अभिमन्यू पॉवर १ : पत्रकार हेमंत जोशी
एकाच बिछान्यावर स्त्री पुरुष मग ते कुठल्याही वयातले, निजले असता त्यांनी पाळलेले ब्रम्हचर्य किंवा काहीही न करता, एकमेकांना स्पर्शही न करता एकमेकांकडे पाठ करून रात्र काढणे ते तलवारीच्या धारेवर चालण्यासारखे अत्यंत कठीण असे काम म्हणूनच असे म्हटल्या जाते कि एकांतात तरुण स्त्रीने आपल्या पित्यासंगे देखील राहू नये. हे अभिमन्यू पवारमुळे आठवले. अभिमन्यू पवार म्हणायला सांगायला मुख्यमंत्र्यांचे पीएआहेत वास्तवात ते म्हणाल तर मुख्यमंत्र्यांचे सहकारी आहेत म्हणाल तर
श्रीकांत भारतीय यांच्यासारखे गुरुभावासारखे आहेत. देवेंद्र फडणवीस, अभिमन्यू पवार व श्रीकांत भारतीय तिघेही ध्वजाला गुरुदक्षिणा अर्पण करणारे म्हणून त्यांना गुरुभाऊ म्हणालो…
अलीकडे मुंबईवरून नागपूरला येतांना श्रीकांत भारतीय विमानतळावर भेटले,नंतर विमानात देखील शेजारी बसलो होतो, गप्पा रंगल्या. श्रीकांत भारतीय किंवा अभिमन्यू पवार नेमके काय करतात नेमके कोण आहेत सांगायलाच हवे, सर्वांनाच ते ठाऊक असतील असेही नाही किंवा संघ भाजपा परिवारा व्यतिरिक्त ते फारसे इतरांना ठाऊक असावेत, वाटत नाही. भारतीय किंवा पवार म्हणजे अनिल थत्ते नव्हेत कि बसता उठता त्यांचे मुख्यमंत्र्यांबरोबर त्या मणिलाल छेडा सारखे फोटो वारंवार बघायला मिळावेत, थोडक्यात अभिमन्यू पवार किंवा श्रीकांत भारतीय हे अनिल थत्ते नाहीत आणि आपले मुख्यमंत्री हे ‘ मणिलाल छेडा ‘ नाहीत…
मणिलाल छेडा आणि अनिल थत्ते यांची जाहिरात एखाद्या वाहिनीवर बघतांना मजा येते म्हणजे आधी मणिलाल दिसतो नंतर एखाद्या जादूगारा सारखे पटकन अनिल थत्ते दिसतात. हे असे या दोघांचे तर अजिबात नाही म्हणजे आधी अमुक एखाद्या फोटोत सुरुवातीला फक्त फडणवीस दिसतात नंतर श्रीकांत भारतीय किंवा अभिमन्यू पवार दिसतात. श्रीकांत आणि अभिमन्यू म्हणाल तर संघ परिवारातले अधिक पण भाजपाशी देखील संबंध ठेवून आहेत, हे दोघेही मुख्यमंत्री कार्यालयात वेगवेगळ्या विविध जबाबदाऱ्या सांभाळतात. संघ भाजपा मधले सर्वसामान्य स्वयंसेवक किंवा कार्यकर्ते आणि मुख्यमंत्री यांच्यात नेमके समन्वय साधण्याची महत्वाची जबाबदारी श्रीकांत भारतीय पार पाडतात त्यासाठी त्यांना मंत्रालयातील थेट सहाव्या माळ्यावर
केबिन देण्यात आलेली आहे…
जे आजतागायत इतरांना, इतर कोणत्याही राजकीय पक्षाला सुचले नाही ते संघाने केले आणि मुख्यमंत्र्यांनी देखील सहमती दिली म्हणजे थेट मुख्यमंत्री कार्यालयात हे असे अभिमन्यू किंवा भारतीय यांच्यासारख्या काही मंडळींना थेट समन्वय साधण्यासाठी स्थान दिले, परवानगी दिली.माझे नेमके बोलणे केवळ श्रीकांत यांच्या ध्यानात येऊ शकते म्हणून मनात अनेक दिवसांपासून साचलेली खदखद प्रवासादरम्यान मी त्यांच्याकडे व्यक्त केली, म्हणालो, जे सुशीलकुमार शिंदे, शरद पवार, विलासराव देशमुख, बॅरिस्टर अंतुले यांनी मुख्यमंत्री असतांना एक वेगळे असे काम मोठ्या खुबीने करवून घेतले ते तसे करतांना तुम्ही कमी पडताहेत असे मला वारंवार वाटते. म्हणजे छोट्या छोट्या प्रसंगातून या मंडळींना ज्या खुबीने रंगविल्या गेले ते अगदी सहज तुम्हा सर्वांना शक्य असतांना तुम्ही कोणीही केले नाही त्याचे वाईट वाटते. आजपासून आत्तापासूनच सुरुवात करतो, भारतीय म्हणाले आणि त्यांनी सांगितले कि या ठिकाणावरून त्या ठिकाणावर जातांना जर घाई असेल तरच फडणवीस त्यांच्या ताफ्याला सिग्नल्स तोडायला परवानगी देतात अन्यथा त्यांचा ताफा प्रत्येक सिग्नल एखाद्या सामान्य माणसासारखा पाळतो आणि ग्रीन सिग्नल पडल्यावरच ते पुढे मार्गस्थ होतात. मुख्यमंत्री २४ तासात फारतर ५ तास झोप काढतात, इतरवेळी संपूर्ण वेळ ते फक्त आणि फक्त आपल्या राज्यासाठी देतात, असेही ते म्हणाले. प्लास्टिक बंदी असल्यामुळे पंढरीच्या वारीत सामान्य वारकऱ्यांना प्लास्टिक चा रेन कोट वापरतांना मोठ्या रकमेच्या दंडाला सामोरे जाऊ लागू नये म्हणून भारतीय यांनी केवळ मेसेज करून मुख्यमंत्र्यांना कळविले आणि पुढल्या काही तासात मुख्यमंत्र्यांनी वारकऱ्यांसाठी प्लास्टिक रेन कोट ची अट मान्य केली. थोडक्यात भारतीय यांच्या संगे त्या प्रवासात माझ्या मनासारखे घडले, पहिल्यांदा कोणीतरी मुख्यमंत्र्यांचे किस्से खुलविले, नेमके मुख्यमंत्री कसे आहेत हे अशा किस्स्यांमधुन जनतेला सहज कळत असते….
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी