राजकीय गॉसिप्स आणि टॉपिक्स : भाग 1
श्री श्री शरद पवार सहसा अस्वस्थ होत नाहीत अगदी ते ब्रीच कँडी इस्पितळात अत्यावस्थ असताना देखील अस्वस्थ झाले नव्हते त्याच पवारांना मी खऱ्या अर्थाने आजतागायत तीन वेळा अस्वस्थपणे इकडून तिकडे आणि तिकडून इकडे येरझार्या घालताना बघितले आहे. एकदा राज्याचे मुख्यमंत्री अ रा अंतुले असताना ते कमालीचे अस्वस्थ झाले होते त्यानंतर हेच पवार सुधाकरराव नाईक मुख्यमंत्री असतांना कमालीचे अस्वस्थ अशांत मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितले आणि प्रत्यक्ष अनुभवले आणि आज जेव्हा राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असतांना हेच शरद पवार यादिवसात कमालीचे अस्वस्थ अस्थिर अशांत मी बघतो आहे. ते जेव्हा केव्हा ज्यांच्यामुळे मनापासून डिस्टर्ब होतात अस्वस्थ होतात त्यांचा ते पूर्णतः राजकीय नायनाट करूनच पुन्हा स्वस्थ बसतात हे मी अंतुले आणि नाईकांच्या बाबतीत स्वतः जवळून बघितले अनुभवले आहे किंबहुना त्यांना डोईजड ठरणारा प्रसंगी सख्खा पुतण्या जरी असला तरी शरद पवार समोरच्या कित्येकांचा प्रत्येकाचा राजकीय खात्मा जेव्हा करतात तेव्हाच त्यांच्या घशाखाली अन्न उतरते अन्यथा पवारांची त्यादिवसात अवस्था भुकेल्या चवताळलेल्या थेट जंगली खुनशी सुडाने पेटलेल्या श्वापदासारखी असते, जी आज पुन्हा हुबेहूब तीच त्यांची घायाळ जखमी अवस्था मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारने केली आहे. शिंदेंची महायुती सरकारची लाडकी बहीण योजना पवारांच्या थेट डोक्यात गेली आहे, त्यांच्या डोक्याला या योजनेने झिणझिण्या आणल्या आहेत…
www.vikrantjoshi.com
थोडेसे मागे जाऊया. 1980 साली त्यावेळेच्या पंतप्रधान आणि काँग्रेसच्या सर्वेसर्वा असलेल्या इंदिरा गांधी आणि त्यांच्या लाडक्या लेकाने संजय गांधी यांनी आपल्या अत्यंत आवडत्या अशा अ रा अंतुले यांना महाराष्ट्रातल्या शरद पवार यशवंतराव चव्हाण शंकरराव चव्हाण वसंतदादा पाटील बाळासाहेब विखे पाटील शालिनीताई पाटील इत्यादी समस्त प्रभावी नेत्यांना वाकुल्या दाखवत थेट एका मुसलमानाला महाराष्ट्राचे मुख्यमंत्री केले जेथून राज्यात राजकारणाने वेगळे वळण घेतले ते आजतागायत. अंतुले मुख्यमंत्री झाले आणि काहीच महिन्यात वयाच्या अवघ्या 33 व्या वर्षी संजय गांधींचा अपघाती मृत्यू झाला, त्यांच्यापेक्षा वयाने थेट दहा वर्षांनी लहान असलेल्या देखण्या मेनका गांधी वयाच्या फक्त 23 व्या वर्षी विधवा झाल्या ,आजतागायत केवळ पुत्र वरुण यांच्या प्रेमापोटी विधवा म्हणूनच जगल्या. संजय गेले तेव्हा वरुण फक्त 100 दिवसांचा होता, भाजपा नेत्यांनी मेनका आणि वरुण यांना राजकीय साथ व सहारा दिला नसता तर हे मायलेक इंदिरा आणि गांधी कुटुंबाच्या जाचाला कंटाळून कायमस्वरूपी परदेशात निघून जाणार होते. आपल्या जिवलग नेत्याच्या अचानक जाण्याने मुख्यमंत्री अंतुले त्यावेळी कमालीचे दुख्खी: झाले हेच संजय गांधी दर दिवशी स्मरणात असावेत म्हणून याच अंतुले यांनी हुबेहूब आजच्या मुख्यमंत्र्यांसारखी एक योजना दारिद्र्य रेषेखाली जगणार्या महाराष्ट्रातल्या जनतेसाठी,संजय गांधी निराधार योजना सुरु केली ज्या योजनेतून गरिबांना दर महिन्याला आर्थिक मदत दिल्या जायची त्यामुळे 1980 दरम्यान अंतुले राज्यातले सर्वाधिक लोकप्रिय नेते म्हणून एवढे नावारूपाला आले कि ते जेथे जायचे तेथे त्यांचे त्यावेळेच्या सुपरस्टार राजेश खन्नासारखे सर्वसामान्य प्रचंड गर्दीत त्यांचे स्वागत करायचे, अशी लोकप्रियता आजतागायत मी बाळासाहेब ठाकरे नंतर एकाचाही बघितली नाही आणि तेथेच शरद पवार पद्धतीच्या समस्त नेत्यांचे माथे ठणाणले, अंतुले त्या प्रत्येकाच्या डोक्यात गेले…
अब्दुल रहमान अंतुले यांची उलटी गिनती झपाट्याने सुरु झाली. त्यानंतर एकदा केंद्रात मंत्रिपद वगळता अंतुले यांना महाराष्ट्रात पुन्हा पूर्वीची मान्यता, सत्ता लोकप्रियता किंवा जनतेच्या हृदयात प्रेमाची जागा स्थान अगदी आयुष्याच्या अखेरपर्यंत अजिबात मिळविता आली नाही, ते कायमचे राजकीय अडगळीत पडले, अखेरीस याच अंतुले यांना राजकीय दृष्ट्या रायगड जिल्ह्यातून सुनील तटकरे यांनी उरले सुरले संपवून टाकले. अंतुले बाजूला झाले तशी संजय गांधी निराधार योजना देखील लवकरच बासनात गुंडाळण्यात आली, थोडक्यात अंतुलेंचे राजकीय नामोनिशाण मिटविण्यात हळूच पवारांनी महत्वाची भूमिका बजावली. पुन्हा महाराष्ट्रात तेच घडले आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण योजना सुरु होऊन उणेपुरे काहीच दिवस उलटले असतांना ज्या पद्धतीने महायुती सरकारच्या लोकप्रियतेचा आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या राजकीय कारकीर्दीचा ग्राफ ज्या वेगाने उंचावला आहे त्याचमुळे शरद पवार व्यक्तीश: आणि समस्त महाआघाडीचे घटक पक्ष प्रचंड धास्तावले आहेत त्यांना वेड लागले आहे ते अस्वस्थ झाले आहेत त्यांना काहीही सुचेनासे झाले आहे कारण महत्वाचे असे कि जर अंतुले पद्धतीने शिंदे आणि महायुती सरकारचा येणाऱ्या विधानसभेला खात्मा केला आणि महाआघाडी सत्तेत आली तर लगेच संजय गांधी निराधार योजनेसारखी लाडकी बहीण योजना अगदी दुसरेच दिवशी महाआघाडी बासनात गुंडाळून नक्की मोकळी होईल पण आताची जनता सुद्न्य आहे, त्यांना आपले नियमित मिळणारे आर्थिक नुकसान नक्कीच करवून घ्यायचे नसल्याने त्यांनी येणाऱ्या विधानसभेला जात पात किंवा धर्म न बघता भाजपा महायुतीला साथ आणि दाद देण्याचे नक्की केले असल्याने जे पवारांना लक्षात आले आहे, म्हणूनच या दिवसात शरद पवार कमालीचे अस्वस्थ झाले आहेत आणि महायुती विरोधक मनातून घाबरले हादरले आहेत, कारण शिंदे फडणवीस आणि महायुती म्हणजे अंतुले किंवा सुधाकरराव नाईक नाहीत ज्यांना आजचे पवार सहजासहजी संपवतील त्यांचा अंतुले किंवा नाईक करतील…
क्रमश: पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी
 
	    	

 
                 
                