सोशल मीडिया आणि तुम्ही आम्ही : पत्रकार हेमंत जोशी
फेसबुक किंवा तत्सम सोशल मीडियाचा सकारात्मक उपयोग करून घ्यावा यावर मी अतिशय ठाम आहे. अगदी अलीकडे माझ्या बाबतीतले एक उदाहरण देतो. येथे मुंबईत माझे असे काही अमराठी मित्र आहेत ज्यांना मराठी कुटुंबातला दिवाळीत तयार केल्या जाणारा विविध वेगळ्या पदार्थांचा फराळ आवडतो मग मी काय करतो दरवर्षी दिवाळीला या अशा काही मित्रांकडे दर्जेदार फराळ अगदी मुबलक पाठविण्याची व्यवस्था करतो त्यासाठी मुद्दाम पुण्याला जातो, तेथे विकत घेतो आणि येथे मुंबईत येऊन अमराठी मित्रांच्या घरी पाठवून देतो. यावर्षी दिवाळी दरम्यान राजकीय घडामोडीमुळे ना परदेशात जाणे जमले ना पुण्यात जाणे शक्य होते मग मी एक काम केले मला दर्जेदार दिवाळी फराळ विकत पाहिजे या आशयाचे निवेदन माझ्या काही मोजक्या महिला फेसबुक फ्रेंड्सला पाठविले, आश्चर्य म्हणजे त्यावर प्रचंड रिस्पॉन्स मिळाला, माझे काम सोपे झाले, दर्जेदार फराळ मला अमराठी मित्रांकडे पाठविणे सहज शक्य झाले. हा असा सकारात्मक सोशल मीडियाचा उपयोग तर करून बघा, चांगले मित्र मैत्रिणी त्यातून नक्की जोडले जातील, अर्थात उद्या लंगोट विकत हवे आहेत पद्धतीचे आवाहन सोशल मीडियावर करून आपला बावळटपणा सिद्ध करू नका…
कृपया मी पुढे जे लिहिणार आहे ते माझ्या घरातल्या महिला सदस्यांना वाचून दाखविण्याचा कोणीही प्रयत्न करू नये. असे नाही कि माझ्या घरी दिवाळी दरम्यान फराळ आपल्या हातांनी तयार करण्याचा प्रयोग केल्या जात नाही पण विशेषतः माझ्या घरातले विविध पदार्थ जेथे माझी खाण्याची हिम्मत होत नाही तेथे मी ते कसे काय या अमराठी मित्रांकडे पाठवून त्यांच्याशी कायमचा वाईटपणा घेऊ शकतो, शक्य नाही. अर्थात हा विचार नक्की डोक्यात असतो कि काही मित्रांचा बदला घेण्यासाठी त्यांना दिवाळीत घरी फराळाला बोलवावे पण कदाचित आमच्या घरी तयार करण्यात येणाऱ्या फराळाची महती या मित्रांच्या आधीच कानावर गेली असावी कारण अनेकदा आग्रह करूनही ज्यांचा मला खुबीने बदला घ्यायचा होता ते अनिल थत्ते, उदय तानपाठक, डॉ. उदय निरगुडकर, पत्रकार अशोक वानखेडे, पत्रकार अभय देशपांडे इत्यादी मित्र आले नाहीत, दिवाळी दरम्यान काही मित्र कदाचित याच कारणासाठी माझा फोनही घेत नाहीत…
याठिकाणी माझ्या सहनशीलतेची तुम्ही दाद द्यायलाच हवी कारण आमच्याकडले शंकरपाळे हे कायम पोस्टमार्टेमसाठी आणलेल्या दीर्घकाळ पडून असलेल्या प्रेतासारखे निपचित एखाद्या भांड्यात समोर आणून ठेवले जातात, चकली आणि अडकित्ता एकाचवेळी मी घेऊन बसतो कारण अडकित्त्याशिवाय आमच्याकडच्या चकलीचे लहान लहान तुकडे होत नाहीत. एकदा मी आमच्या घरी तयार केलेल्या अनारशाला शेगाव ची कचोरी समजून तोंडात टाकले अनारसे मी खूपवेळ कुत्रे हाडे चघळतात पद्धतीने रवंथ करीत बसलो होतो. करंजीचा आकार तर एवढा वेगळा असतो कि बघणार्याला वाटावे गांडूळ वेटोळे करून तुमच्यासमोर ठेवलेले आहे. लहानपणी ज्यांनी मला बघितले आहे त्यांना नेमके ठाऊक आहे मी एवढा वातड होतो जेवढा आमच्याघरातला चिवडा, हा चिवडा चावून खाणे शक्य नसल्याने मी शक्यतो गिळतो, वरून मार टाळण्यासाठी, वा काय मस्त चिवडा झालाय असे मला वा, गिरीश महाजन कित्ती लहान दितात, पद्धतीचे खोटे खोटे सांगावेच लागते अन्यथा फटाके अंगणात नव्हे तर माझ्या ढुंगणाखाली लावल्या जातील. मुले लहान असतांना घरातल्या घरात दिवाळीच्या सुट्टीत आमच्याकडच्या लाडूंनीच क्रिकेट खेळून धमाल मस्ती करायचे. माझा एक दात कृत्रिम का आहे, वेगळे सांगण्याची गरज आहे का ? कारण लाडू मलाच कंपलसरी खावे लागायचे…
तूर्त एवढेच : हेमंत जोशी.