वृत्तपत्रे वाहिन्या व निवडणुका : पत्रकार हेमंत जोशी
आयबीएन लोकमत वाहिनीवर उमेश कुमावत आणि त्याचा कंपू लोकसभा निवडणुकीनिमित्ते काही मॅनेज्ड मुलाखती घेतांना बघितले, निवडणुकांच्या काळात वाहिन्या बघतांना आणि बहुतेक जवळपास सारीच वृत्तपत्रे वाचता वाचता आपोआप ओकार्या येतात, स्वतःच स्वतःची किळस येते, आपणही किती विकाऊ क्षेत्रात काम करतो याची, काय करू शकतो, एखाद्या वेश्ये सारखा विचार करून कामाला लागतो, म्हणजे गंदा है पर धंदा है, हा तो विचार असतो. आयबीएन लोकमत वाहिनीवर निखिल वागळे, डॉ. उदय निरगुडकर यांच्यानंतर थेट अतिशय सुमार उमेश कुमावतला बघतांना माझीच मला लाज वाटते. पण चूक जशी आयबीएन लोकमतची होती तशी ती वागळे आणि निरगुडकरांची अधिक होती, या दोघांनी, मालकाच्या पुढून आणि गाढवाच्या मागून जायचे नसते, ध्यानात न ठेवल्याने एकाचवेळी सारेच मागे गेले म्हणजे निरगुडकर, वागळे आणि आयबीएन लोकमत किंवा झी वाहिनीदेखील. शेठजींकडे नोकरी करतांना हुशार आहोत नक्की दाखवून द्यायचे असते पण तुमच्यापेक्षा हुशार आहोत, अतिहुशार आहोत दाखवायचे भासवायचे अजिबात नसते. म्हणजे एखादा प्रतिभावंत विजय कुवळेकर यांच्या प्रमाणे सुखासमाधानाने नोकरी करून निवृत्त होऊन बाहेर पडतो. अतिशहाणा त्याचा बैल रिकामा, भल्याभल्यांचा मग असा कचरा होतो, हि म्हण त्या दोघांना किंवा अशा ज्यादा चमकू पाहणाऱ्यांना तंतोतंत लागू पडते. नुकसान नक्की या अशा मंडळींना ऐकणाऱ्यांचे होत असते, वचक ठेवणारी माणसे राज्याची राष्ट्राची गरज असते, वागळे निरगुडकर तोरसेकर हवे असतात…
शेठजी मंडळींना फरक पडतो आणि पडतही नाही म्हणजे डॉ. निरगुडकर किंवा निखिल वागळे यांच्यानंतर त्या गाजवून सोडलेल्या सिंहासनावर आपण थेट एका अत्यंत सामान्य वकूब असलेल्या उमेश कुमावत सारख्या अँकर ची नेमणूक केली आहे हे त्या विजय दर्डा किंवा सुभाष गोयल यांना लक्षात आलेले असते नुकसान होते आहे, दर्जा घसरला आहे हेही त्यांच्या ध्यानात येत असते पण स्वतःच्या इगोपुढे या शेठजी मालकांना सारे फिके वाटत असते. आर्थिक गणिते जमवून आणतो, जमवून देतो, अशी माणसे त्यांना अधिक भावतात. सामान्य वकूब असला तरी वृत्तपत्र कार्यालयांची सरकारी जागा वाचवणारे, आर्थिक रसद पुरविणारे सरकारी दरबारी दलाल्या करणारे वार्ताहर किंवा वाहिन्यांमध्ये काम करणाऱ्यांना मोठी मागणी असते. महाराष्ट्र टाइम्स सारख्या वृत्तपत्रांमध्ये किंवा अशा पद्धतीने विविध वाहिन्यांमध्ये काम करणारे असे असंख्य मंडळी मला ठाऊक आहेत ज्यांना पगार अगदी जेमतेम पण त्यांच्या मालमत्ता डोळे विस्फारणार्या आहेत. माझ्याकडे पुरावे आहेत. असे अनेक म्हणजे महाराष्ट्र टाइम्स किंवा फ्री प्रेस मध्ये लिखाणावर प्रभुत्व असलेल्यांपेक्षा जो त्यांना दिलेल्या जमिनी सरकार परत घेणार याची काळजी अधिक घेतो, मालकांना भानगंडींमध्ये किंवा फाईल्स क्लिअर करतांना जो अधिक सहकार्य करतो त्याला डिमांड असते त्यामुळे काहीही झाले तरी मालक आम्हाला नोकरीतून काढून टाकणार नाहीत असे निरगुडकर किंवा वागळेंच्या दुनियेत
अजिबात कोणीही वावरायचे नसते. येथे या राज्यात आपण सारे मराठी अमराठीच्या हातातले बाहुले आहोत, मराठींसारखे मूर्ख कोणीही नाही, हे शेठजींना, अमराठींना नेमके माहित असल्याने आपल्याला स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी इसवी सन २००० उजाडावे लागले, हल्ली हल्ली मराठी माणूस सुधारलेला दिसतोय म्हणजे त्याला हे लक्षात आले आहे कि नोकर का, मालक का नाही, पण प्रमाण आजही अत्यल्पच आहे…
विषयांतर यासाठी केले कि यावेळी तब्बल १६ पानांचा अंक निवडणूक विशेषांक मी काढतोय. अनेक जवळचे मित्र खासदारकीची निवडणूक लढवताहेत म्हणजे ठरविले असते तर मला इतरांसारखे खूप मिळविता कामविता आले असते, एकाचवेळी एकाचदिवशी जशा तीन तीन वाहिन्यांवर उदयन राजे भोसले यांच्या त्याच त्या प्रश्नांवर म्हणजे ठरवून दिलेल्या प्रश्नांवर मुलाखती सुरु होत्या ते तसे फार मोठे दुकान मला देखील नक्की थाटता आले असते, आपणही तसे वागायचे का, तशी गरज आहे का किंवा नेत्यांसमोर झुकण्याचा आपला स्वभाव आहे का, मनाला प्रश्न विचारल्यानंतर ‘ नाही ‘ असे उत्तर आले आणि या पंचवार्षिक योजनेत मग त्यातल्या त्यात जीव तोडून चांगले काम कोणी केले तर नाव देवेंद्र फडणवीस
यांचे नजरेसमोर आले आणि लिहायला घेतले. पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना देखील हीच परिस्थिती होती म्हणजे त्यांना जर मुख्यमंत्री केले नसते तर राष्ट्रवादीने त्यांच्या मंत्र्यांनी गेट वे ऑफ इंदिरा देखील आमच्याच मालकीचे, सांगून तेही विकले असते म्हणून त्यादरम्यान प्रत्येक अंकात मी तीव्रतेने पृथ्वीराज चव्हाणांची बाजू घेत असे जसे एक योग्य, कणखर, दमदार, पुरून उरणारे नेतृत्व म्हणून आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे बघतो….
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी