बावनकशी बावनकुळे भाग दुसरा : पत्रकार हेमंत जोशी
कोणतेही ठोस कारण नाही, मंत्री म्हणून सतत पाच वर्षे अत्यंत यशस्वी कारकीर्द, समाजाच्या जनतेच्या नागपूरकरांच्या मतदारांच्या नेत्यांच्या आमदारांच्या इतर मंत्र्यांच्या राज्यमंत्र्यांच्या आमदार खासदारांच्या पत्रकारांच्या अधिकाऱ्यांच्या अण्णा हजारे यांच्यासारख्या समाजसेवकांच्या मुख्यमंत्र्यांच्या थोडक्यात या राज्यातल्या प्रत्येकाच्या गळ्यातला ताईत, ज्ञातीचे बहुमूल्य १३% मतदान पक्षाच्या पारड्यात केवळ त्यांच्यामुळे पडणारे तरीही चंद्रशेखर बावनकुळे यांना भाजपाने ऐनवेळी उमेदवारी दिली नाही, त्यांच्या पत्नीला उमेदवारी जाहीर करून देखील त्यांनाही ती अगदी वेळेवर नाकारण्यात येऊन बावनकुळे यांचा अमित शाह यांनी गेम केला. देवेंद्र फडणवीस यांच्या तर डोळ्यात अश्रू तरळले आणि नितीन गडकरी एवढे अस्वस्थ झाले कि पुढले काही दिवस त्यांना अन्न देखील गोड लागत नव्हते. बावनकुळे यांच्या मागे भरभक्कम उभा असलेला त्यांचा तेली समाज जो केवळ त्यांच्या नेतृत्वाखाली भाजपाला मतदान करून मोकळा व्हायचा एकतर तेली मतदार नाराज असल्याने ते मतदानाला गेले नाहीत किंवा त्यांनी अन्य पक्षाला मोठ्या प्रमाणावर मतदान केले…
मित्रांनो, राजकीय पत्रकारितेतील माझा दीर्घ अनुभव हेच सांगतो कि त्या त्या राजकीय पक्षात त्या त्या प्रसंगी अनेक नेत्यांवर अन्याय होत असतो, अनेक नेत्यांना त्यांची लायकी असतांना देखील अनेकदा अचानक बाजूला केले जाते अडगळीत टाकले जाते त्याला अनेक कारणे असतात पण अमुक एखाद्या नेत्याला बाजूला केल्यानंतर त्याने आत्मचिंतन करून शांतपणे विचार करून पुन्हा जर स्वतःला कामात झोकून दिले तर त्या नेत्याचे पुन्हा एकदा नक्की भले होते पण अन्याय झाला म्हणून जे नेते आदळआपट करतात गोंगाट करतात भांडणे करतात आरोप प्रत्यारोप करतात किंवा बंडखोरी करतात पक्षांतर करतात त्यांचे पुढे भले झाले ते पुन्हा मोठे झाले असे फारसे आजतागायत घडलेले नाही. ज्यांनी पक्षांतर्गत बंडखोरी केली पक्षांतर केले आरोप केले जाहीर तोंडसुख घेतले ते त्यातून मोठे झाले असे ना कधी घडते ना कधी घडलेले आहे कारण या नेत्यांना त्यांच्या पक्षाने एवढे देऊनही जर ते गोंधळ घालतात तर त्यांचे आपल्याकडे येऊन देखील फायद्याचे ठरेल असे वाटत नाही असा सारासार विचार करून बंडखोरी करणाऱ्यांचे दुसरीकडे जाऊन देखील फारसे भले झाले कधी दिसले नाही. लॉयल्टी नेहमी उपयोगी ठरते हे नेत्यांनी कायम लक्षात ठेवावे विशेषतः अन्याय झालेले चंद्रशेखर बावनकुळे हे उदाहरण कायम ध्यानात ठेवावे….
असेही नव्हते कि विनोद तावडे यांना जशी आपल्याला पुन्हा उमेदवारी मिळणार नाही हि कल्पना काही महिने आधी आलेली होती ती तशी कल्पना बावनकुळे यांना होती. त्यांना उमेदवारी मिळेल आणि ते प्रचंड मताधिक्याने निवडून येतील हेच यांच्यासहित जो तो म्हणायचा, ते घडले नाही त्यांना अचानक डावलले गेले तरीही बावनकुळे यांनी कुठेही जाहीर किंवा खाजगीत देखील नाराजी व्यक्त केली नाही. माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भाजपा आणि गडकरी फडणवीसांनी मोठ्या उंचीवर नेऊन ठेवले आहे हेच ते ज्याला त्याला सांगत सुटले आणि अत्यंत कठीण प्रसंगी ते भाजपाच्या आपल्या नेत्यांच्या पाठीशी भरभक्कम उभे राहून त्यांनी नागपूर वर्धा आणि चंद्रपूर तसेच जवळपास अख्ख्या विदर्भाचे विधानसभा निवडणुकीत प्रचार व नियोजन करून भाजपासाठी मोठे योगदान दिले. फडणवीस यांचा सध्या राजकीयदृष्ट्या मोठा कठीण सत्वपरीक्षेचा काळ असून देखील जेथे तेथे चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहेत हे दृश्य कायम बघायला मिळते आहे ज्याचे मोठे बक्षीस त्यांना नक्की नजीकच्या काळात भविष्यात मिळेल त्याची मला खात्री आहे. बंडखोरी करणाऱ्या किंवा सारे काही मिळून देखील अस्वस्थ होऊन कठीण प्रसंगी फडणवीस आणि भाजपाला आरोपाच्या पिंजऱ्यात ओढणार्यांचे त्यांना जर असे वाटत असेल कि फार भले होणार आहे तर तो त्यांनी स्वतःविषयी मोठा गैरसमज करवून घेतलेला आहे. भाजपा किंवा अन्य पक्षातल्या नेत्यांनी हे कायम ध्यानात ठेवावे कि आपण म्हणजे शरद पवार नाही कि बाहेर पडून देखील पुन्हा मोठे होणार आहोत, नेत्यांनी आपली स्वतःची कुवत ओळखावी आणि लॉयल्टी अत्यंत महत्वाची हे ध्यानात ठेवावे….
तूर्त एवढेच : हेमंत जोशी