महत्वाकांक्षी महाजन ५ : पत्रकार हेमंत जोशी
आम्ही सारे जेव्हा जळगाव जामोद या सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या तालुक्याच्या गावी शिकायला होतो, शाळेत होतो तेव्हा आमची आर्थिक मानसिक स्थिती पार बिघडलेली होती, गरिबीने पिचलो होतो कारण आई फार लवकर देवाघरी गेलेली, वडील शिक्षक त्यांना जेमतेम पगार तूट ते आणि आम्ही सहा भावंडे, मोठा बिकट असा तो काळ होता, आईविना मुलांना कोणी जवळ घेईना, एखाद्या अनाथासारखे ते आयुष्य होते पण त्याही व्यथित दिवसांमध्ये ज्यांनी आम्हाला न तिटकारा करता जवळ घेतले ते सदैव स्मरणात राहील आजतागायत त्यात त्यावेळेचे दुबे सर, कपले सर, पुराणिक सर असे बोटावर मोजण्याएवढे, अलीकडे श्रीमती सुधा पिंगळे देवाघरी गेल्या, त्यांचे पती आणि त्या, दोघेही अनुक्रमे प्राध्यापक आणि शिक्षक होते, जेव्हा श्रीमंत सुखवस्तू सुशिक्षित घरातली माणसे आम्हा सर्व भावंडांना हाडतूड करण्यात धन्य समजायचे त्यावेळी पिंगळे मामा आणि मामी त्यांच्या मुलामुलींना आमच्याशी मैत्रीचे संबंध ठेवतांना त्यांनी कधी आडकाठी घेतली नाही, साहजिकच अशी माणसे कायम स्मरणात कोरल्या गेलेली आहेत, अशांचे उपकार न फिटणारे.…
हा आयुष्याचा खतरनाक इतिहास मला त्या धृपत सावळे यांच्यामुळे येथे आठवला. धृपत सावळे हे बुलढाणा जिल्ह्यातून काँग्रेसच्या तिकिटावर तीन तीन वेळा आमदार म्हणून निवडून आलेले, त्यांचे राजकारणातले आगमन मला आजही जसेच्या तसे आठवते म्हणजे जेव्हापासून ते युथ काँग्रेस मध्ये प्रवेश करते झाले तेव्हापासून. जेव्हा बुलढाणा जिल्ह्यातल्या किंवा महाराष्ट्रातल्या संघ किंवा भाजपाला राजकीय किंवा आर्थिक ताकदीची गरज होती तेव्हा हे असे धृपतराव सारखे नेते संघ भाजपाच्या आसपास देखील नव्हते याउलट संघ किंवा भाजपाचे वाटोळे करण्यात, त्यांना तीव्र तिखट विरोध करण्यात मग्न
होते, संघ भाजपाला भग्न करण्यात गुंतलेले होते…
येथे नेमके तेच मला सांगायचे आहे कि आपल्या वाईट काळात जी माणसे धावून येतात, आपल्याला जवळ घेतात ती खऱ्या अर्थाने आपल्यावर प्रेम करणारी, असे धृपत सावळे किंवा राज्यातले जे अनेक अलीकडे भाजपा मध्ये वाट अडवून बसलेले आहेत, बाहेरून येऊन, ज्यांनी संघ भाजपाची सेवा वाईट काळात केली त्यांना दूर सारून दूरवर ढकलून हे संधीसाधू ज्या वाईट पद्धतीने मूळ पुरुषांना मानसिक अस्वस्थ करून सोडताहेत ते मोठे वाईट असे काम आहे आणि चूक भाजपा नेत्यांची आहे जे धृपत सावळे सारख्या संधी साधू मंडळींना मांडीवर बसवून घेण्याचे पाप करून मोकळे होताहेत, असे घडायला नको होते….
काँग्रेस किंवा राष्ट्रवादी म्हणजे तीन चाकांची सायकल, जशी तीन चाकांची सायकल शिकावी लागत नाही किंवा बाथरूम सिंगर्स ला शास्त्रोक्त गायन शिकून गायक व्हावे लागत नाही तेच काँग्रेस किंवा राष्ट्रवादीचे आहे तेथे काम करण्यापूर्वी फार काही अभ्यास करून सुरुवात करावी लागत नाही, पण संघ किंवा भाजपाचे अजिबात ते तसे नाही, भाजपामध्ये काम करण्या पूर्वी संघ आणि भाजपाची नेमकी विचारसरणी त्यांचे विचार आचार आधी समजून घ्यावे लागतात, प्रचंड मेहनत घेऊन अभ्यास करून ते साध्य होते, सहजासहजी संघ आणि भाजपा कळत नाही, त्यामुळे कोणताही मागला पुढला विचार न करता रावसाहेब दानवे यांच्यासारखे प्रदेशाध्यक्ष जेव्हा केवळ नात्यागोत्याचा विचार करून आयत्यावेळी तेही अजिबात गरज नसतांना धृपत साळवे सारख्या ज्यांना संघ भाजपामधले कवडीची ज्ञान नाही अशा नेत्यांना थेट बाहेरून आयात करून जिल्हाध्यक्ष म्हणून साधना करून संघ आणि भाजपामध्ये स्थान निर्माण केलेल्या कार्यकर्त्यांच्या, स्वयंसेवकांच्या, नेत्यांच्या डोक्यावर हे असे बाहेरचे नेते लादून मोकळे होतात, स्वतःच्या पायावर कुर्हाड मारून घेणे नेमके यालाच म्हणतात. एखाद्या राजकीय पक्षाचे वाटोळे त्यामुळेच होते…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी