फडणवीसांनी बुडविला महाराष्ट्र माझा ३ : पत्रकार हेमंत जोशी
वारंवार सांगत आलेलो आहे कि मी कट्टर हिंदुत्ववादी आहे पण माझे कोणत्याही राजकीय पार्टीवर प्रेम नाही मला ते करायचेही नाही कारण मी अतिशय इमोशनल आहे आणि कोणत्याही अति भावनाप्रधान व्यक्तीचा जर प्रेमभंग झाला तर त्या व्यक्तीला अतिशय मानसिक त्रास होतो म्हणून माझे राजकारणातल्या एखाद्या नेत्यावर प्रेम असू शकते, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार उदय सामंत, विश्वास पाठक, नामदार देवेंद्र फडणवीस, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या राज्यातल्या अशा काही मोजक्या नेत्यांवर माझे व्यक्तिगत प्रेम असू शकते किंवा असेलही पण तेथे मैत्रीचे नाते अधिक असते, असे मित्र चुकलेत तर त्यांना देखील मी शब्दांतून सोडत नसतो….
वरील लिखाण येथे यासाठी कि मी समाज माध्यमांवर किंवा माझ्या पाक्षिकातून विविध विनोदी चुटके टाकतो जे कोणीतरी मला पाठविलेले असतात, बहुतेक चुटके काँग्रेस ला टोमणे मारणारे आणि भाजपाच्या गोटातून पाठविलेले असल्याने तसे वाचकांना वाटणे स्वाभाविक आहे कि माझे भाजपावर प्रेम आहे असे असते तर मी नितीन गडकरी यांचे एक पत्रकार म्हणून आयुष्यभराचे नुकसान करवून ठेवले नसते, त्यांचे कोणते नुकसान मी केले आणि त्याचा प्रचंड आर्थिक फायदा पुढे कोणत्या दलालाला झाला ते सारे कधीतरी नक्की मांडणार आहे, आज त्यावर चर्चा नको कारण एक मराठी माणूस पंतप्रधान पदाच्या शर्यतीत असतांना त्याला कोणतीही खोलवर जखम करणे तेवढा मी नीच हलकट नाही…
आता अत्यंत महत्वाचे, या पंचवार्षिक योजनेत जळीस्थळी विविध प्रसार माध्यमां चा वापर करून भाजपा नेत्यांनी काँग्रेसला आणि त्यांच्या नेत्यांना योजनाबद्ध बदनाम केले आणि मोदी महान कसे हेही ते लोकांच्या मनावर बिंबवत राहिले पण अलीकडं वर्षभरापासून राहुल गांधी, गांधी घराणे, आणि काँग्रेसवर समाज किंवा प्रसार माध्यमातून केली जाणारी टीका आता कोणालाही आवडत नाही आणि मोदी यांची त्याचवेळी वारेमाप स्तुती करणे, हे देखील कोणालाही आवडत नाही अगदी समोरचा वाचक कोणत्याही राजकीय विचारसरणीचा असला तरी, याचा वाईट परिणाम असा झाला आहे कि लोकांनी भाजपाची हि तीच तीच ती प्रचार पद्धती हाणून पाडलेली आहे याउलट त्यांना काँग्रेस कडून पसरवलेली बातमी वाचण्यात अधिक आनंद मिळत असतो, मिळतो आहे. काँग्रेस किंवा गांधी घराण्याची अलीकडे झपाट्याने वाढत जाणार्या लोकप्रियतेचे प्रमुख कारण म्हणजे भाजपावाले उठसुठ अतिशय हलक्या दर्जाची विविध चुटक्यातून बातम्यातून खिल्ली उडवतात, हे अस्त्र नक्की कायम टिकणारे नाही आणि नव्हते. भाजपाने विशेषतः यावेळी स्वतःचे मोठे नुकसान करवून घेतलेले आहे…
सत्ता पदरात पडल्यानंतर विशेषतः देवेंद्र फडणवीस किंवा नितीन गडकरी यांनी जे केले त्याचे अनुकरण त्यांच्या साऱ्याच नेत्यांनी करायला हवे होते, म्हणजे गडकरी जे नेहमी सांगतात तेच गडकरी आणि फडणवीसांनी केले त्यांनी विरोधकांपेक्षा स्वतःची रेषा विकास कामे करून मोठी केली त्यांनी त्याचवेळी राजकीय स्पर्धकांची किंवा अन्य कोणत्याही नेत्यांची अगदी उद्धव ठाकरे यांची देखील रेषा न पुसता आपली रेषा मोठी करण्याचा सतत प्रयत्न केला ज्याचा त्या दोघांना नेते म्हणून फायदा झाला, भाजपाची इमेज खालीवर होत असतांना या दोघांच्याही लोकप्रियतेचा ग्राफ कधीही खाली आला नाही त्यामुळेच सभागृहातही सोनिया गांधी यांच्यासारखे कट्टर विरोधक देखील या नेत्यांचे त्यांच्या कामांचे टाळ्या वाजवून कौतुक करून मोकळे झाले, मोकळे होतात. देशात जे गडकरी यांचे आहे तेच येथे या राज्यात फडणविसांच्याही बाबतीत आहे कि त्यांच्या पाठी देखील त्यांचे विरोधक गडकरी, फडणवीसांची भला माणूस अशी तारीफ करून मोकळी होतात, सभागृहात किंवा जनतेसमोर विरोधकांना विरोधी भूमिका बजवावी लागतेच पण वैयक्तिक आयुष्यात मात्र विरोधक १०० टक्के, फडणवीस चांगले, असे नेहमी छातीठोकपणे सांगून मोकळे होत असतात. टोमणे मारून मारून पप्पू मोठा झालाय, हा तीव्र झटका अजूनही जर भाजपाला बसलेला नसेल तर ते गाफील आहेत, हे असेच म्हणणे योग्य ठरेल…
एक उद्योगी बाळ पावसाळ्यात एक गांडूळ पकडून आणतो. ते गांडूळ घरातील छोट्या बिळात टाकण्याचा खटाटोप करीत असतो. त्याचे आजोबा कौतुकाने नातवाचा उद्योग पाहत असतात. शेवटी बाळ यशस्वी झालाच. त्याने एक काडी आणली. त्यावर गांडूळाचे वेटोळे मारले. गांडूळासह काडी बिळात कुचकली. गांडूळ आत ढकलून काडी ओढून घेतली. आजोबा नातवावर खुश झाले. त्यांनी नातवाला दहा रुपयांची नोट स्वखुशीने दिली. दुसऱ्या दिवशी सकाळी आजी पण फारच प्रसन्न दिसत होती. नातवाचे मुके घेत तिने त्याला वीस रुपये दिले. आपण असे काय तिर मारले हे अजूनही नातवाला कळलेले नाही. नितीन गडकरी, नरेंद्र मोदी, सोनिया गांधी असे संदर्भ घेत हा लेख लिहीत असतांना सहजच हि लघुकथा येथे आठवली. ज्याने त्याने आपापल्या सोयीने अर्थ काढावा…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी