पवार वार आणि पवार वॉर : पत्रकार हेमंत जोशी
शरद पवारांनी २७ सप्टेंबर जो जाणूनबुजून अभूतपूर्व गोंधळ घातला तो त्यांच्या आयुष्यातील सर्वाधिक बालिश क्षण होता त्यावर वास्तविक मतदारांनी हसण्या पलीकडे फारसे सिरियसली घेऊ नये. डॉक्टर दिसले रे दिसले कि लहान मुले दवाखान्यात जसे भोकांड पसरतात किंवा त्यानंतर डॉक्टरांच्या हातात इंजेक्शन दिसले कि हीच लहान मुले आकांडतांडव करतात ते तसे हुबेहूब पवारांचे २७ तारखेला झालेले होते, त्यांनी आधी भोकांड पसरले नंतर आकांडतांडव केले कारण समोर दिसणारे डॉ. ईडी आपल्याला सुधारण्याचे जहाल इंजेक्शन देऊन नंतरच बाहेर काढणार आहेत हे एव्हाना पवारांच्या लक्षात न येण्याएवढे ते वेडे किंवा खुळे नाहीत. मतदारांची सिम्पथी मिळविण्याचा पवारांचा हा बालिश प्रयत्न त्यांचा त्यातून त्याक्षणी हेतू थोडाफार निश्चित नक्की साध्य झालेला असला तरी नजीकच्या भविष्यात जेव्हा पवार आणि त्याचे ४० चोर विविध कारणांनी ईडीच्या जाळ्यात अडकतील, ओढले जातील तेव्हा पवारांचाही चिदंबरन किंवा शिवकुमार झालेला असेल, साधे कुत्रे देखील त्यांच्या पाठीशी उभे नसेल. काल परवा ज्या पवारांनी ईडी मध्ये अडकलेल्याला तुरुंगात गेलेल्या भुजबळ काका पुतण्याची बाहेरून गम्मत बघितली तीच वेळ शंभर टक्के एक दिवस त्यांच्यावर देखील ओढवणार आहे…
वाचकमित्रहो, अलीकडे जगभरात माझ्या मराठी वाचकांची संख्या मोठ्या झपाट्याने वाढून ती आता जवळपास २० लाखांवर गेलेली आहे. तुम्ही, माझ्या प्रत्येक वाचकाने माझे लिखाण तुमच्या मित्रांकडे यासाठी आणखी आणखी यासाठी पोहोचवावे कि ते लिखाण किंवा पत्रकार भाऊ तोरसेकरांचे लिखाण, आम्ही त्याकडे एक मिशन म्हणून बघत असतो, डोक्यात २४ तास त्या लिखाणांचेच भूत एवढे सवार असते कि विचारू नका. त्यातल्या त्यात एक बरे आहे कि माझे नव्याने लग्न झालेले नाही अन्यथा पत्नी ऐवजी रोमान्स करतांना मी आयपॅडची पप्पी घेतली असती आणि जे मित्र माहिती देतात त्यांनाच मी पत्नीऐवजी मधुचंद्राला नेले असते. आम्ही जो जहाल विचार तुमच्या पर्यंत पोहोचवत असतो त्यामागे आईशपथ कोणत्याही जातीला कोणत्याही प्रांताला धरून कवटाळून ते लिखाण नसते तर १९९० ते आजतागायत पवार गॅंग आणि काँग्रेस मधले काही दरोडेखोरांना ताळ्यावर आणण्यासाठी हे मिशन राबविले जात असते. उद्या क्लीन मिशन पासून फडणवीस जरी विचलित झाले तर पुन्हा आईशपथ सांगतो, आम्ही, मी त्यांनाही सोडणार नाही…
www.offthetrecordonline.com
२७ सप्टेंबरला पवार जेव्हा ईडीच्या नावाने शिमगा साजरा करीत होते तेव्हा मी टीव्ही ९ च्या कार्यालयातील केबिन मध्ये एका बुजुर्ग पत्रकारांसंगे बसून टीव्हीवर त्यांचे धिंगाणे बघत असतांना अचानक मला जोरात हसायला आले असतांना त्या बुजुर्ग पत्रकाराने मला का हसलात विचारल्यावर मी म्हणालो, कशी गम्मत आहे ज्यांना राष्ट्रवादी सोडायची होती, नक्की सोडायची आहे ते जयंत पाटील, अनिल देशमुख, विद्या चव्हाण का कोण जाणे, पवारांची डिमांड वाढते आहे बघितल्या बघितल्या सर्वात समोर जाऊन उभे आहेत. विशेष म्हणजे जितेंद्र आव्हाड एरवी फडणवीसांच्या समोर गुढगे टेकून उभे असतात ते आव्हाड मी बघा कसा पवारांचा त्यांच्या संकटातला सच्चा साथीदार म्हणून मिरवितांना दिसताहेत म्हणून मला हसू आवरत नव्हते. विद्या
चव्हाण, अनिल देशमुख जितेंद्र आव्हाड किंवा जयंत पाटील इत्यादी फडणवीस, उद्धव ठाकरे यांच्या ऐवजी पवारांचे पाठीराखे आज दिसणे म्हणजे त्याला म्हणतात संधी अभावी ब्रम्हचारी राहणे. अनिल देशमुख यांना उमेदवारीचे वचन मिळत असेल तर त्यांना कसे शिवसेनेत जायचे आहे त्यावर मिलिंद नार्वेकर तुम्हाला व्यापक सांगू शकतील, थोडक्यात काल जे पवारांच्या मागे उभे होते ते देखील उद्या तेथे उभे असलेलेदिसणार नाहीत हे शंभर टक्के खरे आहे…
स्वातंत्र्य लढ्यात जेव्हा केव्हा महात्मा गांधी लोकमान्य टिळक किंवा अन्य नेते तुरुंगात जायचे तेव्हा तेव्हा त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून अन्य दुसऱ्या फळीतले नेते देखील इंग्रजांना सांगायचे एकटे बापू कशाला, आम्हालाही तुम्ही तुरुंगात टाका आणि आंदोलने करून तेही तुरुंगात जायचे. जे तेव्हा घडायचे ते आता पवारांच्याही बाबतीत घडलेच पाहिजे म्हणजे पवार जसे ईडीला ठणकावून सांगताहेत कि होऊन जाऊ द्या माझी ईडी चौकशी तसे मग ते अजित पवार असतील किंवा सुप्रिया सुळे, अनिल देशमुख, हेमंत टकले, सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, जयंत पाटील, धनंजय मुंडे इत्यादी जे पवारांकडे उरले आहेत त्या सर्वांनी ईडीला ठणकावून सांगितलेच पाहिजे कि होऊन जाऊ द्या आमचीही चौकशी. वाचकमित्रहो, मी पवारांच्या पुढे पुढे करणाऱ्या ज्या नेत्यांची नावे सांगतो, त्यातले रोहित पवार, अमोल कोल्हे इत्यादी चार दोन नवखे दुसऱ्या फळीतले नेते सोडले त्याव्यतिरिक्त एकाने जरी, होऊन जाऊ द्या आमचीही ईडी चौकशी, म्हटले तर मी माझी पत्रकारिता सोडून देईन आणि सरळ तुमच्या घरी येऊन तुमच्या घरातली लुगडी धुवायला सुरुवात करेल. ऐन विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर पवार सिम्पथी मिळविण्याचा प्रयत्न करीत होते जे त्यांना या ईडी निमित्ताने जमले, त्यांच्या परंपरागत मतांचा त्यांना या मिळालेल्या सिम्पथीमुळे काही प्रमाणात फायदा नक्की मिळेल निदान आज तरी तसे चित्र निर्माण झालेले आहे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.