पुणेरी आणि दादागिरी : पत्रकार हेमंत जोशी
हत्ती आणि चार आंधळे कथेपद्धतीने राजकारणातले काही अर्धवटराव आपापल्या सोयीने पुड्या सोडण्यात स्वतःला धन्य समजतात. आता हि पुडी कोणी सोडली माहित नाही कि फडणवीसाना चंद्रकांत पाटलांचे प्रदेशाध्यक्ष नात्याने महत्व कमी करायचे होते म्हणून त्यांनीच जाणूनबुजून चंद्रकांत पाटलांना कठीण अशा ब्राम्हणी विधान सभा मतदार संघात मुद्दाम उभे राहण्यास भाग पाडले. वास्तविक ते चंद्रकांत पाटील असतील किंवा दस्तरखुद्द देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे अन्य मंत्रिमंडळ किंवा ज्यांचा मंत्रालयाशी सतत संबन्ध येतो अशा सर्वांच्या मेधा कुलकर्णी एक हरहुन्नरी उत्साही हसतमुख ऍक्टिव्ह लोकप्रिय आमदार म्हणून अत्यंत आवडत्या, त्यांचा दांडगा जनसंपर्क त्या पुन्हा निवडून येतील आमदार होतील यात कोणालाही म्हणजे त्यांच्या मतदार संघातील विरोधकांना देखील शंका नसतांना का म्हणून फडणवीसांनी त्या जागेसाठी पायावर धोंडा पाडून घ्यावा, कुलकर्णी यांचे तिकीट कापणे शंभर टक्के फडणवीसांच्या मनात नव्हते…
पण अलीकडे शरद पवार यांनी भाजपा मधल्या ज्या दोघांना सतत पाण्यात बघितले त्यातले अर्थात एक होते फडणवीस आणि दुसरे होते चंद्रकांतदादा पाटील कारण पाटलांनी पश्चिम महाराष्ट्रात जेथे जेथे शरद पवार यांचे वर्चस्व होते दादागिरी होती त्यांची मस्ती जिरविण्यात मोलाची महत्वाची जबाबदारी मुख्यमंत्र्यांचे विश्वासू आणि ताकदवान सहकारी म्हणून पार पाडली, विशेषतः लोकसभा निवडणुकीत चंद्रकांतदादांनी ज्या पद्धतींने पवारांना हैराण वेडे करून सोडले तेव्हापासून पवारांशी यशस्वी पंगा घेणारा ताकदवान नेता म्हणून पाटलांचे कौतुक झाले. व्हायचे काय कि पवार कायम पाटलांना हिणवायचे कि पाटलांनी लोकांमधून निवडणूक लढवून दाखवावी म्हणून चंद्रकांत पाटलांनी पवारांच्या पुण्यात त्यांच्या गढीत थेट कोल्हापूरमधून उडी घेतली आणि मेधाताईंना विनंती करून विधानसभा लढविण्याचे ठरविले. आजच लिहून घ्या, चंद्रकांत पाटील शरद पवार यांच्या नाकावर टिच्चून किमान एक लाख मताधिक्य मिळवून निवडून येतील, लोकांमधून आमदार होतील…
वास्तविक एकदा नव्हे तर अनेकदा फडणवीस चंद्रकांत पाटलांना म्हणाले होते कि विधानसभा निवडणुकीदरम्यान तुम्ही प्रदेशाध्यक्ष म्हणून प्रचारात फारसे नसणे माझ्यासाठी अत्यंत ताण निर्माण करणारे हे काम असेल पण पवारांच्या डिवचण्यावर चिडलेले दुखावलेले चंद्रकांत पाटील हट्टाला पेटलेले फडणवीसांना दिसल्याने नाईलाज झाला आणि चंद्रकांत पाटलांनी पवारांना थेट दाखवून दिले कि मी देखील लोकांचा नेता आहे विधानपरिषदेत केवळ मागच्या दाराने येऊन खुर्ची पटकावणारा नेता मंत्री नाही. शरद पवार खूप डिस्टरब आहेत मनातून चिडलेले आहेत त्यांना आता जळी स्थळी केवळ फडणवीस आणि चंद्रकांतदादा दिसू लागले आहेत, पवारांना आता त्यांचा कायम होऊ घातलेला पराभव समोर दिसू लागला आहे म्हणून चंद्रकांत पाटील कसे अस्वस्थ अस्थिर बदनाम होतील त्याकडे पवारांचे पूर्ण लक्ष आहे पण कोथरूड विधानसभा मतदारसंघातील प्रत्येक बुद्धिमान हुशार मतदाराला दादांचे महत्व आणि पवारांची चाल माहित असल्याने चंद्रकांत पाटलांना विक्रमी मताधिक्याने त्यांनी निवडून आणण्याचे निश्चित केले आहे…
क्रमश: हेमंत जोशी