अनिल गायकवाडांचा जाहीर निषेध
आणि राजकारण विशेष :
या लिखाणाची सुरुवात मी आणि उदगीर विधानसभा मतदार संघातील समस्त मतदार, रस्ते विकास महामंडळाचे कार्यकारी संचालक श्री अनिलकुमार गायकवाड आणि त्यांचे सुपुत्र विश्वजित गायकवाड दोघांचाही येथे जाहीर निषेध आणि संताप व्यक्त करतो त्या दोघांनी एकाचवेळी दानशूर कर्णाच्या भूमिकेत शिरत जो निर्णय घेतला आहे तो मला व्यक्तीश: तसेच समस्त उदगीरकर मतदारांना अजिबात भावला रुचला नाही त्यांच्या त्या निर्णयामुळे संपूर्ण विधानसभा मतदसरसंघात फार मोठी नैराश्येची लाट आली आहे आणि या लाटेला ते दोघेच जबाबदार आहेत जे गायकवाड प्रेमी साऱ्यांना अस्वस्थ करणारे ठरले आहे. उदगीर या राखीव विधानसभा मतदार संघात विद्यमान आमदार आणि मंत्री राष्ट्रवादीचे संजय बनसोडे होते ज्यांच्याविषयी त्यांनी शरद पवार यांना धोका दिल्याने आणि एकंदर चुकीच्या कार्यप्रणालीमुळे प्रचंड नाराजी मतदार संघात होती त्यांना पर्याय म्हणून गेल्या पाच वर्षांपासून विश्वजित अनिलकुमार गायकवाड यांच्या जोडलेल्या अफाट लोकसंग्रहातूनभाजपाच्या या झंझावाती कामसू तरुण नेत्याकडे सारेच उदगीरकर उद्याचा हाच आमदार म्हणून कौतुकाने त्याला मनापासून प्रोत्साहन देत होते, अजितदादा आणि भाजपा महायुती झाल्याने आपसूकच हि जागा राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांच्या वाट्याला आली आणि तेथेच नेमकी माशी शिंकली किंवा संजय बनसोडे यांच्या पायाखालची वाळू सरकली…
www.vikrantjoshi.com
भाजपच्या विश्वजित गायकवाड यांचा विजय निश्चित होता, काहीही झाले तरी त्यांना हि निवडणूक लढवायची होती पुढे राष्ट्रवादीशी युती झाल्याने विश्वजित गायकवाड अपक्ष निवडणूक लढविणार हे ठरलेही होते पण अनिलकुमार आणि विश्वजित यांचा अति भावनिक आणि दिलदार स्वभाव याचा नेमका अनुभव चलाख चतुर संजय बनसोडे यांना ठाऊक असल्याने त्यांनी एकाचवेळी ज्या तिघांशीहि अनिल गायकवाड यांचे अतिशय घरगुती आणि व्यक्तिगत प्रेमाचे आदराचे जिव्हाळ्याचे संबंध आहेत त्या एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांच्या पायावर लोटांगण घालून विश्वजित गायकवाडांना निवडणूक लढवून पराभूत न करण्याची विनंती केली, थेट अनिल गायकवाडांना देखील प्रत्यक्ष भेटून त्यांनी विनंती केली आणि या दिलदार वृत्तीच्या बापलेकांना संजय बनसोडे यांनी फोडलेल्या हंबरड्याची कीव आली विशेषतः अजितदादा फडणवीस आणि शिंदे यांच्या सूचनेला मान देत अक्षरश: त्यांनी कोणत्याही अपेक्षा न ठेवता समोर दिसणार्या आमदारकीवर पाणी सोडले. आता हेच बापलेक त्या संजय बनसोडे या संधीसाधू उमेदवाराला निवडून आणण्यासाठी ढाल बनून प्रचार करणार असल्याचे समजते. मिस्टर फडणवीस संपूर्ण गायकवाड या बौद्ध धर्मीय प्रभावी कुटुंबियांचे त्यात माजी खासदार सुनील गायकवाड आपसूक आलेच, रा स्व संघ, भाजपा आणि तुमच्यावर कल्पनेपलीकडे प्रेम आहे निष्ठा आहे विशेष म्हणजे लातूर जिल्ह्यात किंवा राज्यातल्या बौद्ध धर्मियात गायकवाड कुटुंबीय फार मोठी ताकद आहे, राजकारणात नेमकी संधी चालून आली कि अनेकदा गायकवाड कुटुंब सदस्यांना बाजूला सारले जाते, विशेष म्हणजे विश्वजित आमदार होण्यापूर्वीच उदगीर विधानसभा क्षेत्रात उत्तम युवा नेतृत्व म्हणून त्याला असलेली लोकप्रियता, कृपया या युवा बौद्ध नेतृत्वाचे जे भाजपाकडे अभावाने आहे त्याला योग्य स्थान मिळेल असे कृपया आपल्या हातून घडावे, त्यांचे अधिक राजकीय नुकसान होऊ नये असे साऱ्यांनाच मनापासून वाटते..
एका वेगळ्या मुद्द्याला येथे मला हात घालायचा आहे विशेषतः उद्धव सेनेचे सुधीर तांडेल किंवा ऍडव्होकेट असीम सरोदे किंवा जे केवळ भाजपा व महायुती विरोधक आहेत त्या साऱ्यांचा हात जोडून विनंती कि आम्ही समस्त ब्राम्हण आणि राज्यातले तमाम हिंदू ज्या शिवाजी महाराजांच्या पराक्रमी कथा सांगत पुढली प्रत्येक उत्तम पिढी घडविण्यात मनस्वी समाधान मानतो त्या शिवाजी महाराजांचे अतिभव्य स्मारक उभे करणे देवेंद्र फडणवीसांचे मोठे स्वप्न आहे त्यांनी ज्या तडफेने मेट्रो प्रकल्प किंवा समृद्धी महामार्गासारखे अतिभव्य स्वप्न बघता बघता पूर्ण केले त्यांना किंवा राज्यातल्या समस्त शिवप्रेमींना या स्मारकाच्या आड येणाऱ्यांची मोठी चिंता आहे किंवा पुरुषोत्तम खेडेकर पद्धतीचे मराठ्यांचेच नेते जेव्हा या प्रकल्पाला सतत उघड विरोध करतात तेव्हा तळपायाची आग मस्तकात पोहोचते. वास्तविक 1996 मध्ये त्यावेळेच्या मुख्यमंत्री मनोहर जोशी यांना पहिल्यांदा हे शिव स्मारकाचे स्वप्न पडले त्यांनी त्यावर तातडीने त्यावेळी निर्णय देखील घेतले पण त्यानंतर लागोपाठ ब्राम्हणेतर विशेषतः अनेक मराठा मुख्यमंत्री सत्तेत येऊन देखील त्यातल्या एकानेही या स्मारकाकडे लक्ष दिले नाही सुदैवाने 2014 मध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले आणि दिवंगत मित्र विनायक मेटे यांच्या सूचनेवरून मुख्यमंत्री या नात्याने फडणवीसांनी शिव स्मारकाच्या कामाला गती दिली पण विरोधकांनी विशेष म्हणजे शिवप्रेमींनीच हे स्मारक पूर्ण कसे होणार नाही त्यादृष्टीने कधी आंदोलन तर कधी न्यायालयाचा खोडा घातला. विशेषतः संभाजी राजेंना विनंति कि जे या स्मारकाच्या आड येताहेत त्यांना कसे थांबविता येईल त्यावर लक्ष केंद्रित करून फडणवीसांना किंवा सत्तेत येणाऱ्याना सहकार्य करावे…
तूर्त एवढेच : पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी