देवेन्द्रजी अभिष्टचिंतन : पत्रकार हेमंत जोशी
फडणवीसांचा २२ जुलै वाढदिवस, काळबादेवीला ठक्कर क्लब मध्ये भली मोठी अप्रतिम थाळी मिळते. थाळी समोर आली कि त्यातले काय काय खावे किती किती खावे असे खाणार्यांचे होते तसे मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमीत्ते आमचे झाले आहे म्हणजे त्यांच्यावर काय काय लिहावे आणि कित्ती कित्ती लिहावे, अवघ्या साडेचार पाच वर्षात मुख्यमंत्री म्हणून अफाट कामगिरी त्यामुळे त्यांनी भल्याभल्यांना घाम फोडला आहे, विरोधकांच्या तर तोंडचे पाणी पळविले आहे. जे फडणवीसांच्या पार्टीत मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत होते त्यांना तर देवेंद्र यांनी केव्हाच मागे टाकले, बघता बघता ते इतरांच्या तुलनेत खूप पुढे निघून गेले…
www.vikrantjoshi.com
फडणवीसांचे लोणीकरांसारखे नाही म्हणजे गाव तेथे कुटुंब किंवा त्यांना व्यसने नाहीत कि बसले चौफुल्याला जाऊन नगरवरून येता येता, ज्यामुळे फाजील वेळ खर्च व्हावा, दारू पिणे नाही सिगारेट ओढणे नाही, विदर्भातले असूनही ते आळशी नाहीत कि दुपारच्या वेळी घेतले घराचे दरवाजे लावून आणि झोपले नवरा बायको चार चार तास, आमच्या विदर्भात तर असे कितीतरी कि जे दुपारी सतत आठ दहा दिवस झोपले कि शेजारचे लगेच अंदाज बांधतात, बाळंतपण कोणत्या महिन्यात येईल ते. वरून देवेंद्रजींचे प्रचंड ज्ञान, अगदी लहान वयात महाराष्ट्रातल्या प्रत्येक भागातला विविध विषयांचा सखोल अभ्यास, त्यांच्याशी बोलतांना अनेकदा मला दिवंगत डॉ. श्रीकांत जिचकार आठवतात. त्यामुळे एकाचवेळी दहा दहा मुख्यमंत्री करतील एवढी कामें त्यांनी एकट्याने अल्पावधीत मुख्यमंत्री म्हणून उरकलीत, पद्धतशीर पूर्ण केली, करताहेत. झोप आवश्यक आहे तेवढी घेतात, फारतर ५-६ तास तेही कधी कधी झोपतात इतरवेळी फक्त आणि फक्त राज्याच्या विचारात गढलेले असतात. त्यामुळे पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात त्यांनी जे काव्य म्हणून दाखविले ते पुन्हा प्रत्यक्षात नक्की उतरणारे, काव्य असे,
मी पुन्हा येईन, याच निर्धाराने, याच भूमिकेत,
याच ठिकाणी, नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी,
मी पुन्हा येईन, गावांना जलयुक्त करण्यासाठी,
शहरांचा चेहरा बदलण्यासाठी,
माझ्या महाराष्ट्राला दुष्काळमुक्त
करण्यासाठी,
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी,
मी पुन्हा येईन माझ्या युवा मित्रांना अधिक
सक्षम बनविण्यासाठी,
माझ्या बळीराजाचे हात बळकट करण्यासाठी,
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी,
मी पुन्हा येईन याच निर्धाराने याच भूमिकेत,
याच ठिकाणी प्रत्येक व्यक्तीची साथ घेत,
त्याचा हात हातात घेत,
माझ्या महाराष्ट्राला एक नवीन रूप देण्यासाठी,
नवमहाराष्ट्राच्या निर्मितीसाठी मी पुन्हा येईन…
केवळ शब्दांचे इमले बांधणारे देवेंद्र असते तर त्यांना याच ठिकाणी शब्दातून नक्की आडवेतिडवे मी घेतले असते पण त्यांना त्यांच्या लहानपणापासून मी बघत आलोय, शब्दाला खरे कालवून दाखविणारे आणि सांगितलेल्या वाक्यांना प्रत्यक्षात उतरविणारे हे व्यक्तिमत्व म्हणून त्यांनी लिहिलेले याठिकाणी उल्लेख केलेले काव्य ते जसेच्या तसे खरे करवून दाखवतील असे मनाला वाटत राहते. ईव्हीएम मशीन मध्ये फेरबदल गडबड करून फडणवीस सत्तेत आले किंवा पुन्हा सत्तेत येतील याला नक्की अर्थ नाही. ते म्हणालेत तेच खरे आहे कि ईव्हीएम मशीन हे सन २००४ मध्ये होते व २००९ मध्ये होते, तरी देखील मनमोहनसिंग हे पंतप्रधान झाले. काही दिवसांपूर्वीच्या निवडणुकीत तीन राज्यात अन्य पक्षांची सत्ता आली. मागील लोकसभा निवडणुकीमध्ये श्रीमती सुप्रिया सुळे निवडून आलेल्या आहेत. असे असतांना ईव्हीएममध्ये दोष आहे असे आपण कसे काय म्हणू शकतो ? फडणवीसांच्या या सभागृहातील म्हणजे जाहीर वक्तव्याला नक्की अर्थ आहे. मतदारांचे मत या राज्यातही आघाडीविषयी वाईट झालेले असल्याने किंवा प्रगती केवळ आपल्या कुटुंबाची हेच आघाडीतले धोरण होते त्यामुळे मतदार या महा भ्रष्ट राजवटीला कंटाळे त्यातून त्यांनी एकत्रितपणे युतीला मतदान केले, पुढल्या पंचवार्षिक योजनेत जर युती हि आघाडीच्या पावलावर पाऊल टाकून मोकळी झाली तर मतदार नक्की परिवर्तन पुन्हा घडवून आंतील…
अपूर्ण : हेमंत जोशी.