आमची बँक ४ : पत्रकार हेमंत जोशी
अलीकडे पुण्यातले सुप्रसिद्ध इमारत बांधकाम व्यवसायिक ( कुप्रसिद्ध अजिबात नाहीत, ते मुंबईतले ‘ बाबुलाल ‘ नाहीत) अमर बुट्टेपाटील व त्यांचे याच व्यवसायातले परममित्र व्यंकट बिरादार या दोघांशीही भेट झाली, ओळख झाली, पत्रकारितेशिवाय माझ्या अन्य व्यवसायात मी गेल्या अनेक वर्षांपासून यशस्वी आहे, त्यानिमीत्ते भेट झाली आणि ओळख झाली. बिरादार तसेही माझ्या लिखाणाचे गेली अनेक वर्षे नियमित वाचक होते पण त्यांना माझ्या एकंदर लाईफ स्टाईल आणि लिखाणावरून वाटायचे कि हेही पत्रकार महाशय मोठमोठ्या तोडपण्या करणारे आहेत पण अमुक एक व्यवसाय माझा आहे आहे त्यातही मला परमेश्वर कृपेने अभ्यास आणि यश आहे, ते बघून बिरादार आधी अवाक झाले आणि त्यांनी थेट मनातले सांगितले कि त्यांना नेमके माझ्याविषयी हेच वाटायचे कि, पैसे द्या नाहीतर छापतो, पद्धतीची माझी देखील पत्रकारिता आहे, अनेकांना ते वाटते कारण माझ्या पत्रकारितेतले काही हितचिंतक माझी हि अशी बदनामी करीत असतात आणि स्वतः मात्र भले भले पत्रकार तेच करतात, दलाली करतात आणि तोडपण्या करतात, मी, आम्ही सतत थेट आणि आक्रमक लिहितो त्यामुळे आमचीही पित पत्रकारिता असे अनेकांना नक्की वाटते, वाटू शकते पण जे आमच्या अगदी जवळ आहेत,पात्यांना माहित आहे आम्ही बाप बेटे वेगळे कसे. ब्लॅकमेलिंग न करणारे या पत्रकारितेत अभय देशपांडे, भाऊ तोरसेकर, उदय निरगुडकर फार कमी आहेत…
इमारतीच्या बांधकाम व्यवसायात देखील अमर बुट्टेपाटील किंवा व्यंकट बिरादारांसारखे फारच थोडे न फसविणारे आहेत. अमर यांनी तर मुंबई आणि पुण्यात किमान ७०-७२ इमारती बांधल्या , त्यांचे काका, साहेबराव बुट्टेपाटील ८० च्या दशकात राजगुरूनगर मधून निवडून आलेले आमदार होते पण ते देखील रामभाऊ म्हाळगींच्या संस्कारातले होते म्हणून त्यांना मुंबईत चार वेळा थेट वरळीला आमदार कोट्यातून सदनिका मिळून देखील त्यांनी ती कधीही घेतली नाही. अमर यांचे वडील नानासाहेब बुट्टेपाटील यांनी इमारती बांधकामाच्या व्यवसायात प्रामाणिक पाउल ठेवले आणि अमर यांचे देखील वडिलांच्या पावलावर पाऊल म्हणजे व्यवसायात सचोटी, प्रामाणिकपणा. चुकीचे काम न करता देखील पैसे मिळविता येतात, फक्त पेशन्स हवेत आणि अत्यंत महत्वाचे म्हणजे पैशांचे आणि आयुष्याचे उत्तम नियोजन हवे. मराठा ज्ञाती मध्ये व्यवसायात उतरलेल्या मंडळींची जी पुण्यात यशस्वी संघटना आहे त्यात व्यंकट बिरादार आणि अमर बुट्टेपाटील यांचे योगदान मोठे आहे, कौतुकास्पद आहे..
हा संदर्भ येथे यासाठी कि मी बुलडाणा अर्बन वर व्यापक लिहितोय म्हटल्यावर,अनेकांना तेच वाटले असावे, काहीतरी घबाड मिळाले असावे पण असे अजिबात नसते त्यामागे एकमेव उद्देश म्हणजे माझ्या गावातल्या आणि मागास जिल्ह्यातल्या तीन पराक्रमी पुरुषांनी जगप्रसिद्ध करून सोडलेली बुलडाणा अर्बन हि ‘ केवळ पतसंस्था ‘ अलीकडे थेट मुंबईत आणली म्हणून त्यांच्या नेमक्या भूमिकेवर माझे हे लिखाण, बुलडाणा अर्बन ला मुंबईकरांनी देखील उचलून धरावे हा प्रामाणिक हेतू व उद्देश. भाईजी उर्फ राधेश्याम चांडक आणि त्यांना अगदी सुरुवातीपासून बँक व बँकेच्या प्रत्येक यशस्वी सामाजिक उपक्रमात देखील जीवापाड सहकार्य करणारे शिरीष देशपांडे, डॉ. किशोर केला, या त्रिकुटामुळे मला राहवले नाही आणि बुलडाणा अर्बन नेमकी कशी, पुरावे घेऊन लिहायला सुरुवात केली. म्हणजे मी शिरीष देशपांडे यांना म्हणालो देखील कि आता तुम्हाला मोठे यश मिळलेले आहे, तोंडाला या उतरत्या वयात फेस येईपर्यंत बुलडाणा अर्बन साठी एवढी मेहनत, आता ती कमी करा, शिरीष हसले आणि पुन्हा धावपळीत लागले. असो, दलाली करूनच मोठे होता येते हा समज पत्रकारिता करणाऱ्या नियमित दलालांनी मनातून काढून टाकावा. पैसे नक्की मिळवावेत पण तेच मिळविण्यासाठी पत्रकारिता करू नये…
एक नक्की सांगता येईल, १९८६ दरम्यान लहानशा सहकारी चळवळीतून बुलडाणा अर्बन च्या समृद्धीचा प्रवास केवळ १२ हजार रुपयांच्या भरवशावर सुरु झाला, आज त्याच बुलडाणा अर्बन च्या नऊ राज्यातून ४२२ शाखा, ५८०० कोटींच्या ठेवी आणि १०हजार कोटींची उलाढाल असा विस्तार, विशेष म्हणजे असे एकही सामाजिक क्षेत्र नसावे त्यात भाईजींच्या बुलडाणा अर्बन चा सहभाग नाही असे सामाजिक क्षेत्र नाही मग ते कार्य विकलांगांसाठी असेल, वीरमरण आलेल्या जवानांच्या कुटुंबियांसाठीचे असेल, बुलडाणा अर्बन घेत असलेली आरोग्य शिबिरे असतील, पारदर्शी सोने तारण योजना असेल किंवा अन्य असे कितीतरी सामाजिक उपक्रम, असा हा समृद्धीचा पारदर्शी मार्ग, व्यवहार आणि समाजकार्य, दोन्हीकडे नावाजलेले, नामवंत हे भारतात पसरलेले बुलडाणा अर्बन कुटुंबीय, कौतूक करतांना शब्द नक्की अपुरे पडतात, छाती अभिमानाने फुलून येते…
जाता जाता :
प्लास्टिक बंदी शिथिल झाली आणि राज ठाकरे यांनी या बंदीच्या संदर्भात केलेली नेमकी टीका जवळपास खरी ठरली. रामदास कदम आणि चांगले काम, अर्थात हेही अपेक्षित नव्हतेच त्यामुळे नजीकच्या काळात प्लास्टिक बंदी केवळ कागद पत्रांपुरती नेहमीसारखी उरेल आणि काहींना त्यातून लागणारे मोठे पैसे, आपोआप नियमित मिळत राहतील, जी सोय गुटखा बंदीने अनेकांची केली तशी हुबेहूब सुरुवात आता प्लास्टिक बंदी मध्ये देखील सुरु झालेली आहे. हे सारे बघून माझ्यातल्या
पत्रकारितेचा नेमका सिंहासन मधला निळू फुले यांचा शेवट होतो, वेड लागते…
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी