आपले भन्नाट मुख्यमंत्री : पत्रकार हेमंत जोशी
माझा एक मित्र होता. एकटा होता एकटाच राहायचा, स्वतःच स्वतःशी बोलायचा, स्वतःच स्वतःला पत्र पाठवायचा त्या पत्रांना स्वतःच उत्तरे लिहायचा. स्वतःशीच बोलत बसायचा, राग आला कि स्वतःच स्वतःच्या थोबाडात मारून घायचा, तो अविवाहित असल्याने स्वतःच स्वतःची पप्पी घ्यायचा. घरातली सारी कामें स्वतःच करायचा. देवेंद्र फडणवीस यांचे सध्या माझ्या त्या मित्रासारखे झाले आहे, त्यांना स्वतःला त्यांच्या पक्षाशी संबंधित सारीं कामें तर उरकावी लागतातच पण इतरही राजकीय पक्षांची त्यांच्यावर जबाबदारी येऊन पडल्याचे दिसते. अमुक एका पक्षातला तमुक उमेदवार कुठे फिट करायचा, कोणाला कुठे पाठवायचे कुठे बसवायचे सारे त्यांनाच बघावे लागते. इतर पक्षातले नेते त्यांचे आवडते विद्यार्थी असल्यासारखे निमूटपणे ऐकतात. हे असे आजतागायत घडल्याचे कोणीही बघितलेले नाही की भाजपचा नेता इतरही पक्ष सांभाळतो आहे. याला म्हणतात अमुक एखाद्या नेत्याने स्वतःविषयी अत्र तत्र सर्वत्र आदर निर्माण करणे विश्वासाचे वातावरण निर्माण करणे…
रात्री फारतर चार तास झोप, वीस तास फक्त काम आणि काम तेही डोके शांत, ठिकाणावर ठेवून, इवलीशी चूक, पवारांसारखे कोणत्याही थराला जाणारे विरोधक, अनेकदा वाटते देवाने अनेक तल्लख मेंदू एकत्र केले आणि फडणवीसांना ते एकट्याला एकत्र दिले आहेत. सारे काही तोंडपाठ, राज्याच्या कानाकोपऱ्यात एकदा जे भेटले ओळखीचे झाले आहेत त्यांना नावानिशी ते आवाज देतात तेव्हा समोरचा जो केव्हातरी त्यांना भेटलेला असतो, लाजून चूर होती कि आपले मुख्यमंत्री थेट नावानिशी ओळखतात. फडणवीसांना एकदा भेटले कि ते फडणवीसांचे फॅन क्लब मेम्बर झाले हे आता सर्वांना कळून चुकले आहे. एक मात्र खरे आहे कि त्यांच्यासमोर भल्या भल्या अधिकाऱ्यांची अनेकदा बोबडी वळते कारण जेव्हा कोणत्याही विषयावर चर्चा असते त्या विषयाची खडान्खडा माहिती देवेंद्र यांना असल्याने ते केव्हा काय विचारतील आणि आपण निरुत्तर होऊ हि ज्याला त्याला त्यांच्याविषयी भीती धास्ती असते, सतत वाचन आणि सखोल अभ्यास करून अमुक एखादा विषय नेमका समजवून घेण्याचा त्यांचा स्वभाव, प्रचंड यशाचे नेमके तेच गमक आहे …
क्रमश: हेमंत जोशी