महत्वाकांक्षी महाजन ३ : पत्रकार हेमंत जोशी
भाजपाच्या प्रत्येकाला या राज्याचे मुख्यमंत्री व्हायचे आहे, पुढल्यावेळी त्यांची सत्ता आली तर सर्वश्री एकनाथ खडसे, रावसाहेब दानवे, सुधीर मुनगंटीवार, विनोद तावडे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील आणि आता गिरीश महाजन यांनाही मुख्यमंत्री व्हायचे आहे. आधी महाजन या स्पर्धेत नव्हते आता ते साऱ्या इच्छुकांच्या पुढे निघून गेलेले आहेत, खडसे तर नेमके हेच म्हणत असतील, ज्या पोर्याले खांद्यांवर घेतलं त्यानंच कानात मुतून ठेवलं, हे म्हणण्याची वेळ भविष्यात फडणवीसांवर देखील येऊन ठेपेल….
कोण कोण पुढले मुख्यमंत्री होऊ शकतात, हे आमच्या ध्यानात येते म्हणजे काँग्रेस सत्तेत आली तर हा मान नगर जिल्ह्यातल्या, या राज्यातल्या माजी महसूल मंत्र्याला बाळासाहेब थोरातांना मिळण्याची दाट शक्यता आहे, दिल्लीत अलीकडे या राज्यातल्या ज्या दोघांचे बऱ्यापैकी महत्व वाढलेले आहे ते आहेत अर्थात बाळासाहेब थोरात आणि अमरावती जिल्ह्यातल्या भाषाप्रभू धाडसी बुद्धिमान महिला आमदार श्रीमती यशोमती ठाकूर, अद्याप महिला मुख्यमंत्री होण्याचा मान या राज्याला मिळालेला नाही, बघूया…
ज्यांच्या शब्दाला काँग्रेस श्रेष्ठींकडे मान आहे, ज्यांचे दिल्ली दरबारी वजन आहे त्या सुशीलकुमार शिंदे, मुकुल वासनिक यांच्यापेक्षा कितीतरी पुढे या राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, ते गांधी परिवाराला फार फार जवळचे आहे, चव्हाण सांगतात आणि गांधींच्या घरातले त्यावर हमखास हो म्हणतात. तेच येथे राज्यातही म्हणजे बाळासाहेब थोरात जे सांगायचे त्याला मुख्यमंत्री असतांना खडूस ठरलेले पृथ्वीराज नेहमी हो म्हणायचे, चव्हाण आणि थोरात एकमेकांच्या क्लोज आहेत, म्हणजे त्यांचे ते तसे मुंबईतल्या पत्रकारांसारखे नाही, जे सांगत सुटले आहेत कि आम्ही फडणवीसांच्या खूप खूप क्लोज आहोत, अर्थात ते फडणवीसांनी देखील म्हणायला हवे, पण ते घडतांना दिसत नाही, फडणवीसांना फार तर तिरळे बघणार्या तरुणीची उपमा द्या, त्यांचे ते तसे सुरुवातीपासूनच तसे आहे, अनेकांना वाटते, फडणवीस फक्त आपल्याकडे बघून हसताहेत. एक बरे झाले फडणवीसांचे अमृता एके अमृता वागणे आहे ते जर सुशीलकुमारांच्या रांगेतले असते तर दरदिवशी घायाळ होणाऱ्या तरुणींची संख्या झपाट्याने वाढते आहे, आम्हाला आढळले असते..
पार पडलेले नागपूर पावसाळी अधिवेशन संपवून आम्ही मुंबईला परत येत असतांना विमानात एकाचवेळी शेजारी एकमेकांना बिलगून घट्ट पकडून बसलेल्या बाळासाहेब थोरात आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी बोलणे झाले, गप्पा छान रंगल्या, एरवी फारसे न हसणारे पृथ्वीराज माझ्या त्या नेहमीच्या वाक्यावर दिलखुलास हसले, मी त्यांना म्हणालो, मागल्यावेळी तुम्ही मुख्यमंत्री नसते तर राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी, गेट वे ऑफ इंडिया, आमच्याच मालकीचा आहे, सांगून तोही विकून टाकला असता. थोरात म्हणाले तुम्हाला माहित नसेल यदु जोशी यांचे सख्खे भाऊ आहेत, त्यावर पृथ्वीराज म्हणाले, यदु कधी बोलले नाहीत त्यावर मी त्यांना म्हणालो, पत्रकारितेत आमची त्यांच्यासमोर उंची ठेंगणी आहे असे त्यांना सतत वाटत असल्याने हे घडते, तुमच्याही बाबतीत तेच घडले असावे…जर पुढल्यावेळी तुमची सत्ता आली तर या राज्याला पुन्हा तुम्हीच हवेत, तुमचे ते कडक हेड मास्तरसारखे वागणे, जे स्वाभिमानी मराठी आहेत त्यांना आवडणारे आहे, त्यावर ते म्हणाले, मी नाही, पुढले मुख्यमंत्री हे असतील, बाळासाहेब थोरातांच्या खांद्यावर हात ठेवत ते म्हणाले. त्यांच्या बोलण्याला नक्की अर्थ आहे असे सध्या तरी दिसते आहे. पण हा सारा जर तर चा प्रश्न आहे, देवेंद्र फडणवीस पुढल्यावेळी सहजा सहजी इतरांचे राज्य येऊ देतील, वाटत नाही. पण आपल्या वाटण्याला अनेकदा अर्थ नसतो, मला अनेकदा वाटायचे कि पत्रकार राजन पारकरचे लग्न एखाद्या मराठी नटीशी
व्हावे म्हणजे आमची त्याच्या घरी उठ बैस वाढेल, पण अजून तरी ते घडलेले नाही, घडण्याची शक्यता नाकारता येत नाही कारण राजन हा वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हाताला हात लावून झाडांना पाणी घालतोय, विविध होर्डिंग्स वर त्यांचे हे फोटो बघून, अनेकांना वाटू लागलेले आहे, नवरा असावा तर असा..
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाणांना पुन्हा एकदा दिल्लीचे वेध लागलेले दिसताहेत म्हणून त्यांनी आपल्या या मित्राचे म्हणजे बाळासाहेब थोरातांचे नाव पुढे केले असावे. चॉईस इज नॉट बॅड, थोरात मितभाषी आहेत, कमी बोलणारे पण योग्य बोलणारे आहेत विशेष म्हणजे प्रसंगी कठोर निर्णय घेणारे आहेत, बघूया वर्षभरानंतर नेमके काय घडते, आम्ही उगाचच आज येथे त्यावर चर्चा करतोय, हे म्हणजे असे झाले कि पाळण्यात नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाचे आपण धुमधडाक्यात लग्न करू, सांगण्यासारखे.नेमक्या विषयाला हात घालतो, गिरीश महाजनांचे नेमके काय, पुरावे देऊन तुम्हाला सांगतो…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी