पुन्हा एकवार हेच शासन हेच सरकार : पत्रकार हेमंत जोशी
जळगावातल्या माझ्या त्या भालेराव आडनावाच्या मित्राला जवळपास १३ भावंडे होती, ज्याच्या आईचे मी आधीच्या एका लेखात कौतुक केले आहे. या पिढीला मूल झाले कि दुसरे नकोसे वाटते त्याकाळी पाच सात मुले झाल्यानंतर देखील पुढले अपत्य जन्माला घालण्यासाठी जोडपी अशी तयार असायची जणू ते पहिल्यांदा हनिमून साजरा करण्यासाठी अंथरुणावर पहुडले आहेत. माझ्या या मित्राच्या घरात तर एक वेळ अशी आली होती कि बाळंतपणासाठी एकाच रांगेत तिघींच्या खाटा टाकलेल्या होत्या, मित्राच्या आईची, सुनेची आणि मोठ्या मुलीची. काही मुस्लिम देशात तर आजी आणि नातीची एकाचवेळी बाळंतपणे उरकली जातात. मित्राच्या आईवडिलांना जशी आपल्या १३ अपत्यांची नावे पाठ नव्हती तसे आज माझे याठिकाणी झाले आहे म्हणजे अनेक सांगताहेत कि फडणवीस सरकारने गेल्या पाच वर्षात लोकोपयोगी निर्णय घेतले,त्यावर लिहा, तुम्हीच सांगा, कोणकोणते निर्णय लक्षात ठेवू आणि लिहू, लिहायला बसलो तर त्यावर एक कादंबरी लिहून काढावी लागेल…
आपले राज्य शेतीप्रधान आणि शेतकऱ्यांच्या समस्या जेवढ्या विदर्भातल्या फडणवीसांनी जवळून बघितलेल्या आहेत तेवढे काम आधीच्या सरकारमध्ये कधीही घडणे शक्य नव्हते कारण होरपळलेल्या शेतकऱ्यांचा विदर्भ आणि मराठवाडा आधीच्या सरकारमध्ये केवळ सहलीला अधून मधून जाण्याचे ठिकाण होते, माझे खोटे वाटत असेल तर शोध घ्यावा आणि मला सांगावे कि जयंत पाटलांसारखे बहुतेक मंत्री कितींदा विदर्भ मराठवाड्यातल्या ग्रामीण भागात फिरले किंवा फिरकले, पैसे मोजण्यापुढे या मंडळींना ना कधी वेळ मिळालाना कधी त्यांनी सर्वसामान्यांसाठी वेळ काढला आहे म्हणून शब्दरूपी या मंडळींना मला कायम थोबाडात मारतांना अजिबात वाईट वाटत नाही. फडणवीस किंवा त्यांच्या मंत्र्यांनी कोणताही दुजाभाव न करता पायाला भिंगरी लागल्यागत ते सारे गावोगावी फिरले म्हणून त्यांना लोकांचे जनतेचे मतदारांचे नेमके दुःख कळले. फडणवीस सरकारने जवळपास सारे निर्णय ग्रामीण जनतेसाठी विशेषतः शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी घेतले आहेत,माझे खोटे वाटत असेल तर माहिती व जनसंपर्क खात्याच्या वेबसाईटवर आपण नक्की जावे आणि खात्री करून मला सांगावे. अत्यंत महत्वाचे म्हणजे केवळ निर्णय त्यांनी घेतले नाहीत तर घेतलेल्या निर्णयांची अंमलबजावणी देखील केली, करून दाखवली…
www.vikrantjoshi.com
१९८० ते आजतागायत मी सार्या मुख्यमंत्र्यांना आणि त्या त्या वेळेच्या त्यांच्या सहकाऱ्यांना अतिशय अतिशय जवळून बघत आलेलो आहे हे मला जवळून ओळखणाऱ्यांना सांगणे म्हणजे मुख्यमंत्री कॉफी लव्हर आहेत हे सुमित वानखेडे किंवा केतन पाठक यांना सांगण्या सारखे किंवा गोविंदराव आदिक त्यांच्या पाठी त्यांच्या मुलांसाठी ते शरद पवारांचे मित्र व सहकारी असूनही जेमतेम संपत्ती सोडून गेलेत हे तुम्हाला ओरडून सांगण्यासारखे. आदिक मला शेवटच्या भेटीत जे म्हणाले होते तेच त्रिवार सत्य आहे कि पवारांनी त्यांना आयुष्यात खुबीने फक्त वापरून घेतले. अलीकडे तरीही गोविंदरावांच्या अविनाशला जेव्हा मी शरद पवारांचे सारथ्य करतांना बघितले डोळ्यात पाणी आले, गोविंदरावांचा दगाफटका न करण्याचा स्वभाव अविनाशने देखील उचलला, बघून बरे वाटले. विषयांतर झाले, महत्वाचे असे कि जेवढे फडणवीसांनी राज्याचे भले करतांना जीवाचे रान केले निदान माझ्या तरी आठवणीत असे मुख्यमंत्री नाहीत, सुधाकरराव नाईक यांना देखील वेगळे काहीतरी करून दाखविण्याची जिद्द होती पण पवारांनी त्यांना त्याकाळी अजिबात सुचू दिले नाही जेव्हा सुधाकरराव राजकारणातून नोव्हेअर झाले तेव्हाच पवार गप्प बसले, मनातून उतरलेल्यांना संपविणे उध्वस्त करणे बदनाम करणे आयुष्यातून उठविणे एखाद्याचा दत्ता मेघे किंवा सुधाकरराव नाईक करणे हे काम मात्र पवारांना छान जमले म्हणून अनेकदा फडणवीसांची काळजी वाटते, त्यांनाही संपविण्यासाठी मुख्यमंत्रीपदावरून पायउतार होण्यासाठी यांनी कमी का कुभांड रचले पण देवेंद्र फडणवीस असे पक्के आणि कणखर कि ते शरद पवारांना त्यांच्या क्लुप्त्यांना पुरून उरले…
एवढेच सांगतो जर राज्यातल्या सुजाण प्रत्येक मराठी माणसाला मतदारांना पहिल्यांदा नेमकी प्रगती साधणे म्हणजे काय असते हे खरोखरी बघण्याची अनुभवण्याची इच्छा असेल तर पुढली पाच वर्षे आपण फडणवीसांना कमीत कमी मानसिक त्रास द्यायला हवा. घरातला कर्ता पुरुष जेव्हा घराचे भले करण्यासाठी दरदिवशी बाहेर पडतो तेव्हा त्याची पत्नी आणि समजूतदार मुले जशी त्याची काळजी घेतात आणि त्याला अधिकाधिक शक्ती देवाने बहाल करावी अशी जी प्रार्थना ते सारे देवाकडे बेंबीच्या देठापासून करतात, निदान किमान पुढली पाच वर्षे तरी या देवेंद्र फडणवीसांना आपण आपल्या घरातला कर्तृत्ववान धीरोदात्त निधड्या पराक्रमी दूरदर्शी समाजपयोगी देशप्रेमी लोकसेवक युगपुरुष समजून त्यांना शुभेच्छा देत राहू आणि त्यांना त्यांच्या डोक्याला विनाकारण ताप मनस्ताप होणार नाही याची खबरदारी नक्की घेऊ, मी डोळ्यात तेल घालून तुम्हाला हे निक्षून सांगतो आहे कि त्यांना हे राज्य फार मोठ्या उंचीवर नेऊन ठेवायचे आहे, आपले फक्त एवढेच काम आणि जबाबदारी कि फडणवीसांना तुम्हा आम्हा सर्वांकडून मदत झाली नाही तर चालेले पण त्यांना त्रास देणे अजिबात नको…
क्रमश: हेमंत जोशी