इकडले तिकडले राजकारणातले ५ : पत्रकार हेमंत जोशी
हीच ती वेळ शरद पवारांना सहकार्य करण्याची आणि हीच ती संधी पवारांना पंतप्रधान होण्याची. ज्यांना पवारांनी मोठे केले जे १०० टक्के केवळ, फक्त आणि फक्त शरद पवारांमुळे मोठे झाले त्यांना यावेळी जरी असे वाटत असेल कि पवारांमुळे, दिल्लीत जाण्याने त्यांच्या राजकीय आयुष्याची पाच वर्षे वाया जाणार आहेत तरीही त्यांनी माघार घेता कामा नये, पवारांच्या म्हणाल तर आज्ञेवरून म्हणाल तर सांगण्यावरून येणारी लोकसभा लढवायलाच हवी मग ते रोह्याचे सुनील तटकरे असतील किंवा कोल्हापूरचे हसन मुश्रीफ किंवा साताऱ्याचे राम राजे निंबाळकर किंवा शशिकांत शिंदे, उद्या असे घडत कामा नये शिंदे किंवा राजे निंबाळकरांनी लोकसभा लढवायला साफ नकार दिला म्हणून उदयन राजे भोसले यांच्यासमोर नाईलाजाने पवारांनी एखादे श्रीनिवास पाटलांसारखे कच्चे लिंबू उभे केले. उदयन राजे भोसले यांच्यासमोर श्रीनिवास पाटील म्हणजे मानसी नाईक संगे डॉ. जगन्नाथ ढोणे यांनी डान्स करण्यासारखे…
तिकडे कोल्हापुरात हसन मुश्रीफ यांना त्या महाडिकांचे वाढलेले प्रस्थ महत्व आणखी वाढावे असे वाटत नसेल तर त्यांनी पवारांना होकार कळवावा आणि महाडिकांऐवजी लोकसभा लढवावी किंवा जितेंद्र आव्हाड यांनी थेट कल्याणमधून त्या एकनाथ शिंदे यांच्या खासदार झालेल्या चिरंजीवास आव्हान द्यावे, लोकसभा लढवावी, राज्य गाजवले, राष्ट्र देखील दिल्लीत जाऊन गाजवून दाखवावे. तिकडे त्या नव्या मुंबईत देखील तेच घडते आहे, नाही ना मी भाजपा मध्ये गेलो मग माझे आता तुम्ही ऐका, माझ्याऐवजी यावेळीही संजीव नाईक यांनाच लोकसभेची उमेदवारी द्या, असे जेव्हा वारंवार गणेश नाईक पवारांना सांगताहेत, तेव्हा तोंडावर बोट आणि हाताची घडी करून राजकारणात वावरणार्या संजीव नाईक यांचा युतीच्या प्रभावी उमेदवारांसमोर टिकाव लागणे शक्य नसल्याने शरदराव नक्की चिंतेत असतील, काळजीत पडतील…
पुण्यात भाजपा मध्ये आपापसात अतिप्रचंड लाथाळी माजल्याने शरद पवारांना वाटते हि जागा राष्ट्रवादीने लढवावी पण काँग्रेस तेथे, पुण्यात राष्ट्रवादीसाठी जागा अजिबात सोडायला तयार नाही, काँग्रेस ला खात्री आहे कि पुण्यातून काँग्रेस च्या मार्गावर असलेया संजय काकडे यांना उमेदवारी द्यावी, ते निवडणूक लढवतीलही आणि जिंकून देखील येतील. तेथे वास्तविक भाजपाचा प्रभाव आहे पण भाजपाची पुढल्या काही दिवसात ठाणे जिल्ह्यातल्या राष्ट्रवादीसारखी अवस्था होण्याची दाट शक्यता वाटते कारण राज्यसभा सदस्य संजय काकडे, खासदार अनिल शिरोळे आणि अन्न व नागरी पुरवठा मंत्री गिरीश बापट या तिघांचे तेथे आपापसात अजिबात जमत नाही, पटत नाही किंवा आमदार मेधा कुलकर्णी यांच्यासारख्या उत्सवी आणि उत्साही आमदारांना पाण्यात पाहतांना स्वतः गिरीश बापटांना मनातून आनंद होतो, भाजपाच्या या आपापसातल्या लाथाळ्या त्यांच्या पक्षश्रेष्ठींसाठीं चिंतेची बाब आहे….
तिकडे उस्मानाबाद मध्ये पवारांसाठी फारसे आशादायी चित्र नाही, डॉ. पदमसिंह पाटील नावाचा त्यांचा हुकमी एका, आधीचा वाघ अलीकडे वृद्ध झाल्याने म्हातारा झाल्याने, शरद पवारांची इच्छा आहे कि राणा जगजितसिंह यांनी म्हणजे डॉकटरांच्या चिरंजीवांनी, माजी राज्यमंत्र्यांनी लोकसभा लढवावी पण त्या बाप बेट्याला लोकसभेत रस नाही आणि दुसरा तुल्यबळ उमेदवार निदान उस्मानाबादेत तरी पवारांच्या राष्ट्रवादीकडे नाही किंवा चुकून माजी राज्यमंत्री श्रीमती फौजिया खान यांना जरी पवारांनी औरंगाबाद मधून खासदारकी लढविण्याचे संकेत किंवा आदेश दिले तरी फौजिया खान यांना हे माहित आहे कि त्यांचे अगदी जवळचे नातेवाईक देखील त्यांना मतदान करणार नाहीत, श्रीमती खान यांची तेथे नक्की अनामत रक्कम जप्त होईल….
थोडक्यात, ज्या २०-२२ दुसर्या फळीतल्या नेत्यांनी खासदारकी लढवावी असे शरद पवार यांना मनापासून वाटते त्यात मग दिलीप वळसे पाटील असोत कि जालन्याचे राजेश टोपे किंवा राज्यातले अन्य कोणीही, निवडून येण्याची कुवत क्षमता असलेल्या या नेत्यांना लोकसभेत जाऊन मौनी बाबा होण्याची अजिबात इच्छा नाही त्यापेक्षा येथेच पुन्हा आमदार व्हावे, राज्य आले तर मंत्री व्हावे आणि पुन्हा एकदा वाट्टेल तेवढे खात सुटावे, हे असेच या साऱ्यांना मनातून वाटत असल्याने, पवारांची पंचाईत झाली आहे, जागोजागी त्यांनी मोठे केलेले सरदार आता त्यांनाच डोकेदुखी होऊन बसले आहेत….
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी