भाकरी करपली ४ : पत्रकार हेमंत जोशी
या राज्यातल्या विधान परिषदा निवडणुकांनी आणि राष्ट्रवादी तसेच भाजपा सारख्या नवश्रीमंत झालेल्या पक्षातल्या उमेदवारांनी प्रत्येक निवडणूक खर्चिक करून ठेवलेली आहे. कोट्यवधी रुपये गाठीशी असल्याशिवाय मोठा खर्च करण्याची ताकद असल्याशिवाय कोणीही कोणतीही निवडणूक लढविणे शक्य नाही. आधी निवडणुकांवर मोठा खर्च करायचा, होऊन जाऊ द्या खर्च म्हणायचे नंतर झालेला खर्च विविध योजनांसाठी सरकार जो निधी उपलब्ध करून देते त्यातून किंवा अन्य वाईट कामें करून खर्च केलेले पैसे कितीतरी अधिक पट वसूल करायचे, नेत्यांकडे हे दृश्य बघणे असणे मला वाटते आता हे फारच कॉमन झालेले आहे. पण भाजपाचे मंत्री किंवा मुख्यमंत्री सहकार्य करीत नाहीत कारण शिवसेना नेते त्यांची वेळोवेळी दरदिवशी माय बहीण घेतात, काढतात आणि हाती एखादे पद नाही, सत्ता नाही, मंत्री किंवा किमान राज्यमंत्री देखील केल्या गेलेले नाही, म्हणजे शिवसेनेत थेट लोकांमधून निवडून आलेल्यांना अडगळीत टाकलेले आहे आणि विधान परिषद सदस्यांना मंत्री करून मोकळे झाले आहेत त्यामुळे ऐकून कदाचित तुम्हाला आश्चर्य वाटेल सेनेच्या ६३ आमदारांपैकी जवळपास ४० आमदारांची आर्थिक अवस्था एवढी बिकट आहे कि त्यांना आगामी विधान सभा कशी लढवावी याची फार मोठी काळजी त्यांना लागून राहिलेली आहे…
अत्यंत महत्वाचे म्हणजे निवडणूक मग ती कोणतीही असो शिवसेनेत त्या त्या निवडणुकीतल्या उमेदवारांना खर्चासाठी खर्च करण्यासाठी एकही छदाम पाठविल्या जात नाही ज्याला त्याला स्वतःच्या पदरचे पैसे काढून किंवा स्थानिक मंडळींच्या भरवशावर निवडणुकीतले आर्थिक निकष भागवावे लागतात त्यामुळे येणाऱ्या विधान सभा निवडणुकीत अन्य राजकीय पक्षात जे घडते ते शिवसेनेत कधीही घडत नाही, खुदके जेबसे खर्च करो, तोंडावर सांगितल्या जाते. सार्वजनिक कामांची वानवा आणि हाती सत्ता नाही, रात्री झोपण्यापूर्वी डोक्याचे केस उपटण्यापलीकडे बहुतेक आमदारांच्या हाती काहीही शिल्लक नाही. आमदार बाळू धानोकर यांनी जरी कीर्तिकारांच्या उपस्थितीत पूर्व विदर्भाचे गार्हाणे साऱ्या मंत्र्यांच्या बाबतीत मांडलेले असले तरी त्यांनी केलेले आरोप या बाराही मंत्र्यांच्या बाबतीत तंतोतंत लागू पडतात असेच इतरही ठिकाणच्या आमदारांनी मनातल्या व्यथा व्यक्त करतांना मला सांगितले. असा एखादाच रत्नागिरीच्या त्या उदय सामंत यांच्यासारख्या आमदाराला जमते कि ते प्रसंगी रेड्याचेही दूध काढू शकतात, थेट एखाद्या हत्तीणीला देखील गाम्हण ठेवू शकतात, दिवाकर रावते यांना देखील खदाखदा हसवू शकतात एकाचवेळी एका हाताने सुभाष देसाईंना तर दुसर्या हाताने मिलिंद नार्वेकरांना गुदगुल्या करू शकतात फडणवीसांच्या मांडीवर बसून अजितदादांना वाकुल्या दाखवून हसवू शकतात एकीकडे सुनील तटकरेंना डोळा मारू शकतात तर दुसरीकडे कधीकाळी पत्रकार नाना जोशी यांच्याकडे टेम्पो चालविणाऱ्या आणि राजकारणात आल्यानंतर नवश्रीमंत झालेल्या भास्कर जाधवांना फ्लायिंग किस देऊन मोकळे होतात, थोडक्यात सांगायचे झाल्यास उदय सामंत किंवा प्रसाद लाड यांच्यासारखे फार कमी नेते असे असतात कि सत्ता कोणाची त्यांना फारसा फरक पडत नाही कारण ते मोठ्या खुबीने सत्तेत बसलेल्यांशी जुळवून घेतात, आपापली कामें पद्धतशीर करवून घेतात, सर्वांना हे असे जमत नसते म्हणून सत्तेपासून दूर असलेले सेनेतले बहुतेक आमदार या काळजीत पडलेले आहेत कि निवडणुका लढवायच्या तरी कशा…
इतरत्र नेमके आमदार बाळू धानोरकर कोण हे फारसे किंवा अजिबात माहित नाही केवळ ते वरोरा भद्रावती विधान सभा मतदार संघांचे प्रतिनिधित्व करतात हे असे फार तर काहींना माहित असेल पण इतरांसाठी म्हणून सांगतो कि बाळू आणि त्यांचे बंधू अनिल दोघेही या मतदारसंघाला राम लक्ष्मणाची जोडी असे सुपरिचित आहेत, अनिल तर थेट तिसऱ्यांदा नगराध्यक्ष म्हणून अलीकडे विराजमान झालेले आहेत तत्पूर्वीही अनिल उपनगराध्यक्ष होते जेव्हा नगराध्यक्ष पद हे महिलांसाठी राखीव होते अन्यथा तेव्हाही अनिल हेच नगराध्यक्ष झाले असते. थोडक्यात अनिल धानोरकर यांची शहरी भागावर चांगली पकड आहे आणि त्यांच्या सहकार्याला मदतीला थेट आमदार २४ तास उपलब्ध आहेत. विशेष म्हणजे बाळू आणि अनिल धानोरकर यांना समजायला लागले आणि त्यांनी जेव्हा समाजकार्य करायचे किंवा राजकारणात उतरायचे ठरविले तेव्हापासून तर आजतागायत म्हणजे वयाच्या २० व्या वर्षांपासून बाळू १९९५ पासून तर आजतागायत कट्टर शिवसैनिक आहेत त्यामुळे जेव्हा केव्हा बाळू यांच्या बाबतीत अफवा पसरविल्या जाते कि ते काँग्रेस मध्ये चालले आहेत, त्यांना या अशा अफवांचा प्रचंड मानसिक त्रास होतो, मनस्ताप होतो. ते हाडाचे शिवसैनिक आहेत पण सार्वजनिक कामें अकार्यक्षम मंत्र्यांमुळे होऊ न लागल्याने त्यांनी पक्षांतर्गत बंड पुकारले, कोणाचा तरी बळी द्यावा लागणारच होता, तो बाळूचा दिल्या गेला, त्यांनी त्यांच्या मंत्र्यांवर थेट आणि
जाहीर आरोप केल्याने सेनेंतर्गत वातावरण अस्वस्थ झालेले आहे पण एक चांगले त्यातून असे घडले आहे कि खुद्द उद्धव ठाकरे यांनी अगदी नक्की काही मंत्र्यांना डच्चू देण्याचे ठरविले आहे. बघूया कोण कोण पायउतार होतात आणि कोणा कोणाचा शपथविधी होतो…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी