बावनकशी बावनकुळे : पत्रकार हेमंत जोशी
विधानसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून तर आजतागायत या राज्यात राजकीय पटलावर आणि शासन प्रशासनात जो अभूतपूर्व गोंधळ सुरु आहे पुढे आणखी किती काळ सुरु राहणार आहे हे नेमके लक्षात येत नसल्याने माझी अवस्था वेड्या माणसासारखी झालेली आहे. मध्यरात्री किंकाळी फोडत मी उठून अचानक गाणी काय म्हणायला लागतो, मध्येच स्वतःशी हसतो काय किंवा एखाद्या देखण्या बाईकडे बघून रडतो काय, कधी डोक्यावरचे केस उपटतो तर कधी वाटते अंगावरचे कपडे टराटरा फाडून फेकून दयावेत, मधेच उदय तानपाठक सारख्या मित्राला फोन करून आय लव्ह यु काय म्हणतो किंवा एखाद्या देखण्या मैत्रिणीला फोन करून सांगतो कि तू मला सख्ख्या बहिणीसारखी आहे, पर्वा तर मी चक्क पस्तिशीतल्या मित्रास फोन करून सांगितले कि मी तुझ्यात माझा सासरा बघतोय, कधी कधी तर असे मनात येते कि पत्रकार यदु जोशी यासी फोन करून सांगावे कि वय झाले आहे लग्न करून घे. कधी वाटते एखाद्या स्विमिंग पूल मध्ये स्वतःला झोकून द्यावे नंतर लक्षात येते कि मी पट्टीचा पोहणारा आहे. हे असे माझ्या बाबतीतच नव्हे तर अनेक राजकीय जाणकार मंडळींची अवस्था सध्या राज्यात नेमके काय चालले आहे हे लक्षात येत नसल्याने अक्षरश: ठार वेड्यासारखी झालेली आहे…
सतत पाच सहा महिने शासन प्रशासनावर लोकप्रतिनिधींची जर पकड नसेल तर राज्याचे विशेषतः लोकांचे जनतेचे मतदारांचे फार मोठे नुकसान होते. एकमेकांवर आरोप प्रत्यारोप करण्याची एखाद्याची जात काढून त्या नेत्यावर चिखलफेक करण्याची हि वेळ नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असतांना त्यांचे काही दोष काही चुका जसे तुम्हाला दिसतात तसे मला आम्हाला दिसत नाहीत का, मी तर म्हणेन जेवढे मला माहित आहे तेवढे नक्कीच कोणालाही माहित नाही पण ते जसे सत्तेत असतांना त्यांच्या चुकांकडे कानाडोळा करून त्यांच्या चांगल्या कामांचे निर्णयांचे कौतुक केल्या जायचे किंवा मोठ्या प्रमाणावर पंकजा मुंडे यांच्यासारखे अनेक स्वतःचे आर्थिक फायदे करवून घ्यायचे, आज फडणवीस सत्तेतून बाहेर आहेत म्हणून त्यांच्यावर लगेच पंकजा मुंडे यांच्यासारख्या लचके तोडलेल्या नेत्यांनी लगेच शाब्दिक वार करणे म्हणजे पंकजा किंवा अन्य त्यांच्यासारख्या नेत्यांनी स्वतःची शालिनीताई पाटील किंवा सुरेशदादा जैन करून घेण्यासारखे आहे, असते. पंकजा मुंडे किंवा तत्सम नेत्यांचे या दिवसातले वागणे बोलणे भलेही चटपटीत खुराक म्हणून फडणवीस विरोधक किंवा आम्ही मीडिया एक खुराक म्हणून त्याकडे बघतो आहोत पण त्यातून पुढे फडणवीस हेच मोठे होतील आणि याआधी घालून पाडून बोलून जसे एकनाथ खडसे यांनी आपले आणि आपल्या कुटुंबाचे मोठे राजकीय नुकसान करवून घेतले लक्षात ठेवा आज राम शिंदे किंवा तत्सम भाजपातले घालून पडून त्या देवेंद्र फडणवीस यांना बोलणारे नेते खडसे पद्धतीने स्वतःचे राजकीय नुकसान करवून घेणार आहेत….
जसे नितीन गडकरी चंद्रकांत पाटील इत्यादी भाजपा मध्ये मोठे नेते आहेत त्या पाच सात मंडळींमधले एक देवेंद्र फडणवीस आहेत हे अमान्य करून चालणार नाही. आज विरोधकांनी याच फडणवीसांना जेव्हा भर चौकात फाशी देण्यासाठी टांगून ठेवलेले असतांना सर्वात आधी ज्यांनी त्यांचे अनेक आर्थिक व राजकीय फायदे गैरफ़ायदे उचललेत त्या त्यांच्याच पक्षातल्या नेत्यांनी सर्वात आधी जाऊन जखडून ठेवलेल्या देवेंद्र फडणवीस यांना एक दगड आमचाही पद्धतीने घालून पाडुन आरोप करणे त्यातून हे असले क्षणिक फायदे घेणारे खडसे यांच्यासारखे नेते स्वतःचेच मोठे नुकसान करवून घेताहेत हे माझे वाक्य आज या ठिकाणी तुम्ही तुमच्या डायरीत नोंदवून ठेवा, काही ग्रह वाईट असतात कधी राजकीय आराखडे चुकतात याचा अर्थ फडणवीस संपले असा जर पंकजा मुंडे यांच्यासारख्या नेत्यांनी काढला असेल तर त्यांनी सर्वप्रथम आपल्या दिवंगत पित्याला देखील धारेवर धरावे ज्यांच्यामुळे ज्यांच्या हट्टामुळे १९९९ नंतर सतत पंधरा वर्षे याच शरद पवारांनी तुमच्या वडिलांना सत्तेपासून दूर ठेवले होते. १९९९ मध्ये जर दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचे म्हणणे ऐकून नारायण राणे यांना मुख्यमंत्री म्हणून शपथ घेण्याची परवानगी दिली असती तर आजचे राजकीय चित्र फार वेगळे दिसले असते. मुंडे यांनीं त्यावेळी एवढी मोठी चूक करून देखील त्यांना त्यावेळी कोणीही शिव्याशाप दिले नाहीत जे काम आज पंकजा मुंडे करताहेत. दुसऱ्यांचे दोष दाखवतांना तीन बोटे आपल्याकडे देखील असतात हे शिव्या देणार्यांनी कायम लक्षात ठेवावे…
क्रमश: हेमंत जोशी