कविता तावडेंच्या बायकोच्या : पत्रकार हेमंत जोशी
विनोदजींच्या बायकोची पुढली कविता मला तरी वाटते, विनोदजींनाच उद्देशून असावी, त्यांनाच समर्पित केली असती तर काव्यसंग्रहाची निदान चर्चा तरी नक्की झाली असती…कविता,
सहजीवन म्हणजे…
सहजीवन म्हणजे
नाही नुसतं एका घरात राहणं
सहजीवन म्हणजे
नाही फक्त एका छताखाली निजण
सहजीवन म्हणजे
दोघांचं मिळून आउटिंग
सहजीवन म्हणजे
दोघांचं एकत्र हाऊसकीपींग
सहजीवन म्हणजे…
बँकेत जॉईंट अकाउंट असणं
सहजीवन म्हणजे
एकत्र इमेल अकाउंट जपणं
सहजीवन म्हणजे
एकमेकांना पासवर्ड शेअर करणं
सहजीवन म्हणजे
मोबाईल, लॅपटॉप
बिनधास्त खुला ठेवून जगणं
सहजीवन म्हणजे
विश्वास ठेवणं
आणि
सहजीवन म्हणजे
विश्वासाला पात्र ठरणं
नाशिकला फार वर्षांपूर्वी मी एक बंगला बांधला होता, बांधकामाची देखरेख मिलिटरीतून निवृत्त झालेल्या कुलकर्णी आडनावाच्या गृहस्थाकडे होती, त्यातून त्यांच्या पत्नीचीही चांगली ओळख झाली, त्या म्हणाल्या, येथे आलात कि हॉटेलात न उतरता आमच्याचकडे उतरत चला, मी त्यांचे ऐकले, त्यांच्याकडे उतरलो कि रात्री जेवणापूर्वी त्या त्यांनी केलेल्या रचलेल्या कविता एक पत्रकार म्हणून आधी मला ऐकवायच्या नंतर जेऊ घालायच्या, मला वाटते, भीक नको पण कुत्रा आवर, हि म्हण या अशाच प्रसंगातून जन्माला आली असावी. वर्षा विनोद तावडे यांचा अलीकडे ‘ मनाला दार असतंच ‘ हा काव्य संग्रह प्रकाशित झाला, माझ्या हाती आला, कविता वाचून काढल्यानंतर का कोण जाणे खूप वर्षांनी पुन्हा एकदा मिसेस कुलकर्णींची आठवण झाली. विशेष म्हणजे विनोद तावडे मंत्री झाले आणि वर्षा यांनी कविता करायला सुरुवात केली…
मनातल्या भावनांचं व्यक्त होणं म्हणजे काव्य, वर्षा यांचा हा पहिला प्रयत्न नक्की बाळबोध आहे म्हणजे लहानपणी माझ्या शेजारी प्रमोद जोशी नामेंएक मित्र राहत असे, तो तारुण्यात आला आणि एकदम कविता करायला लागला, कुलकर्णी बाई, प्रमोद जोशी आणि आता वर्षा तावडे, झोप येण्या सापडलेले जालीम औषध, माझा साक्षात्कार, असे म्हणता येईल. शिक्षण मंत्र्यांची पत्नी या नात्याने काव्य करण्यापूर्वी वास्तविक नामवंत कवींशी चर्चा करून त्यांचे काव्य अधिक प्रगल्भ ठरू शकले असते. नाही म्हणायला, थेट संदीप खरे यांनी चार वाक्ये लिहून वर्षा यांच्या या काव्यसंग्रहाची समाप्ती केली आहे, अर्थात शिक्षण मंत्राच्या पत्नीने मनात आणले असते तर थेट स्वर्गातून ग्रेस खाली आले असते आणि काव्यसंग्रहाचे कौतुक केले असते….
पण…कविता यथातथाच असल्यात तरी त्यातला भावार्थ नेमका त्यांच्या आणि विनोदजींच्या चंचल आयुष्याभोवती फिरतो, वाचणाऱ्याच्या ते अगदी सहज लक्षात येते, वर दिलेली कविता, हि अशीच त्या दोघांच्या आयुष्याभोवती फिरलेली आहे, का कोण जाणे, मला वारंवार वाटते आहे. इतरही कविता या अशाच आहे. नाही म्हणायला राजकीय महत्वाकांक्षी वर्षा, मंत्री विनोद तावडे यांच्याशी विवाहबद्ध झाल्यानंतर बाळासाहेब आपटे यांच्या पत्नी निर्मलाताई यांनी संघ भाजपा माध्यमातून स्थापन केलेल्या ‘ भारतीय नारी शक्ती ‘ या संघटनेला हातभार लावत आल्या आहेत पण एवढी लहान त्यांची ताकद नाही त्या देखील ज्योती पराग आळवणी यांच्याप्रमाणे विनोद तावडेंच्या राजकीय पंक्तीला बसू शकल्या असत्या पण ते घडले नाही पुढे विनोदजी मंत्री झाले त्यातून कदाचित आलेले एकटेपण आणि मनात साचलेल्या किंवा मनातल्या एकलकोंड्या विचारांना त्यांनी जमली तशी वाट मोकळी करून दिली असावी…
आणखी एक कविता….आयुष्याच्या उतरंडीला
आयुष्याच्या उतरंडीला
एकटं एकटं बरं वाटतं
एकमेकांच्या अपेक्षांचं
ओझं मनावर नको वाटतं !
तू तिथं मी पेक्षा
माझं माझं राहावंसं
बागबान सिनेमापुरतं ठिकाय
घरात त्याचं दडपण भासतं !
तरुणपणीचं प्रेम
तुमचं आमचं सेम असतं
वयानुरूप म्हातारपणी
‘ त्यांचं ‘ थोडं वेगळं असतं !!
मला खात्री आहे, वर्षा विनोद तावडे यांनी लोकांच्या नव्हे तर स्वतःच्या आयुष्यातल्या आणि मनातल्या भावना न राहवून कविता करून काव्यसंग्रहातून व्यक्त केलेल्या आहेत. भलेहि कवितांचा दर्जा नव्याने सायकल शिकलेल्या लहान मुलासारख्या असतील पण सांगता येत नाही, हळू हळू वर्षा तावडे देखील मान्यवरांच्या पंक्तीला जाऊन बसू शकतील, प्रॅक्टिस मेक मॅन परफेक्ट, वन मोअर वन मोअर असे फक्त त्यांना कोणीतरी सांगत राहायला हवे, त्यांच्यातही एक दिवस तुम्हाला बहिणाबाई दिसतील…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी