वृत्तपत्रांची आकडेवारी/ लबाडी : पत्रकार हेमंत जोशी
केवळ हेकेखोर स्वभावामुळे किंवा मीच तेवढा ज्ञानी देशभक्त बुद्धिमान आणि इतरांना कस्पटासमान लेखण्याचा वृत्तीतून या राज्यातले कित्येक वर्षे पत्रकार म्हणून नंबर वन ठरलेले निखिल वागळे आज म्हणाल तर सिनेमातले राजेश खन्ना किंवा राजकारणातले सुरेशदादा जैन ठरले आहेत, मोठे होणे कठीण नाही पण मोठेपण टिकविणे महाकठीण असे काम या देशात आहे कारण मोठ्या माणसाचे वाटोळे कसे होईल त्यावर या देशात तो कसा खाली खेचला जाईल त्याकडे सर्वांचे लक्ष असते म्हणून जमिनीवर पाय ठेवून आणि रोवून जगायचे असते, तिकडे दुर्लक्ष झाले, डोक्यात माज शिरला कि येथे भलेभले संपायला वेळ लागत नाही मग तो कितीही पराक्रमी असला तरी, ज्याने या राज्यात वृत्तपत्र असो कि मराठी वाहिन्या, एकेकाळी हे क्षेत्र गाजवून सोडले ते निखिल वागळे जेव्हा कुठेतरी अगदी जुजबी धडपड करतांना बघून म्हणजे त्यांची यु ट्यूब छाप वाहिनीवरील आताची बडबड ऐकून अक्षरश: मनाला वेदना होतात, खूप वाईट वाटते, गर्वाचे घर जणू खाली झाले कि हे असे होते…
महाराष्ट्र दिनाचा लोकमत वाचला त्यात पहिल्या पानावर, दाखवा रे ते आकडे, अशी पूर्णपान जाहिरात होती. जाहिरातीमध्ये दैनिक सकाळ नव्हे तर आम्हीच कसे खपाच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर, हे सिद्ध करणारी आकडेवारी दिलेली होती. आकडेवारी किती खरी किती खोटी हे त्यांचे त्यांनाच ठाऊक असते पण जर तुम्ही काही दिवस जेथे वृत्तपत्र छापल्या जाते त्या त्या प्रिंटिंग प्रेस मध्ये छपाईच्या वेळी जाऊन उभे राहिलात तर तुमच्या ते सहज लक्षात येईल कि सारेच्या सारे वृत्त पत्रे छपाईपेक्षा खपाचा आकडा केवळ जाहिराती मिळविण्यासाठी मोठ्या प्रमाणात फुगवून सांगत असतात, तेच त्रिवार सत्य आहे. या राज्यात लोकमत, सकाळ, पुढारी,देशोन्नती, महाराष्ट्र टाइम्स, लोकसत्ता इत्यादी आघाडीवर असलेल्या वृत्तपत्रांना नक्की मोठा खप आहे पण ते जे सांगतात, प्रसिद्ध करतात, ते मात्र तितकेसे खरे नसते त्यासाठी तुम्हाला ते करावेच लागेल, प्रत्येक छपाईच्या ठिकाणी जाऊन उभे राहावे लागेल. पुढे जाऊन सांगू का हेमंत जोशी आणि बायका आपले खरे वय कधीही सांगत नाहीत किंवा आहे त्यापेक्षा कमी सांगतात आणि या राज्यातले वृत्तपत्रे त्यांचा खप कायम वाढवून सांगतात, असे वाक्य आपल्याकडे प्रचलित आहे…
www.vikrantjoshi.com
वृत्तपत्रांची आणखी एक लबाडी तर सर्वसामान्यांना तोंडात बोटे घालायला लावणारी आहे. या राज्यातले बहुतेक दैनिके म्हणजे त्यात ज्यांचा खप झाटभर आहे तेही मुख्यत्वे आलेतच, विविध जिल्ह्यातून किंवा राज्यातल्या विविध भागातून दैनिके प्रसिद्ध करतात कारण त्यांना त्याचा जिल्हावार फायदा शासकीय जाहिराती लाटण्यासाठी होतो, हे मुख्यत्वे या राज्याचे बुद्धिमान ताकदवान धैर्यवान अभ्यासू आणि कर्तबगार आयपीएस अधिकारी तथा या राज्याचे माहिती व जनसंपर्क खात्याचे महासंचालक ब्रिजेश सिंग यांनी दैनिकांची हि आर्थिक लबाडी प्रामुख्याने मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिल्यानंतर अशा जाहिरातींना बऱ्यापैकी छाप लावण्यात आलेला आहे पण त्यातून लहानसहान दैनिकांचे आर्थिक नुकसान झाले, मोठ्या खपाची दैनिके तसूभर हललेली नाहीत त्यांचे लुटण्याचा लुबाडण्याचे दुकान आहे तसेच जोरात सुरु आहे…
थोडक्यात जाहिरातींसाठी जवळपास साऱ्याच दैनिकांची जिल्हावार छपाई दाखविल्या जाते पण खपाचे आकडे एकत्रित करून सांगितल्या जात असल्याने दैनिकांच्या खपाचा आकडा मोठा दिसतो त्यात वास्तवातला खप कमी असतो पण खूप मोठ्या रकमेचे जाहिरातींचे दर पदरात पडून घेण्यासाठी खप जेवढा अधिक तेवढे पैसे लुबाडणे सोपे जाते, आम्ही लुटारू त्यात यशस्वी ठरत आलेलो आहे. असे म्हणतात अलीकडे मेकअप केल्यानंतर म्हैस देखील आलिया भट दिसेल आणि खप वाढविल्यास एखाद्या सामान्य दैनिकाला देखील सरकार तेही मुंबई किंवा ठाणे जिल्ह्यात शासकीय भूखंड देऊन मोकळा होईल. गेल्या २५ वर्षात ज्या वृत्तपत्रांना या राज्यात शासनाने भूखंड दिले तेथे आज काय उभे आहे किंवा त्या भूखंडांचे काय झाले जर बघितले तर मला वाटते जवळपास साऱ्याच दैनिकांचे मालक तुरुंगात असतील, गजाआड होतील. लोकमत दैनिकाच्या १ मे च्या त्या जाहिराती विषयी पुढे सविस्तर वाचा, अवाक व्हाल…
क्रमश:
पत्रकार हेमंत जोशी