माझे शिक्षक : पत्रकार हेमंत जोशी
अनेक त्यांच्या आयुष्यातले संकटे दुःख दारिद्र्य अडचणी कुटुंबाचे झालेले हाल इत्यादींचे रसभरीत वर्णन करतात, ते वाचतांना आपल्याला बरेही वाटते पण संघर्षाचा अडचणींचा काळ भोगताना जो त्रास होतो त्यादरम्यान अनेकांना असे वाटते जे मलाही अनेकदा वाटले कि उठावे आणि विहिरीत उडी घेऊन मोकळे व्हावे पण कोणत्याही अडचणींवर नक्कीच आत्महत्या सोल्युशन नाही, दिस येतात आणि जातात त्यामुळे भोग भोगुनच मोकळे व्हायचे असते. लहानपणी आईच्या त्यानंतर प्रेमळ पत्नीच्या कुशीत जर एखाद्याला शिरायला मिळत नसेल तर त्याच्यासारखा दुर्दैवी तोच, दोन पैसे कमी असतील मिळतील पण अनमोल असे कुटुंब सुख जर एखाद्याला मिळत नसेल तर त्यासारखे दुसरे दुःख जगात नाही. बुधवारी २८ ऑकटोबर ला कोरोना झाल्याने माझे शिक्षक जळगाव जामोद जिल्हा बुलढाण्याचे श्री श्रावण कपले गेले आणि माझा बाप दुसऱ्यांदा गेल्याचे दुःख मला झाले. कदाचित तुम्ही त्यांना ओळखत नसाल पण माझ्यासाठी ते गुरु व पित्याच्या भूमिकेत होते. दहावी पास होईपर्यंत अशी अनेक वर्षे माझ्या आयुष्यात अशी होती कि केवळ कपले सर होते म्हणून मी व माझे कुटुंब दोन वेळ पोटभर जेवत होतो. वडिलांनी मला त्यांच्याकडे पाठवायचे मी त्यांच्याकडून दहा रुपये आणायचे मग बाजारात जाऊन ज्वारी तेल व भाजी आणायची ज्वारी निवडून दळून आणायची समजा चुकून कपले सर घरी नसले आणि रिकाम्या हाताने घरी आले कि बाप म्हणायचा, आला हा पांढऱ्या पायाचा आणि एक थोबाडात खाऊन पुन्हा सरांच्या घरी जावेच लगे, अनेकदा वाट पाहावी लागे…
ते गेले त्याच्या फारतर १०-१२ दिवस आधी कपले सरांचा अगदी सकाळी सकाळी फोन आला, म्हणाले, हेमंता मला रात्रभर का कोण जाणे तुझी खूप आठवण येत होती, राहवले नाही म्हणून आज सकाळीच फोन केला मग नेहमीचे भावनिक बोलणे झाले, म्हणाले मला तुझी त्या लिखाणामुळे काळजी असते. पण लिहितोही असा कि अनेकदा अंक वाचून काढतो. मी म्हणालो, सर अजिबात काळजी करू नका, मॉरली संपलेली माणसे कमालीची गांडू असतात, असे माझे काहीही बिघडवणार नाहीत. मग नेहमीप्रमाणे इकडले तिकडले बोलणे झाल्यावर फोन ठेवतांना म्हणाले, कोरोना संपला कि बघ मी नक्की मुंबईला भेटायला येतो जे यापुढे शक्य नाही आणि वर भेट होणे तर अशक्य कारण कपले सर तर शंभर टक्के स्वर्गात पोहोचले आहेत जेथे मला एंट्री देखील कठीण आहे. शाळेत असतांना त्यांच्या व्यक्तिगत कामासाठी मला आठवड्यातून एकदा बँकेत जावेच लागे जे काम मी अतिशय आनंदाने करीत असे कारण शिकण्याकडे लक्ष नव्हते त्यामुळे एक दोन तास शाळेतून बाहेर पडायला मिळत असे विशेष म्हणजे सर त्यांची नवी कोरी सायकल मला बँकेत जाण्यासाठी आनंदाने द्यायचे जी माझ्यासाठी त्याकाळी मर्सिडीज पेक्षा अधिक आनंद देणारी ठरायची अर्थात अगदीच लहान वयात त्यानिमीत्ते बँकेचे व्यवहार देखील कसे करायचे ते कळले, विशेष म्हणजे काही अत्यंत प्रेमळ तर काही तद्दन मारकुटे शिक्षक त्यात माझा बाप नंबर एक मारकुटा, त्यामुळे माझे मन आपोआप खूप भावनिक होत घडत गेले आणि फायदा पोटच्या मुलांना घडविताना झाला…
छोट्याशा गावात राहण्याचे अधिक फायदे आहेत कारण तुम्हाला एकाच गावात तेही अगदी जवळून भिन्न स्वभावाची भिन्न प्रकृतीची माणसे बघायला अभ्यासायला मिळतात. अलीकडे गावातल्या मित्राचा फोन आला होता म्हणाला, अरे आपली जी अमुक वर्ग मैत्रीण होती तिने तू लिखाणात अश्लील आक्रमक शब्दांचा वापर करतो म्हणून अनफ्रेंड केले आहे. त्यावर मी म्हणालो, तीच मैत्रीण का जिचे प्राध्यापक कि प्राचार्य असलेले वडील आणि काका ड्रग्स म्हणजे गांजाची शेती करायचे ज्यामुळे तुरुंगात गेलेल्या काकांना मी सोडवून आणले होते, हरकत नाही, अशा हलकटांनी मला अनफ्रेंड केल्याचे अजिबात दुःख नसते. काही माणसे अशी असतात कि स्वतःची खरकटी ठेवून इतरांचे ढुंगण बघतात. घरातले प्रसंगी उपकाराची फेड करायला विसरतात ती तर त्यामानाने फार दूरची, मी मित्राला म्हणालो. एकाच गावात अशी भिन्न माणसे तुम्हाला बघायला मिळतात ज्यातून तुम्ही कमालीचे स्ट्रॉंग होऊन बाहेर पडता. श्रावण कपले सर असे अचानक गेले त्यांच्या जाण्याने मला बाप गेल्याचे दुःख झाले. त्यांनी केलेल्या उपकाराचे प्रसंग आठवताना डोळ्यातले अश्रू थांबत नव्हते. वयाच्या सोळाव्या वर्षी गाव सोडतांना कपले सरांसारखे श्रीमंत व्हायचेच मनाशी ठरवून घर सोडले होते म्हणून गाव सोडले तरी अगदी दररोज श्रावण कपले नजरेसमोर असायचे यायचे सख्ख्या बापासारखे. श्रद्धांजली !!
तूर्त एवढेच : हेमंत जोशी