राजकीय फसवणूक कि फसवणुकीचे राजकारण : पत्रकार हेमंत जोशी
समजा १०० भारतीयांना एका रांगेत उभे करून विचारले कि तुमच्यातला एखादा तरी असा आहे का ज्याने आजवर कोणालाही फसविले नाही, मला खात्री आहे एकही न फसविणारा निघणार नाही, अलीकडे येथे आपल्या राज्यातही विशेषतः १९८५ नंतर नवश्रीमंत होण्याची मोठी स्पर्धा सुरु झाली आणि जो तो ज्याला त्याला प्रत्येकाला फसवून वाममार्गे श्रीमंत होऊ लागला, प्रामाणिक प्रयत्न करून श्रीमंत झालो, असे माझ्यासहित एकही उदाहरण या राज्यात दाखवावे मी तुमचा भर चौकात मुका घेऊन मोकळा होईल किंवा तुमच्या घरी येऊन तुमचे पाय चेपून देईन. वाममार्गाने धंदा क्षणिक पैसे आणि विकृत आनंद देऊन मोकळा होतो पण असले फसविणे दीर्घकाळ टिकणारे नसते. या दिवसात कांदे १०० रु. किलो झाले म्हणून मी, जी माणसे गल्लीच्या तोंडावर टेम्पो घेऊन उभी राहतात थेट नाशिक वरून आलो म्हणून कांदे स्वस्त विकतो आहे सांगतात त्यांच्याकडून २०० रुपयांना चार किलो कांदे विकत घेतले, घरी मोजल्यानंतर ते साडे तीन किलोच भरले वरून त्यातले जवळपास एक किलो कांदे खराब निघाले, असे प्रत्येक ग्राहकाला अनुभव आल्यांनतर ते पुन्हा असल्या टेम्पो मधून कांदे विकत घेणार नाहीत घेत नाहीत, फसवणूक हि अशी एकदाच होते.
अलीकडे माझ्या एका मित्राने केस रंगवून घेण्या अर्बन क्लॅप मधून न्हाव्याला घरी बोलावले त्याने डुप्लिकेट कलर लावल्याने चार दिवसात केस पुन्हा पांढरे झाले, अर्बन क्लॅपचे हे असे फसवे अनुभव बहुतेकांना येत असल्याने मला वाटते पुढल्या काही वर्षात या कंपनीचे महत्व संपेल. पण जे इतरांना फसवत नाहीत प्रामाणिक सेवा देतात ग्राहक वर्षानुवर्षे त्यांना डोक्यावर घेऊन अधिकाधिक श्रीमंत करतात म्हणून आजही पारशी डेअरीत गर्दी असते किंवा कोट्यवधी कालनिर्णय कॅलेंडरस वर्षानुवर्षे विकले जातात किंवा माटुंग्याच्या काही दाक्षिणात्य हॉटेल्स मध्ये ग्राहक तिष्ठत उभे राहून खाण्याचा आनंद घेतात, अर्थात प्रामाणिकपणाची अशी कितीतरी उदाहरणे देता येतील थोडक्यात फसवणूक फक्त क्षणिक विकृत आनंद देत असते हेच खरे आहे…
मतदारांची पसंती काँग्रेसला किंवा यशवंतराव यांना असतांना मागल्या दाराने धूळफेक करून पुलोद सरकार सत्तेत आले होते पण पुढल्या पंचवार्षिक योजनेत पुलोद प्रयोग यशस्वी ठरला नाही, याउलट राज्यातल्या मतदारांनी काँग्रेसला भरगोस मतांनी निवडून पुन्हा सत्तेवर आणले, नेमके यावेळी देखील तेच घडले आहे म्हणजे मतदारांची पसंती सेना भाजपा युतीला होती, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या आघाडीला नव्हती पण यावेळीही शरद पवार यांनी वेगळ्या पद्धतीने पण पुलोद प्रयोगच सत्तेच्या रंगमंचावर आणला आणि ते यशस्वी झाले, पुलोद पद्धतीनेच शरद पवार यांनी महाआघाडी सरकार मागच्या दाराने सत्तेत आणले पण हा प्रयोग देखील पुलोद प्रमाणे नक्की अल्प संतुष्टी देणारा ठरणार आहे कारण मतदारांना फसवून सत्ता मिळविणे योग्य नाही हे वेळीच उद्धव ठाकरे यांच्याही ते लक्षात आल्याने पुलोद प्रमाणे फार काळ हा फसवा प्रयोग मराठी मतदार डोक्यावर घेणार नाहीत, कोरोना महामारी मध्येच आल्याने काही सत्ता बदल होण्यास विलंब नक्की होतो आहे पण सत्ता बदल अटळ आहे ज्याचे सर्वाधिक वाईट परिणाम माझ्या मते राष्ट्रवादी शिवसेना सोडून काँग्रेस व इतर मित्र पक्षांना अधिक भोगावे लागणार आहेत कारण मिळालेल्या संधीचा अतिशय सावध राहून शरद पवार त्यांचा पक्ष आर्थिक किंवा मतदार दृष्ट्या बळकट करण्या खूप मागे लागलेले आहेत, पुलोद प्रयोग फसल्यानंतर अनेक वर्षे जे सत्तेवाचून तळमळत राहावे लागले होते त्याची पुनरावृत्ती त्यांना होऊ द्यायची नाही आणि मी तर अगदी सुरुवातीपासून हेच सांगत आलोय कि उद्धव ठाकरे यांना अंडरएस्टीमेट करणे म्हणजे तुम्ही सिंह जवळ घेतल्यानंतर तो तुमच्या ओठांचे चुंबन घेतो असा गैरसमज करण्यासारखे ते आहे. उद्धवजी मोस्ट डेंजर राजकारणी, प्रसंगी चार पावले मागे येऊन केव्हा झेप घेऊन एखाद्याचा फडशा पाडतील ते सांगणे कठीण, मी मात्र त्यावर शंभर पुरावे देऊ शकतो, एक नक्की कि पुलोद प्रमाणे महाआघाडी प्रयोग मतदारांच्या मनाविरुद्ध घडला असल्याने त्याला फार आयुष्य नाही, महाआघाडीचेही आयुष्य एखाद्या झुरळासारखे ठरण्याची मोठी किंवा अधिक शक्यता आहे, फसवणुकीला क्षणिक आनंद मिळतो, दीर्घायुष्य नसते…
शरद पवारांना कायम एक खंत असते कि त्यांना रामदास आठवले त्यांच्यापासून दूर गेल्यानंतर दुसरा बौद्धमान्य लोकप्रिय नेता उभा करता आला नाही आणि येथे आपण सत्तेत जाण्यासाठी कमी पडलो त्याचा मोठा फायदा रामदास आठवले व प्रकाश आंबेडकर यांच्यामुळे विरोधकांना दरवेळी लोकसभा विधानसभा निवडणुकात झाला हेही पवारांना माहित आहे. कोणी कोणास फसविले हे सांगणे कदाचित मी एक ब्राम्हण असल्याने विनाकारण वादग्रस्त ठरेल पण शरद पवार यांनी नेस्तनाबुत किंवा नॉव्हेअर करण्याआधीच रामदास आठवले सावध होऊन विरोधकांना जाऊन मिळाले कि आठवले यांनी शरद पवार यांची फसवणूक केली तो मुद्दा येथे उकरून काढायचा नाही पण हे नक्की आहे कि आठवले पवारांना सोडून गेल्यानंतर दुसरा प्रभावी दलित नेता पवारांना उभा करता आला नाही ज्याच्या ते नक्की शोधात होते ज्याची झलक त्यांनी राज्यपालांकडे पाठविलेल्या यादीत दिसली आहे, यशपाल भिंगे आणि आनंद शिंदे यांना विधान परिषदेत संधी देऊन अनुक्रमे आठवले व आंबेडकर यांना शह देता येतो का वरून दलितांची मते आपल्याकडे वळविता येतील का, हाच शरद पवार यांचा मोठा प्रयत्न दिसतो आहे, आनंद शिंदे मात्र अतिशय प्रोफेशनल असल्याने त्यांचा आठवले नक्की होणार नाही. जोपर्यंत राज्यातले आठवले व आंबेडकर या दोघांचेही महत्व दलितांमध्ये कमी होणार नाही त्याचवेळी त्यांच्या तोडीचा नेता जोपर्यंत आपल्याला उभा करता येणार नाही तोपर्यंत कोणत्याही निवडणुकात यश सहजासहजी मिळणार नाही हे पवारांना पक्के ठाऊक आहे आणि दलितांची मते त्यांच्याकडे आकर्षित करण्याचा त्यांचा मोठा प्रयत्न आहे. मला पत्रकारितेत पुढे जायचे होते मग मी काय केले व.पु. काळे भाऊ तोरसेकर अनिल थत्ते आचार्य अत्रे यांची माझ्या लिखाणात नक्कल केली जे अभिनयात राजेंद्र कुमार किंवा गोविंदा यांनी केले तसे माझे, भेटणाऱ्या अनेक नेत्यांना हेच सांगणे असते कि राजकारणात यशस्वी होण्यासाठी तुम्हाला वेगळे काही करण्याची गरज नाही तुम्ही पवारांचे अनुकरण करा, नक्की यशस्वी व्हाल, आज याही वयात शरद पवार यांना जेव्हा पत्रकार या नात्याने मी त्यांचा जवळून अभ्यास करतो, मन थक्क होते, पवारांसारखे डावपेच ज्यांना जमले ते यशस्वी झाले हे नक्की आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी