सहज सुचले म्हणून : पत्रकार हेमंत जोशी
आपण अमुक एक केले तर नेमके काय परिणाम होणार आहेत आपल्याला चांगले ठाऊक असते पण तरीही काही मोह टाळल्या जात नाहीत. रस्त्याने जोड्याने फिरतांना इकडे तिकडे नको तेवढे बघितले तर घरी आल्या आल्या परिणामांना सामोरे जावे लागणार आहे माहित असूनही बहुतेक पुरुष नको तो आगाऊपणा करून ठेवतातच, म्हणजे बायको बरोबर असतांना देखील जर पुरुष पुढ्यात आलेल्या तरुण स्त्रीशी बोलण्यात अधिक रस घेणे म्हणजे मार खाणे आपसूकच आले तरीही पुरुष चुकतोच. रेडहॅण्ड पकडल्या जाणे तर अधिकच तापदायक, अगदी अलीकडे माझा मित्र त्याच्या मोलकरणीची आस्थेवाईकपणे चौकशी करत असतांना त्याला हेही कळले नाही कि त्याची बायको अंघोळ करून केव्हाची गुपचूप त्याच्या पाठीशी उभी आहे, पत्नीने रेडहॅण्ड पकडणे यासारखे दुसरे संकट नाही…
माझे अनेक वाचक माझ्यावर लोकसभा निवडणुकीदरम्यान माझ्यावर नाराज होतील मला हे परिणाम माहित होते तरीही मी अगदी उघड मुख्यमंत्र्यांची बाजू घेतली अप्रत्यक्ष तब्बल १६ पानांचा अंक काढून जणू त्यांच्या चांगल्या कामांची जाहिरात केली, परिणाम ठाऊक असूनही हे केले त्याला करणे अनेक आहेत पण प्रमुख कारण असे कि देवेंद्र फडणवीस यांना पृथ्वीराज चव्हाण यांच्याप्रमाणे कुटुंबासाठी वेगळे फार काही काढून ठेवायचे नाही, हे असे आर आर पाटलांचे होते पण ते भोळे होते त्यांना अनेकांनी त्यावेळी खूप गंडवले, मला त्यावर काही
प्रकरणे उघड करता आली असती पण आर आर आबांवर माझे प्रेम होते, खाणारे बाजूला राहिले असते बदनाम आबा झाले असते…
काही अधिकारी काही पुढारी काही मंत्री काही मुख्यमंत्री राज्याची गरज असते म्हणून ते थोडेफार कुठे चुकलेत तरी अशांना सांभाळून घ्यायचे असते. या राज्याचे भले साधण्यासाठी जे चार दोन चांगले नेते या राज्याची गरज आहे त्यात देवेंद्र फडणवीस माझ्या यादीतले पहिले नाव आहे त्यामुळे ते जे काय चांगले काम करवून दाखवतील, माझ्या जगभरातल्या पाच लाख मराठी वाचकांसमोर मी ते आणत राहीन. आणखी एक मनातले सांगायलाच हवे, माझ्या विदर्भाचा विकास साधणारे पत्रकारितेतल्या ३९ वर्षात मी अगदी बोटावर मोजण्याएवढे मोजके नेते बघितलेत त्यातले फडणवीस एक, त्यामुळे त्यांचे कौतुक करणे क्रमप्राप्त ठरते. माझा प्रत्येक अंक जपून ठेवा प्रेमपत्रांसारखा आणि त्यातले संदर्भ अधून मधून चालून बघा, साधारणतः ७-८ महिन्यांपूर्वी मी लिहिले होते कि जेव्हा केव्हा यापुढे या राज्यात आघाडी सत्तेत येईल, बाळासाहेब थोरात राज्याचे मुख्यमंत्री असतील, या लोकसभा निवडणुकीदरम्यान यांचे वाढलेले आणि वाढविल्या गेलेले राजकीय महत्व, मी लिहिलेले नक्की खरे ठरेल एवढेच सांगतो…
२५ एप्रिल ला मी दुबईत होतो आणि लोकमत दैनिकाचे प्रमुख विजय दर्डा त्यावेळी दिल्लीत होते, निमित्त होते त्यांच्या दिवंगत पत्नीच्या नावे आयोजित केल्या गेलेली संगीत रजनीचे, अचानक त्यांचा भ्रमणध्वनी आला. म्हणाले, तुमचे लिखाण उत्तम आणि माहितीपूर्ण असते. कोठून मिळते हो हि माहिती तुम्हाला ? ३९ वर्षांची तपस्या, त्यातून जपल्या गेलेले संबंध, त्यामुळे दिवसभरात राज्यातली इत्यंभूत खबर माझ्याकडे येते, आवश्यक तेवढे लिहितो. बाकीचे मनात ठेवतो. मी त्यांना सांगितले. पुढे ते म्हणाले, तुम्ही मी आणि विक्रांत मी मुंबईत असलो कि भेटूया, गप्पा मारूया. मी त्यांना आनंदाने हो म्हणालो. वाचकमित्रहो, उत्तमोत्तम लिखाण करणाऱ्यांची फौज त्या विजयबाबूंकडे, तरीही त्यांनी माझं कौतुक केले, त्यासाठी मन असावे लागते आणि एखाद्याचे कौतुक करतांना मन देखील मोठे ठेवावे लागते, विजयबाबू हे असे मोठ्या मनाचे म्हणून त्यांचे सगळीकडे नाव आहे आणि माणूस मोठा आहेच, साऱ्याच क्षेत्रात. धन्यवाद विजयबाबू…
तूर्त एवढेच :
पत्रकार हेमंत जोशी