पुरेपूर कोल्हापूर २ : पत्रकार हेमंत जोशी
श्रीमान धैयशील माने हे दिवंगत माजी खासदार बाळासाहेब माने यांचे नातू आहेत, माजी खासदार निवेदिता माने यांचे सुपुत्र आहेत ते म्हणायला गेले तर एकेकाळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष नावापुरते होते पण त्यावेळी त्यांनी जवळपास अध्यक्ष म्हणूनच काम केले, त्यामुळे धैर्यशील यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून कोल्हापूर जिल्ह्यात तळागळात जाऊन काम केलेले आहे, नंतर त्यांच्या पत्नी याच जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत पराभूत झाल्या तो भाग वेगळा, अर्थात माने घराण्याला पराभव नवीन नाही, निवेदिता माने दोनदा खासदार झाल्या पण त्याआधी त्या एकवेळा अपक्ष म्हणून आणि एकदा थेट शिवसेनेच्या तिकिटावर खासदारकीला पराभूत झाल्या होत्या….
धैर्यशील माने अत्यंत रुबाबदार देखणे उत्तम छाप पाडणारे व्यक्तिमत्व आहे, मला जर तुम्ही धैर्यशील यांच्यासारखे मोहक सुंदर डौलदार स्मार्ट आकर्षक ऱ्हित्तिक रणवीर सलमान समजत असाल तर माझ्या रांगेत तुम्ही मग उद्धव यांचे डावे हात ( उजवे हात मिलिंद नार्वेकर आहेत ) हर्षल प्रधान, जंगली कबुत्तर सारख्या जुन्या सेक्सी नाटकात भूमिका करणारे पत्रकार गुरुदत्त लाड पत्रकार मंदार पारकर पत्रकार किरण तारे राज्यमंत्री कांबळे मंत्री विष्णू सावरा इत्यादींनाही माझ्या रांगेत नक्की आणून बसवावे. आपल्या राज्यात जे निष्णात बोटावर मोजण्याएवढे सर्वोत्तम उत्कृष्ट प्रभावी शब्दप्रभू अभ्यासू खणखणीत वक्ते आहेत किंवा होते त्या देवेंद्र फडणवीस दिवंगत श्रीकांत जिचकार दिवंगत मधुकरराव चौधरी दिवंगत प्रमोद महाजन दिवंगत बाळासाहेब ठाकरे राज ठाकरे यांच्या पंक्तीला आदराने बसण्याचा मान शंभर टक्के श्रीमान धैर्यशील माने यांना आहे त्यांचे भाषण तिकीट लावून ठेवले तरीही श्रोते आचार्य अत्रे पद्धतीने माने यांचे भाषण ऐकायला येतील, थोडक्यात सभा जिंकण्याचे कसब धैर्यशील माने यांच्याकडे आहे. तुम्हाला माहित आहे का या राज्यातले एक प्रभावी दानशूर पराक्रमी लोकमान्य लोकप्रिय नेते दिवंगत आनंद दिघे यांना भाषण करण्याचे एवढे वावडे होते किंवा त्यांच्या मनात भाषणाची एवढी धास्ती होती कि त्यांना एक जबरदस्त शिवसेना नेते म्हणून त्याकाळी अवघ्या ठाणे जिल्ह्यात दिवसाला किमान दहा वेळा तरी स्टेजवर बसावे लागत असे पण त्यांनी उभ्या आयुष्यात एकदाही कधीही भाषण केले नाही किंवा अजित पवार यांना मुतणे या शब्दाची अलीकडे एवढी भीती वाटते कि ते भाषणाला सुरुवात करण्यापूर्वी म्हणे किमान दोनवेळा तरी सु सु करून येतात…
इचलकरंजीच्या माजी खासदार निवेदिता माने यांनी, मी देखील शिवसेनेत दाखल झाले आहे असे धैर्यशील यांच्याप्रमाणे जाहीर केले नसले तरी त्याही मनाने आणि शरीराने यापुढे शिवसेनेतच पुन्हा एकदा आल्या आहेत हे नक्की, आणि माने माय लेकाला पुन्हा एकदा शिवसेनेत आणण्याचे श्रेय दिवंगत बाबासाहेब कुपेकर यांचे पुतणे आणि कोल्हापूरातले शिवसेना नेते संग्रामसिंग कुपेकर यांना जाते. ऐन लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर माने कुटुंब शिवसेनेत गेले कारण उघड आहे, जवळपास २००९ नंतर शरद पवार किंवा कोल्हापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे प्रभावी नेते हसन मुश्रीफ यांनी त्यांना जवळपास अडगळीत टाकलेले होते, राष्ट्रवादीच्या देशाच्या महिला अध्यक्ष म्हणून त्यांची कामगिरी अगदीच सुमार ठरली त्यातून त्या पवारांच्या मनातून उतरल्या असाव्या असे दिसते किंवा त्याचवेळी माने यांचे पक्षातले तगडे विरोधक हसन मुश्रीफ कोल्हापूरच्या राजकीय वर्तुळात अधिक प्रभावी ठरल्याने देखील पवार मुश्रीफांना मांडीवर घेऊन प्रेमाने गाल धरून बसले असावेत. अर्थात हसन मुश्रीफ हेही या राज्याचे एकेकाळी मंत्री होते सांगणे येथे आवश्यक आहे कारण एक मंत्री म्हणून त्यांची कामगिरी बऱ्यापैकी सुमार होती. ते मंत्री होते हे देखील जनतेला स्मरत नसेल जसे फडणवीस मंत्रिमंडळात दादा भुसे राज्यमंत्री आहेत हे तरी कुठे लोकांना माहित आहे ?
यानिमीत्ते आणखी एक सांगतो, अत्यंत महत्वाचे मोठ्या जबाबदारीने मनातून सांगतो, दीपक सावंत यांचा मंत्रिपदाचा कार्यकाळ संपल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी उरलेल्या काळात कोल्हापूरच्या डॉ. सुजित मिणचेकर यांना नक्की संधी द्यावी, येथे मी सांगू इच्छितो कि ते फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातले निश्चित एक प्रभावी मंत्री म्हणून ते काम करून मोकळे होतील, गडी लै उत्साही आहे विशेष म्हणजे त्यांची सफारी शिवून तयार आहे. आणि हो, निवेदिताताई तुमच्या या पराक्रमी लेकाला त्याचे कान धरून सांगा कि शरीरात आकंठ घुसलेला तेवढा तो आळस झटकून टाकून उत्साहात कामाला लाग हेच शरद पवार एक दिवस मुश्रीफांना ढकलून तुला आधी कडेवर घेतील नंतर खांद्यावर घेऊन अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात तुला मिरवून आणतील, तुझी हत्तीवरून मिरवणूक काढतील. खानदानी मराठ्यांनी झालेल्या अपमानाचा बदला नक्की घ्यायचा असतो, बेटा तुला खासदारकीला राजू शेट्टी यांना नक्की पराभूत करायचे आहे, मानेताईंनी आळस झटकून कामाला लाग, वेळ कमी आहे, हे लेकाला ठणकावून सांगायलाच पाहिजे….
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी