पुरेपूर कोल्हापूर ३ : पत्रकार हेमंत जोशी
अख्ख्या कोल्हापूर जिल्ह्यात मराठ्यांचे मराठा नेत्यांचे वर्चस्व महत्व आहे हे तुम्हाला सांगणे पत्रकार युवराज मोहिते गाणेही गातात हे त्यांच्या पत्नीला सांगण्यासारखे, अहो, ती म्हणेल, हे मला कशाला सांगता, माझ्यासाठी आधी जांभया नंतर गाढ झोप, यावर त्यांचे गाणे उत्तम औषध आहे. शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी नक्की चुकलेले आहेत त्यांच्याकडे असलेल्या उल्हासदादा शिरोळे यांच्यासारखे नेते त्यांनी घालविलेले आहेत, कारण शेट्टी यांना त्यांच्या पक्षात, संघटनेत मराठे मोठे झालेले आवडत नाही चालत नाही अशी कुजबुज आहे. त्यामुळेच उल्हास शिरोळे पुढे शेट्टींच्या नाकावर टिच्चून शिवसेनेतर्फे आमदार म्हणून निवडून आले आहेत, विरोधकांनी उत्तम नियोजन करावे, तिकडे नेहमीप्रमाणे शरद पवारांनी वरकरणी राजू शेट्टी यांना अंगाखांद्यावर खेळवावे, कुरळावे म्हणजे राजू शेट्टी यांना धैर्यशील माने लोकसभेला सहज पराभूत करू शकतील. राजू शेट्टी यांचे शेतकऱ्यांचे क्रमांक एकचे नेते म्हणून खच्चीकरण करायचे असेल तर ती सुरुवात कोल्हापूर जिल्ह्यापासून झाली पाहिजे हे पवार आणि चंद्रकांत पाटलांच्या केव्हाच लक्षात आल्याने, तशी व्यूहरचना आखणे सुरु झालेले आहे…
इचलकरंजीतल्या माने घराण्याची परंपरा धैर्यशील यांनी पुढे चालवावी, तिसरी पिढी देखील लोकसभेत जावी. अर्थात आवाडे आणि माने घराण्याला राजकारणात धोबीपछाड मारणार्या शेट्टींना लोकसभेपासून रोखणे दिसते वाटते तेवढे नक्की सोपे नाही. शेट्टी यांना केव्हा सामान्य शेतकऱ्यांच्याची बाजू घ्यायची आणि केव्हा साखर कारखानदारांना आधी कुशीत घेऊन नंतर खिशात घालायचे हे चांगले ठाऊक आहे, सध्या त्यांची चंचल वृत्ती कारखानदारांच्या आणि एकेकाळी कट्टर विरोधक असलेल्या काँग्रेस राष्ट्रवादीच्या बाजूने झुकलेली आहे असे दिसते आहे….
कोल्हापूरातलं शिवसेनेचे आमदार राजेश क्षीरसागर आक्रमक आहेत धाडसी आहेत, मेहनती आहेत, त्यांनी आंदोलन सुरु केले आणि कोल्हापूरचा टोल पुढे रद्द झाला. पण कधीकधी क्षीरसागरांचे वागणे आणि कृती चमत्कारिक असते म्हणजे वर्षभरापूर्वी थेट पत्रकारपरिषद घेऊन मंत्री चंद्रकांत पाटलांची चड्डी सोडणारे राजेश क्षीरसागर लगेच काही दिवसात थेट चंद्रकांत पाटलांच्या कार्यालयात, पाटलांच्या कार्यालयातले ‘ राज्यमंत्री’ श्रीनिवास जाधव यांच्या केबिन मध्ये गोंडा घोळतांना आम्ही पहिले आहेत, हि त्यांची राजकीय ऍडजेस्टमेंट योग्य नाही, म्हणजे आधी अंगावर घ्यायचे शिंगावर घ्यायचे नंतर त्याच नेत्याला डोळा मारून मोकळे व्हायचे. सध्या त्यांनी त्यांच्याच पक्षातले जिल्हा संपर्कप्रमुख प्रा. संजय मंडलिक यांना थेट अंगावर घेतलेले आहे. मंडलिक हे एकाचवेळी शरद पवारांना पप्पी देतात आणि त्याचवेळी चंद्रकांत पाटलांना फ्लायिंग किस देऊन मोकळे होतात असा उघड आणि थेट आरोप मांडलिकांवर त्यांच्याच पक्षाच्या म्हणजे थेट शिवसेनेच्याच आमदार राजेश क्षीरसागर यांनी केल्याने शिवसेना आणि कोल्हापूर जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे पण निवडून आल्यानंतर किंवा निवडणूक मग त्या कोणत्याही असोत पार पाडल्यानंतर ‘ वाट्याच्या लोभातून ‘ सारे नेते ‘ मिलीजुली सरकार ‘ चालवीत असतात आणि मुंबईतला, राजधानीतला हाच ट्रेंड अख्ख्या राज्यात अलीकडे रुळला असल्याने क्षीरसागर यांना तसे वाटत असावे, संजय मंडलिक यांचे सर्वच पक्षात मित्र असल्याने क्षीरसागर अस्वस्थ झाले असावे असे मला नाव न लिहिण्याच्या अटीवर एका आमदाराने सांगितले…
जे भाजपाला हवे आहे ते अलीकडे मैत्री झालेल्या केलेल्या चंद्रकांत पाटलांच्या राजकीय फायद्यासाठी राजेश क्षीरसागर यांनी करू नये म्हणजे तीन तीन आमदार निवडून आलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातल्या शिवसेनेला तसेही हुशार चंद्रकांत पाटलांना म्हणजे भाजपाला खाली खेचायचे आहे त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शिवसेनेतला अंतर्गत कलह नेमका भाजपाच्या पथ्यावर पडणारा आहे. राजेश यांचे चार भिंतीच्या आड असे काहीही नसते म्हणजे ते उठले आणि त्यांनी थेट चौकात जाऊन सांगितले कि प्रा. संजय मंडलिक आता सेनेच्या नव्हे तर भाजपा किंवा राष्ट्रवादीच्या भल्यासाठी काम करताहेत, चंद्रकांत पाटलांना नेमके तेच हवे होते, त्यांना सेना अंतर्गत कलह निर्माण करून सेना खच्ची करायची होती, त्याची सुरुवात राजेश क्षीरसागर यांच्या वागण्या बोलण्यातून झालेली आहे, मंडलिक असोत कि क्षीरसागर, सेना नेत्यांनी, आमदारांनी वेळीच खेळी ओळखून एकमेकांना घट्ट बिलगून आणि पकडून पुढे जायला हवे अन्यथा सेनेला तेही कोल्हापुरात मिळालेले मोठे व अनपेक्षित यश फाटाफुटीतून अपयशाकडे मार्गस्थ होईल…
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी