडे यांचे आजोळ माझ्या गावातल्या प्रसिद्ध डिडोळकर कुटुंबातले आहे आणि…आणि चांडक तसेच देशपांडे यांच्या खांद्याला खांदा लावून ज्या तिसऱ्या व्यक्तीने मोलाची कामगिरी बजावलेली आहे, बजावतो आहे तो माझा बालमित्र डॉ. किशोर केला हे तर थेट माझया गावातले म्हणजे जळगाव जामोद चे आहेत आणि आजही ते मुंबईत राहणे अगदी सहज शक्य असतांना आमचे गाव सोडून गेलेले नाहीत, आजही ते तेथेच जळगाव जामोद येथेच वास्तव्याला आहेत. चांडकजी, आणि मित्रवर्य शिरीशजी आणि डॉ. किशोर केला, मला, आम्हा सर्वांना तुमच्या तिघांचाही खूप खूप खूप अभिमान आहे…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी