उत्सवी आणि उत्साही २ : पत्रकार हेमंत जोशी
एक खेकडा समुद्र किनाऱ्यावर फिरतांना स्वतःच्या पायांमुळे होणारी नक्षी पहात होता. तेवढ्यात समुद्राच्या लाटेने ती नक्षी पुसली गेली. ते पाहून खेकडा लाटेला म्हणाला, मी तर तुला माझी जवळची मैत्रीण समजत होतो तरीही तू माझी छान नक्षी पुसून टाकलीस. त्यावर लाट म्हणाली, अरे या नक्षीच्या मागावरच मासेमार तुला शोधून पकडेल म्हणून मी नक्षी पुसली. मैत्रीचे नाते हे कल्पना शक्तीच्या बाहेरील नाते आहे. अशा नात्याला किंमत द्या व मैत्रीच्या नात्यावर विश्वास ठेवा…
मैत्रीच्या नात्यावर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी विश्वास ठेवला, मित्र म्हणून ते खाजगीत फडणवीसांना घट्ट बिलगले असतील पण नेते म्हणून चार चौघात महाजन यांनी मुख्यमंत्र्यांचा आदर केला, प्रसंगी अमुक एखाद्या कामाला मुख्यमंत्र्यांचा नकार त्याचा महाजनांनी स्वीकार केला किंवा नाशिकचे पालकमंत्री म्हणून पचविण्यास जड असलेले तुकाराम मुंडे यांना महापालिकेत आयुक्त म्हणून आधी आनंदाने स्वीकारले किंवा फडणवीसांचे आवडते प्रशासकीय अधिकारी म्हणून नाशिक मध्ये प्रसंगी पक्षातल्या नगरसेवकांची नाराजी पत्करून मुंडे यांना प्रोटेक्ट केले, जवळ देखील घेतले, त्यांना कधीही असे वाटले नाही कि देवेंद्र, कथेप्रमाणे आपली नक्षी पुसायला निघाले आहेत म्हणून या चार वर्षात महाजन म्हणाल तर जळगाव जिल्ह्याचे म्हणाल तर अख्य्या खान्देश परिसराचे नेते आणि लोकप्रिय मंत्री म्हणून पुढे आले त्यांच्या नेमके एकनाथ खडसे वागले, भर मंत्रिमंडळ साप्ताहिक बैठकीत कधी एकेरी तर कधी उद्धट भाषेत अख्ख्या मंत्रिमंडळासमोर मुख्यमंत्री या नात्याने फडणवीसांशी दादागिरीने वागले. समजा मंत्री या नात्याने खडसे सरळमार्गी आणि राज्याचे हीत साधणारे ठरले असते तर कदाचित फडणवीस यांनी खडसे यांची सारी बेतालबडबड खपवून घेतली असती, दुर्दैवाने तेही घडले नाही, त्यांना मंत्री म्हणून विनाकारण वाटत होते कि फडणवीस आपण काढलेली सुंदर नक्षी पुसताहेत पण ते तसे नव्हते, खडसे अडचणीत येऊ नये असे फडणवीसांना अगदी मनापासून वाटत होते, सतत अनादर करणारे खडसे वाट्टेल तसे वागले आणि त्यांनी स्वतःचे स्वतःच्या कुटुंबाचे आर्थिक राजकीय नुकसान करवून घेतले, आर्थिक लोभातून वरून दादागिरी करण्यातून खडसे मागे पडले…
मला यापुढे फारसे आश्चर्य वाटणार नाही जर येणाऱ्या लोकसभेला स्नुषा रक्षा खडसे यांना जर भाजपाने पुन्हा एकदा खासदार होण्याची संधी दिली नाही आणि हेही आश्चर्य वाटणार नाही जर जळगाव जिल्ह्यातले दोन्हीही खासदार गिरीश महाजन यांच्या पसंतीचे दिल्या गेले तरी. खेकडा आणि पाण्याची लाट हि कथाअशाप्रकारे महाजन आणि एकनाथ खडसे या दोघांनाही तंतोतंत लागू पडते. खडसे यांच्या काळातल्या त्यांनी मंजूर केलेल्या अनेक नसत्या त्या खात्याचे सचिव या नात्याने प्रसंगी अतिशय कठोर भूमिका घेणारे या राज्याचे अत्यंत अभ्यासू बुध्दीवान मेहनती प्रशासकीय अधिकारी मनुकुमार श्रीवास्तव यांनी महसूल मंत्री या नात्याने खडसे यांनी मंजूर करूनही अशा शेकडो फाईल्सची विल्हेवाट यासाठी लावली नाही कि या अशा फाईल्स मध्ये करोडो रुपयांचे काळे व्यवहार झालेले आहेत ज्याचे पुरावे मनुकुमार श्रीवास्तव आणि मुख्यमंत्री फडणवीसांकडे आहेत. ज्यांनी सदर नसत्या मंजूर करवून घेण्या करोडो रुपये मोजलेत त्यांचे पैसे मते पाण्यात गेले, माझया ओळखीच्या एका नुकत्याच धडपड करून पुढे येऊ पाहणाऱ्या बिल्डरचेही पैसे असेच पाण्यात गेलेले आहेत. मंत्रालयात सनेर आडनावाच्या दलाली करणाऱ्या व्यक्तीमुळे माझया त्या बिल्डर मित्राचे पैसे, करोडो रुपये निदान आज तरी पाण्यात गेले आहेत…
पुन्हा एकदा गिरीश महाजन चांगले म्हणून एकनाथ खडसे वाईट असे येथे अजिबात नाही. पण वाईट याचे वाटते कि जे गिरीश महाजन किंवा भाजपाचे या राज्यातले अन्य नेते एकनाथ खडसे यांच्यामध्ये महाजन आणि मुंडे यांच्या मृत्यूनंतर आणि गडकरी दिल्लीत गेल्यानंतर मुंडे महाजन गडकरी म्हणून पाहात होते ते खडसे म्हणाल तर बेधुंद म्हणाल तर बेताल वागण्यातून स्वतःला निदान आजतरी संपवून मोकळे झाले आहेत, त्यांच्यासमोर किंवा एकेकाळी जळगाव जिल्ह्यात सुरेशदादा जैन आणि एकनाथ खडसे यांच्यासमोर कच्चे लिंबू वाटणारे गिरीश महाजन त्या दोघांच्याही कितीतरी पुढे निघून गेले, खान्देशचे एसट्याब्लिश नेते म्हणून पुढे आले. आता महाजन बोले आणि जळगाव जिल्हा किंवा अख्खा खान्देश डोले, असे वातावरण आहे..,जळगाव जिल्ह्यातील जामनेर हा महाजनांचा विधान सभा मतदार संघ, तेथे त्यांचे कट्टर प्रतिस्पर्धी राजमल लखीचंद ग्रुप चे ईश्वरलाल जैन आणि त्यांचे सुपुत्र मनीष जैन, हेच ते मनीष जैन ज्यांनी एकनाथ खडसे यांच्या दिवंगत एकमेव मुलास म्हणजे निखिल खडसे यांना विधान परिषदत पराभूत केले होते. मंत्री या नात्याने त्या पराभवातून खडसे अधिक खवळले त्यात निखिल यांनी आत्महत्या केल्याने तर त्यांचे जणू काही जैन कुटुंबाबाबत डोके फिरले, त्यातून पुढे किंवा आजतागायत जैन कुटुंबियांना त्यांच्या व्यवसायात जे लागोपाठ फटके बसले, दीडशे वर्षे महान परंपरा असलेली राजमल लखीचंद हि राज्यात अनेक ठिकाणी उभी असलेली सोन्याची भव्य पेढी रस्त्यावर येते कि काय अशी परिस्थिती निर्माण झाली, त्यातून जैन कुटुंब विभक्त देखील झाले. आपला प्रतिस्पर्धी रस्त्यावर येतोय म्हणून गिरीश महाजन यांनी आगीत तेल ओतण्याचे काम न करता जैन कुटुंबाला सर्वोतपरी सहकार्य केले, आश्चर्य म्हणजे त्या ऋणांची म्हणाल तर परतफेड म्हणून ईश्वरलाल जैन मनीष जैन किंवा राजकीय दृष्ट्या अतिशय प्रभावी असलेल्या जैन कुटुंबाने यापुढे निदान किमान जामनेर मध्ये तरी महाजन विरोधी भूमिका न घेण्याची शपथ घेतल्याचे समजते आणि यालाच बेरजेचे राजकारण म्हणतात ज्यात एकनाथ खडसे दुर्दैवाने कमी पडले आणि बघता बघता गिरीश महाजन खूप पुढे निघून गेले. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत समजा रक्षा खडसे यांच्याऐवजी भाजपा पक्ष श्रेष्ठींनी जर गिरीशजींच्या पत्नीला उमेदवारी दिली आणि प्रचारात महाजन यांच्यासंगे जैन बापबेटे प्रचार करतांना दिसले तर त्यात फार आश्चर्य वाटून घेण्याचे कारण नाही. थोडक्यात एकनाथ खडसेंचा राजेश खन्ना झाला आणि गिरीश महाजन राज्यातले राजकारणातले खान्देशातले मंत्रिमंडळातले जळगाव जिल्ह्यातले अमिताभ बच्चन ठरले. हिरो नंबर वन ठरले…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी