महत्वाकांक्षी महाजन : शेवटचा भाग : पत्रकार हेमंत जोशी
जळगाव जिल्ह्याचे राजकारण राजकीय पक्ष्याभोवती नव्हे तर एखाद्या नेत्याभोवती फिरत असते थोडक्यात जळगाव जिल्ह्याचे मतदार हे पक्षपुजक नव्हे तर व्यक्तिपूजक आहेत, सुरुवातीला या जिल्ह्यातले मतदार दिवंगत मधुकरराव उर्फ बाळासाहेब चौधरी यांना फॉलो करणारे होते त्यांच्या लेवा एके लेवा पद्धतीच्या नेतृत्वाला उबगल्यानंतर मतदारांनी मग मुक्ताई नगरच्या प्रतिभाताई पाटलांची तरुण आणि नव नेतृत्व म्हणून गोडवे गेला सुरुवात केली, आरती करायला सुरुवात केली. सुरूवातीला प्रतिभाताई पाटलांनी बाळासाहेबांचे महत्व बरेचसे कमी केले त्यांचे महत्व कमी करण्यात दिवंगत माजी गृहराज्य मंत्री जी. तू. महाजन यांचाही मोठा सहभाग होता पण ८० च्या दशकात सुरेशदादा जैन नामें झंझावाताने खऱ्या अर्थाने बाळासाहेब चौधरी यांना खिरोद्याला त्यांच्या घरी पाठवून दिले, ज्याकाळी म्हणजे यशवंतराव चव्हाण किंवा वसंतराव नाईक यांच्या काळात सतत २२-२३ वर्षे विविध महत्वाची खाती सांभाळणारे मंत्री, आणि मुख्यमंत्री होण्याच्या स्पर्धेतले हेच बाळासाहेब सुरेशदादांसमोर जनतेला, मतदारांना आठवेनासे झाले होते, त्यांनी ज्या लेवा पाटलांवर म्हणजे आपल्या जातीच्या लोकांवर प्रेम केले होते तेही बाळासाहेबांना सुरेशदादांच्या झंझावातासमोर विसरले होते, नंतर १९९० दरम्यान म्हणजे तब्बल दहा बारा वर्षांनंतर बाळासाहेब हे विधानसभेला निवडून आले आणि शरद पवार यांनी त्यांना विधान सभेचे अध्यक्ष केले, थोडक्यात प्रदीर्घ वनवासानंतर बाळासाहेब सत्तेत आले तोपर्यंत त्यांना जी. तू महाजन, प्रतिभाताई पाटील विशेषतः सुरेशदादा जैन यांनी राज्याच्या जळगाव जिल्ह्याच्या राजकारणात नोव्हेअर केले होते…
मात्र १९८० पूर्वी जळगाव जिल्ह्याच्या राजकीय पटलावर जो अतिप्रचंड राजकीय प्रभाव बाळासाहेब चौधरी यांचा होता ते १९९० दरम्यान विधान सभेचे अध्यक्ष सतत पाच वर्षे राहून देखील त्यांना तो प्रभाव पुन्हा पाडता आला नाही, त्यांची विधान सभेची मुदत सम्पल्यानांतर ते पुन्हा राजकीय वनवासात गेल्याचे जवळपास दृश्य होते त्यानंतर त्यांचे चिरंजीव, शिरीष चौधरी नाही म्हणायला आमदार झाले पण त्यांना बापासारखे फार पुढे जाता आले नाही, नशिबाने शिरीष निवडून आले, एवढेच म्हणता येईल. पण बाळासाहेबांना पर्याय म्हणून सुरेशदादा जैन यांचे वाढलेले राजकीय प्रस्थ आणि महत्व कमी करण्यासाठी त्यानंतर एकनाथ खडसे यांना सुरेश दादांच्या विरोधकांनी म्हणजे दस्तुरखुद्द शरद पवार, दिवंगत जी. तू. महाजन, बाळासाहेब चौधरी इत्यादी नेत्यांनी पूर्ण ताकद देऊन संपविले, विशेष म्हणजे एकनाथ खडसे यांनी त्याकाळी एकाचवेळी अनेकांना घायाळ केले, त्यांनी सुरेशदादा जैन यांना जिल्ह्याच्या राजकारणातून हद्दपार केले, प्रतिभाताई पाटलांना मुक्ताई नगर आणि जिल्हा काँग्रेस मधून थेट अमरावतीला पाठवून दिले, त्यांनी जिल्ह्यातली काँग्रेस संपविली, दिग्गज नेते बाजूला सारले आणि स्वतःला त्याचवेळी नेता म्हणून प्रस्थापित केले…
सुरेशदादा जैन यांचे राजकीय महत्व कमी करण्यासाठी राज्यमंत्री म्हणून जी. तू महाजन आणि विधान सभाध्यक्ष बाळासाहेब चौधरी यांनी आपल्या या तिसर्या लेवा बंधूला त्याकाळी जे सहकार्य केले ते बघून वाटायचे खडसे भाजपामध्ये आहेत कि काँग्रेस मध्ये, पण खडसे यांनी सारा राजकीय फायदा तोपर्यंत नावापुरत्या असलेल्या भाजपाला करून दिला आणि स्वतः देखील ते जिल्ह्याचे टॉपचे नेते झाले. आज जळगाव जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात दिसणारी भारतीय जनता पार्टी, हे श्रेय केवळ एकनाथ खडसे यांचे, तोपर्यंत गिरीश महाजन केवळ एका मतदार संघाचे म्हणजे जामनेरचे हिरो होते…
जळगाव जिल्हा, वर सांगितले त्याप्रमाणे व्यक्तिपूजक आहे त्यामुळे या जिल्ह्याचे राजकारण आजतागायत कोणत्याही एका नेत्याभोवताली फिरत आलेले आहे, कधी ते जी. तू. महाजन असतील, कधी प्रतिभाताई तर कधी बाळासाहेब चौधरी तर कधी सुरेशदादा जैन, या जिल्ह्यातले मतदार एकाला कंटाळले कि दुसऱ्याला जवळ घेतात मग त्या नेत्याचे लाड प्यार करतात, त्याला डोक्यावर बसवतात, कडेवर घेतात, मांडीवर झोपवून थोपटतात, नंतर वाटल्यास धो धो धोपटतात, अंगाखांद्यावर घेतात, पप्प्या घेतात, त्या नेत्या सभोवताली झिम्मा फुगडी खेळतात, प्रसंगी देवाला देखील विसरून त्याची आरती करतात, त्याला नित्य नियमाने भेटतात, अगदी त्याच्या घरी जाऊन त्याची आरती करतात, नंदुरबारच्या नवख्या तरुणाला प्रसंगी अमळनेर मध्ये आमंत्रित करून त्याला आमदार म्हणते निवडून आणतात मात्र अमुक एखादा खांद्यावर चढवून घेतलेला नेता त्यांच्याच कानात मुतायला लागला रे लागला कि आधी खान्देशी मतदार कठोर होऊन त्याच्याकडे पाठ फिरवतात नंतर जिल्ह्याच्या राजकारणातून अक्षरश: नोव्हेअर करतात मग तो कोणीही असो, आज याच जळगाव जिल्ह्याने, जळगाव शहराने विद्यमान मंत्री गिरीश महाजन यांना प्रचंड डोक्यावर घेतलेले आहे, एकेकाळी ज्या एकनाथ खडसे किंवा सुरेशदादा जैन यांच्या समोर चिक्की लो भाई चिक्की म्हणून ओरडणारे तेच गिरीश महाजन सत्तेला चिटकून बसले आहेत आणि दादा व नाथा राजकीय परिघाबाहेर फेकल्या गेलेले आहे त्यात महाजन यांची मेहनत आणि त्या दोघांच्या गंभीर राजकीय आणि आर्थिक चुका, त्यातून महाजन पुढे गेले आहेत आणि नाथा व दादा यांच्या हाती केवळ टाळ्या पिटण्या पलीकडे काहीही उरलेले नाही, महत्वाचे म्हणजे अनेक शारीरिक व्याधींनी व्यापलेले सुरेशदादा जैन आणि एकनाथ खडसे राजकीय दृष्ट्या महाविद्यालयीन तरुणांसारखे दुडूदुडू धावणाऱ्या चॉक्लेल्टी गिरीश महाजन यांच्यासमोर कसे टिकतील, त्यावर घ्यावी तेवढी शंका कमी आहे…
पण खांदेश ची ती राजकीय परंपरा आहे म्हणजे प्रत्येक दहा वर्षांच्या काल खंडानंतर आधीच्या प्रभावी नेत्याला पर्याय तयार होत असतो, अर्थात हा पर्याय दुर्दैवाने खडसे किंवा जैन यांच्या घरी जन्माला आलेला आहे असे कोणतेही लक्षण दिसत नाही त्यामुळे महाजन यांच्यासमोर तयार होणारा पर्याय अद्याप समोर आलेला दिसत नाही पण अमुक एखादा जातीयवादी न ठरणारा आणि शुद्ध चारित्र्याला जवळ बाळगणारा नेता गिरीश महाजन यांना लगेचच पर्याय म्हणून पुढे येऊ शकतो. एक मात्र नक्की, गिरीश महाजन यांचे समर्थक आता अगदी उघड उघड म्हणू लागलेले आहेत कि गिरीशभाऊंनी सुरेशदादा जैन असोत कि एकनाथ खडसे, ईश्वरबाबू जैन असोत कि बापाच्या पुण्याईवर जेमतेम पुढे आलेले रवींद्र प्रल्हादराव पाटील आणि अन्य कोणतेही जिल्ह्यातले नेते, त्या साऱ्यांना झुकवून नमवून हरवून बाजी मारलेली आहे आता आमचे पुढील टार्गेट आहे, फडणवीसांची जागा घेणे…
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी