आंदोलनास गालबोट : पत्रकार हेमंत जोशी
भिन्न शाखेचे ब्राम्हण कधीही एकत्र येत नाहीत विशेषतः परप्रांतीय ब्राम्हण मराठी ब्राम्हणांना आपले मानायला तयार नसतात आणि मराठी ब्राम्हण,परप्रांतात देखील ब्राम्हण असतात हे देखील मान्य करायला तयार नसतात. पण अलीकडे हि किमया साधल्या गेली, महाराष्ट्रात राहणारे भारतातले विविध भाषिक विशेषतः महाराष्ट्रातल्या विविध शाखांचे ब्राम्हण एकत्र आले, आमच्यातल्या विश्व्जीत देशपांडे, अंकित काणे इत्यादी नेत्यांनी त्यांना अपार कष्ट, प्रचंड धावपळ, राज्यभर दौरे काढून एकत्र आणले, निमित्त होते २२ जानेवारीला आझाद मैदानावर धरणे व आंदोलन…
वास्तविक मुंबई शहरातून भव्य मोठा मोर्चा देखील काढता आला असता पण इतरांना त्रास देऊन स्वतःची टिमकी ब्राम्हणांना वाजवून दाखवायची नव्हती कारण आमच्यातल्या कोणालाही या मोर्च्याच्या नावाखाली पुढे नेता किंवा मंत्री होण्याचे म्हणजे सामान्य ब्राम्हणांच्या खांद्यावर बंदूक ठेवून स्वतःचा कोणताही राजकीय फायदा करवून घ्यायचा नव्हता. मुंबईत २२ जानेवारीला जवळपास ३५० बसेस राज्यभरातून भरून आल्या पण एवढ्या मोठ्या प्रमाणावर आलेल्या बसेसची दखल मुंबईकरांना अजिबात घ्यायची गरज नव्हती कारण मोठ्या प्रमाणावर दाखल झालेले ब्राम्हण शिस्तीत मुंबईत आले आणि निघूनही गेले. ठरल्याप्रमाणे आणि ठरविल्याप्रमाणे फक्त १० प्रतिनिधी मुख्यमंत्र्यांना भेटायला दुपारी मंत्रालयात आले, आम्ही येतो, आम्ही येतो असा कोणताही आग्रह इतरांनी धरला नाही ज्यांची नावे पुढे आली तेवढे दहा प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून गेले…
जसे पूर्वी जो उठायचा तो सरदार पंजाब्यांवर विनोद करून चुटके लिहून जोक्स सांगून लिहून मोकळे व्हायचा ते कायद्याने मग बंद पाडण्यात आले. अलीकडे सरदार प्रकरण संपले आणि राज्यातल्या मराठींना पुणेकर दिसायला लागले, आता माझ्यासहित जो उठतो तो अस्सल पुणेकरांवर वाट्टेल तेवढे प्रसंगी जिव्हारी जोक्स चुटके सांगून मोकळा होतो. ज्यादिवशी सरदारजींसारखी एखाद्या ब्राम्हण पुणेकरांची सटकेल तेव्हाच त्यांच्यावर वाट्टेल ते जोक्स विनोद करणे थांबेल. तेच ब्राम्हणांच्याही बाबतीत,जो उठतो तो ब्राम्हणांना घालून पडून बोलून त्रास देऊन अपमानित करून मोकळा होतो, अनेकांना त्यात विकृत आनंद देखील मिळतो असे मला वाटते. जे मीही अनुभवले आहे…
त्यामुळे सारे ब्राम्हण एकत्र येऊन त्यांनी आपली अल्प का होईना शक्ती दाखविली,महत्वाचे म्हणजे, आपण बरे कि आपले काम बरे, पद्धतीने इतरवेळी सतत वागणारे ब्राम्हण थेट राज्यभरातून, विदर्भ मराठवाड्यासारख्या दुर्गम भागातून एकत्र येऊन त्यांनी आंदोलन केले हेही नसे थोडके. ज्याची अत्यंत नितांत गरज होती ते पहिल्यांदा ब्राम्हणांच्या हातून घडले, खूप छान झाले. पण या सार्या धरणे आणि आंदोलनाला तेही ब्राम्हणांच्या, एक गालबोट लागले त्याचे मात्र समस्त ब्राम्हणांना अतिशय वाईट वाटले. घडले असे कि आमच्या समाजाच्या ज्ञातीच्या नेत्यांनी काबाडकष्ट करून सारे ब्राम्हण २२ जानेवारीला मुंबईच्या आझाद मैदानावर एकत्र केले. सारे ब्राम्हण मोठ्या प्रमाणावर एकत्र आल्याने ब्राम्हणेतर अनेक नेत्यांनी मनाचा मोठेपणा दाखविला आणि कित्येकांनी, विविध ज्ञातीच्या विविध पक्षाच्या विविध विचारांच्या नेत्यांनी मंत्र्यांनी आझाद मैदानाला भेटी दिल्या, भाषणे केली, अगदी ज्यांची हयात ब्राम्हणांना त्रास देण्यात खजील करण्यात चाललेली आहे असेही नेते तेथे आले, मोठ्या मनाच्या ब्राम्हणांनी त्यांचेही स्वागत केले, त्यांची भाषणे देखील ऐकून घेतली….
अलीकडे मराठा ज्ञातीवर फारसे प्रभुत्व नसलेले, मराठ्यांनी देखील बऱ्यापैकी दूर केलेले विनायक मेटे देखील तेथे आले, त्यांनी भाषण केले. अर्थात अगदी उघड म्हणजे न लपविता होय, मी मराठ्यांचा नेता असे कायम जाहीर सांगणार्या विनायक मेटे यांना खरेतर थेट मराठ्यांनीच टाळणे किंवा दुर्लक्षित करणे अजिबात योग्य नाही कारण मेटे यांनी आजवर मराठ्यांसाठी आपल्या आयुष्याचे दिलेले योगदान मी बऱ्यापैकी जवळून बघितले आहे किंवा त्या पुढे जाऊन मी म्हणेन कि अनेकदा विनायक मेटे यांनी मी केवळ मराठ्यांचा नेता सांगून स्वतःचे मोठे राजकीय नुकसान देखील नक्की करवून घेतले आहे पण त्यांना त्याची अजिबात खंत नाही नसावी, त्यांनी ते ठरविलेले आहे कि मराठ्यांसाठी वाट्टेल ते…
www.vikrantjoshi.com
२२ तारखेला दुपारी दोन वाजता मा. मुख्यमंत्र्यांनी ठरविलेल्या वेळेत जेव्हा ब्राम्हणांचे प्रतिनिधी मंत्रालयात मुख्यमंत्र्यांना भेटायला आले तेव्हा मात्र अजिबात गरज नसतांना मधेच केव्हातरी विनायक मेटे मध्ये घुसले आणि जणू मी ब्राम्हणांच्या आजच्या धरणे आंदोलनाचे प्रतिनिधित्व केले आहे या थाटात मुख्यमंत्र्यांच्या शेजारी बसून आम्हा ब्राम्हणांच्या शिष्टमंडळाचे विनाकारण नेतृत्व केले, आम्हाला खूप वाईट वाटले. ज्या विश्व्जीत देशपांडे यांच्यासारख्या आमच्या ज्ञातीय नेत्यांनी गेले अनेक महिने पायपीट करून आंदोलन अत्यंत यशस्वी करवून दाखविले त्याचे ऐनवेळी क्रेडिट विनायक मेटे यांनी हे असे विनाकारण घेतले, मुख्यमंत्र्यांसहित सर्वांना, मी तेथे हजार असल्याने मला व्यक्तिश: खूप खूप अतिशय वाईट वाटले, आश्चर्य वाटले…
माझ्यावर केवळ ब्राम्हणांचे प्रतिनिधी आणि मुख्यमंत्री यांची गडबड गोंधळ न होता भेट घालून देण्याची जबाबदारी होती, ज्याची अतिशय गुप्तता पाळायची होती. एवढेच काय मी त्या चर्चेदरम्यान मुख्यमंत्री कार्यालयात उपस्थित राहून देखील बाहेर उभा होतो, अगदी चर्चा संपतांना फक्त आत आलो आणि मुद्दाम शेवटी कुठेतरी कोपऱ्यात बसलो कारण एकतर मला नेता व्हायचे नाही आणि ज्यांनी हे धरणे आंदोलन यशस्वी करवून दाखविले त्या प्रतिनिधींना पुढे करायचे होते. त्यांचे चेहरे समाजासमोर येणे आणणे मला त्यावेळी आवश्यक वाटले म्हणून सहज शक्य असतांना देखील मी मेटे यांच्यासारखा धूर्त वागलो नाही, मेटे यांनी ज्या पद्धतीने खुबीने युक्तीने थेट मुख्यमंत्र्यांशेजारी बसून, जणू मीच ब्राम्हणांचा कैवारी, शेजारी हे दाखविण्याच्या केविलवाणा प्रयत्न केला, आम्ही सारे खूप दुःखी झालो, आमच्या नेत्यांच्या प्रयत्नांवर विनाकारण पाणी फिरले. मेटे यांनी असे वागायला नको होते, आमच्या ते अतिशय जिव्हारी लागले…
ब्राम्हणांच्या धरणे आंदोलनाची तयारी आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेला उत्तम प्रतिसाद यावर पुढल्या काही दिवसात आमचे पुण्यातले मित्र, धाडसी विश्व्जीत देशपांडे त्यावर व्यापक नक्की लिहून ते मोकळे होतील आणि मी त्याला याठिकाणी प्रसिद्धी पण देईलच मात्र २२ तारखेला मेटे यांनी ऐनवेळी आमचे प्रतिनिधित्व करणे म्हणजे थ्री इडियट सिनेमात करीना कपूरच्या बहिणीच्या लग्नात जसे आमंत्रण नसतांना देखील त्या सिनेमातले थ्री इडियट घुसून मोकळे होतात, गोंधळ घालून मोकळे होतात, पुढे अपमानित देखील होतात, तो प्रसंग येथे या निमित्ते मला जसाच्या तसा आठवला, वाईट वाटले, आज पहिल्यांदाच अगदी मनापासून मेटे यांचा राग देखील आला….
तूर्त एवढेच.
पत्रकार हेमंत जोशी